काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक; देशाचे लक्ष या दोन मतदारसंघावर होते
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 07:23 AM2024-05-04T07:23:58+5:302024-05-04T07:25:30+5:30
रायबरेली आणि अमेठीतून गांधी भावंडांना रिंगणात उतरविण्याचा पर्याय काँग्रेससमोर होता. त्यावर पक्षात बराच खलही झाला होता.
संपूर्ण देशाचे लक्ष ज्या दोन लोकसभा मतदारसंघांतील काँग्रेस उमेदवारांच्या घोषणेकडे लागले होते, ती घोषणा अखेर शुक्रवारी सकाळी झाली. सोबतच हेदेखील स्पष्ट झाले, की प्रियांका गांधी-वढेरा निवडणुकीच्या रिंगणापासून यावेळीही दूरच राहणार आहेत, तर राहुल गांधी यावेळी त्यांच्या परंपरागत अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. तसे हे दोन्ही मतदारसंघ गांधी घराण्याचे बालेकिल्ले! राहुल गांधींचे आजोबा फिरोज गांधी, आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांनी लोकसभेत रायबरेलीचे प्रतिनिधित्व केले आहे, तर अमेठीचे प्रतिनिधित्व संजय गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधींनी केले आहे. जेव्हा राहुल गांधींनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला, तेव्हा सोनिया गांधींनी अमेठी मतदारसंघ त्यांच्याकडे सोपविला आणि त्या स्वत: रायबरेलीतून निवडणूक लढवू लागल्या; पण त्यांनी आता निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतला आहे आणि राज्यसभेत जाणे पसंत केले आहे. गत लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाले होते, तर वायनाडमधून विजयी झाले होते. त्यामुळे यावेळी गांधी घराण्याच्या दोन्ही परंपरागत मतदारसंघांतून कुणाला लढवायचे, हा पेचप्रसंग काँग्रेस पक्षापुढे उभा ठाकला होता. तो सोडविण्यासाठी काँग्रेसने अंमळ जास्तच वेळ घेतला; पण उपलब्ध पर्यायांपैकी सर्वोत्तम पर्याय निवडले, हे विरोधकांनाही मान्यच करावे लागेल.
रायबरेली आणि अमेठीतून गांधी भावंडांना रिंगणात उतरविण्याचा पर्याय काँग्रेससमोर होता. त्यावर पक्षात बराच खलही झाला होता. निवडणुका जिंकण्यासाठी गांधी घराण्याच्या करिष्म्यावर अवलंबून राहण्याची सवय जडलेल्या काँग्रेसमधील काही नेत्यांनी तसा आग्रहदेखील धरला होता म्हणतात; पण राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनीही त्याला ठामपणे नकार दिला आणि त्यामुळेच रायबरेलीतून राहुल गांधी, तर अमेठीतून गांधी घराण्याचे एकनिष्ठ के.एल. शर्मा असा पर्याय समोर आला. काँग्रेसचा हा ‘मास्टरस्ट्रोक’च म्हणावा लागेल! आई राज्यसभा सदस्य असताना, राहुल आणि प्रियांका या दोघांनीही लोकसभा निवडणूक लढविली असती, तर भाजपच्या घराणेशाहीवरील टीकेला अधिकच धार चढली असती आणि काँग्रेसला त्याचा प्रतिवाद करणे कठीण झाले असते.
गांधी घराण्यातील एकच सदस्य निवडणूक लढवेल, अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतली. प्रियांका गांधींनीही त्यांना साथ दिली. कदाचित त्या भूमिकेमुळेच स्वत: सोनिया गांधींनी आधीच राज्यसभेत जाण्याचा पर्याय निवडला असावा. वस्तुतः रायबरेली आणि अमेठी या दोन्ही मतदारसंघांतून गांधी घराण्यातील सदस्यांनीच निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी होत होती; पण त्या प्रेमळ आग्रहाला बळी न पडल्याबद्धल गांधी कुटुंबीयांचे कौतुक करायलाच हवे. अर्थात, काँग्रेसच्या संपूर्ण उत्तर भारतातील लढाईला धार देण्यासाठी, रायबरेली व अमेठीपैकी किमान एका तरी मतदारसंघातून गांधी कुटुंबातील सदस्याने लढणे अत्यावश्यक होते. त्यासाठी कुटुंबाने रायबरेली आणि राहुल गांधींची निवड केली. त्यापैकी राहुल गांधींची निवड अपरिहार्य होती; कारण ते केरळमधील वायनाडमधूनही निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे घराणेशाहीच्या आरोपातील धार काढण्यासाठी प्रियांका गांधींच्या नावापुढे फुली लागणे अपरिहार्य होते. अर्थात, केवळ गांधी कुटुंबातील एकाच सदस्याने निवडणूक लढविली म्हणून भाजपच्या टीकेची धार बोथट होण्याची अपेक्षा बाळबोध ठरेल. नेहरू-गांधी कुटुंबावर टीका केल्याशिवाय भाजप कोणतीही निवडणूक लढवूच शकत नाही, हा गेल्या काही दशकांचा इतिहास आहे.
त्या इतिहासाला जागत, रायबरेली व अमेठीतील काँग्रेस उमेदवारांची घोषणा होताच, पंतप्रधान मोदींसकट झाडून सगळ्या भाजप नेत्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागणे सुरू केले आहे. फक्त आता घराणेशाहीऐवजी, राहुल गांधी अमेठीतून लढायला घाबरले, त्यांना वायनाडमधून पराजयाची भीती वाटू लागली आहे, दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाल्यास ते कोणता मतदारसंघ सोडणार, रायबरेली सोडल्यास पोटनिवडणूक प्रियांका गांधी लढणार का, अशी कुत्सित टीका सुरू झाली आहे; पण ती आहे मात्र गांधी कुटुंब केंद्रितच! लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पे आटोपल्यानंतर भाजप नेत्यांद्वारा, मुद्दे सोडून धार्मिक ध्रुवीकरण आणि विरोधकांवरील वैयक्तिक टीकाटिपणीवर भर दिला जात असल्याचे दिसते; परंतु सलग दहा वर्षे सत्ता राबविल्यानंतरही, कोणत्याही समस्येसाठी विरोधकांना, विशेषतः गांधी कुटुंबाला, जबाबदार ठरविणे कितपत योग्य, अशा प्रतिक्रिया त्यावर मतदारांमधून उमटू लागल्या आहेत. भाजप नेतृत्व त्याची दखल घेईल का?