काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यामुळे नाट्यमय वळणावर पोहोचली आहे. पूर्वेकडील पेनसिल्वानिया प्रांतात बटलर पार्क येथील प्रचारसभेत ट्रम्प भाषण करीत असताना अचानक बाजूच्या इमारतीवरून थाॅमस मॅथ्यू क्रुक्स नावाच्या वीसवर्षीय तरुणाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली. ते लगेच खाली बसले. सुरक्षारक्षकांनी त्यांच्याभोवती मानवी ढाल केली. त्या गराड्यातच ते उठून उभे राहिले तेव्हा चेहऱ्यावर रक्ताचा मोठा ओघळ वाहात होता. त्याच अवस्थेत त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पीटर्सबर्ग येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. दरम्यान, सुरक्षारक्षकांनी त्या तरुणाला संपविले होते.
सभेला उपस्थित आणखी एकाचा या घटनेत मृत्यू झाला. या प्राणघातक हल्ल्यामुळे जगभर खळबळ उडणे स्वाभाविक आहे. कारण, अब्राहम लिंकन, ॲमिस गारफिल्ड, विल्यम मॅकिन्ले व जाॅन एफ केनेडी या अध्यक्षांच्या हत्येचा, इतर अनेकांवर हल्ल्याचा अमेरिकेला इतिहास आहे. डोनाल्ड ट्रम्प हे सर्वशक्तिमान अमेरिकेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांना पुरेशी सुरक्षा पुरविणे हे सरकारी यंत्रणेचे कर्तव्य असताना त्यांच्यावर गोळीबार होतो, त्यातून ते केवळ सुदैवाने वाचतात, हा अमेरिकेला व जगालाही मोठा धक्का आहे. त्यातच डोनाल्ड ट्रम्प हे बहुचर्चित, विशिष्ट कडव्या वर्गात अत्यंत लोकप्रिय आणि तितकेच वादग्रस्त नेते आहेत. अमेरिकन काँग्रेसने दोनवेळा महाभियोग प्रस्ताव मंजूर केलेले ते एकमेव अध्यक्ष आहेत. त्यापैकी दुसरा महाभियोग तर २०२०ची निवडणूक हरल्यानंतर त्यांच्या चिथावणीवरून समर्थकांनी थेट काँग्रेसवर हल्ला केल्याबद्दल होता. कॅपिटाॅल हिलवर हल्ला करून अध्यक्षपद बळकावण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. दोन्हीवेळा सिनेटने त्यांना अपात्रतेपासून वाचविले. याशिवाय अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांच्याकडे जमा झालेली अतिसंवेदनशील कागदपत्रे स्वत:च्या बंगल्यात लपवून ठेवल्याचाही धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
लहरी व विचित्र स्वभावामुळे अमेरिकेची सगळी व्यवस्था त्यांनी वेठीस धरल्याचे दिसते. स्वत:चा रिपब्लिकन पक्षही त्यांनी जवळपास बळकावला आहेच. थोडक्यात अत्यंत पोहोचलेले राजकीय नेते अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळेच कालचा हल्ला प्रत्यक्षात त्यांनीच घडवून आणलेला स्टंट असावा, अशा स्वरूपाची मोठी चर्चा सर्वत्र आहे. गोळ्या झाडणाऱ्या तरुणाचा नेम चुकल्याने ट्रम्प यांना गोळी लागली, असा सुतावरून स्वर्ग काहीजण गाठत आहेत. तसेच सभेला उपस्थित समर्थक हल्ल्यानंतरही तिथेच थांबल्याचे कारण दिले जाते. परंतु, हल्ल्याचे स्वरूप पाहता त्यात काही दम वाटत नाही. कारण, बाेलताना ट्रम्प थोडे डावीकडे झुकले म्हणून गोळी कानाला स्पर्शून गेली. ते झुकले नसते तर गोळीने थेट त्यांच्या कपाळाचा किंवा उजव्या भुवईचा वेध घेतला असता. त्यातून ते अजिबात वाचले नसते. अर्थात, गुप्तचर व सुरक्षा यंत्रणेचे अपयश मात्र या घटनेतून चव्हाट्यावर नक्की आले आहे. गोळीबार करणारा तरुण पटांगणाशेजारी असलेल्या इमारतींच्या छतावर चढत होता. हल्ल्यासाठी योग्य ठिकाण शोधताना तो एका छतावरून दुसऱ्या छतावर जात होता तेव्हा सुरक्षा यंत्रणा काय करीत होती, हा प्रश्न उपस्थित होतो.
गोळीबारानंतर काही सेकंदात दुसऱ्या इमारतीवरील सुरक्षारक्षकांनी त्या युवकाचा खात्मा केल्यामुळे हल्ल्यामागील हेतू खऱ्या अर्थाने कधीच उघड होणार नाही. एक नक्की की ट्रम्प यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यामुळे अध्यक्ष जो बायडेन व त्यांच्या डेमोक्रॅट पक्षापुढील आव्हान अधिक अवघड बनले आहे. बालंबाल बचावल्यानंतर रक्तबंबाळ ट्रम्प यांनी ज्या हिमतीने, त्वेषाने हात उंचावून समर्थकांपुढे लढण्याचा आत्मविश्वास दाखवला ते पाहता त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती वाढण्याची शक्यता आहे. आधीच वयोपरत्वे विसराळू बनलेल्या बायडेन यांच्या प्रकृतीबद्दल त्यांचा पक्षच चिंतेत आहे. त्यांच्याऐवजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना निवडणूक रिंगणात उतरवले जाईल, अशी चर्चा असली तरी बायडेन त्यांचा पुन्हा निवडणूक लढण्याचा हट्ट सोडायला तयार नाहीत. मानसिक व शारीरिकदृष्ट्या आपण अगदी सुस्थितीत आहोत, असा त्यांचा दावा आहे. परंतु, त्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. अशावेळी, जिवावर बेतले ते कानावर निभावले, अवस्थेत लढण्याची हिंमत दाखविणारे ट्रम्प आणि हातपाय व बोलण्यावर नियंत्रण नसलेले बायडेन यांच्यातील लढाईत ट्रम्प यांचे पारडे आणखी जड झाले आहे.