काल-परवापर्यंत घराच्या अंगणात बागडणारी मुलगी अचानक गायब होते आणि तिचा शोधही लागत नाही! आकाशात जातात या मुली की धरणी त्यांना पोटात घेते? असे काय घडते की मुली बेपत्ता होतात आणि त्यांचा तपासही लागत नाही. धक्कादायक माहिती अशी आहे की, जानेवारी ते मार्च २०२३ या तीन महिन्यांत महाराष्ट्रातून पाच हजारहून अधिक मुली गायब झाल्या आहेत. याचा अर्थ राज्यातून दररोज सरासरी नव्वद मुली बेपत्ता होत आहेत. कुठल्याही प्रगत समाजासाठी हे लक्षण धोक्याचे आहे. या मुली जातात कुठे, हेही समजू नये! त्यांना शोधण्यात सहजपणे यश येऊ नये, हे काय सांगते? त्या मुलींचे आयुष्य तर उद्ध्वस्त होतेच. पण, मुद्दा तेवढाच नाही. मुली बेपत्ता होताहेत, हे सामाजिक पर्यावरण बिघडल्याचे जसे लक्षण आहे, तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालल्याचेही आहे. ज्या समाजात गर्भातच मुली मारल्या जातात, जिथे मुलींचे नामकरणच ‘नकोशी’ असे होते, तिथे या बेपत्ता मुली शोधणार तरी कोण?
सर्वात जास्त प्रमाणात या मुली देहव्यापारासाठी आणि अन्य कारणांसाठी विकल्या जातात. अनेक मुली परदेशात नेल्या जातात. त्या खालोखाल या मुली अन्य अमानवी कृत्यांसाठी वापरल्या जातात, हीदेखील वस्तुस्थिती आहे. बेपत्ता झालेल्या प्रत्येक मुलीची कहाणी हा एखाद्या शोकांतिकेचा विषय असेल. पण, आपली सगळी ओली स्वप्नं मातीत पुरून या मुली जगत राहतात. कित्येकींच्या गळ्याला दोर लागतो. मोजक्या मुलींना पुन्हा घर मिळते आणि त्या आनंदाने आयुष्याला सामोऱ्या जातात. पण, देहविक्रीच्या व्यवसायाचे दुष्टचक्र असे आहे की त्यातून बाहेर पडण्याची धडपड करणाऱ्या अनेक मुलींना पुन्हा त्यातच ढकलले जाते. याची कारणे अनेक आहेत. शिवाय, अनेक दुष्टचक्रांतून बाहेर पडून सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलींना अग्निपरीक्षेशिवाय समाज स्वीकारतो का, या प्रश्नाचे उत्तर सामान्यतः ‘नाही’ असे आहे. समाजाने त्यांना स्वीकारावे, यासाठीची भौतिक व्यवस्था म्हणजे त्यांना रोजगाराची संधी देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे या मुद्द्यावर प्रयत्न होत नाहीत. उपासमार झाली की अपरिहार्यतेने या स्त्रिया पुन्हा त्याच मार्गाने जातात किंवा त्यांना हेरून पुन्हा तिथे आणले जाते. स्त्रीकडे पाहाण्याचा दृष्टीकोन यासंदर्भात समाज म्हणून आपल्याला काम करावे लागणार आहे.
जिथे कामाख्या देवीला नवस बोलून राज्यात सरकार स्थापन होते, पण त्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही महिला नसते, तिथे चित्र कसे असेल? विधवांना ‘गंगा-भागीरथी’ संबोधण्याचा फतवा निघू शकतो, त्या समाजातील मानसिकता काय असेल? अन्यत्र तर चित्र आणखी वाईट. हरयाणासारख्या राज्यात लग्नासाठीही परराज्यातल्या मुली विकल्या जाण्याच्या घटना उघड झाल्या आहेत. एकदा खाप पंचायतीच्या ताब्यात गेल्यावर त्यांचा आवाज भिंतींच्या आतच बंद होतो. या सगळ्यामागे मोठमोठी ‘रॅकेट्स’ आहेत, हे उघड गुपित आहे. ही रॅकेट्स सक्रिय राहण्यामागे प्रशासनाची ढिलाई किंवा प्रसंगी हेतूपूर्वक दुर्लक्षही कारणीभूत आहे.‘केरला स्टोरी’ या चित्रपटामुळे मुलींच्या बेपत्ता होण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मध्ये असा दावा करण्यात आला होता की, तब्बल ३२ हजार केरळी स्त्रियांचे ‘ब्रेनवॉश’ करून त्यांचे धर्मांतर करण्यात आले. हे प्रकरण कोर्टात गेले, तेव्हा हा आकडा दुरुस्त होऊन एकदम तीन इतका कमी करण्यात आला. इस्लामिक मूलतत्त्ववादाकडेच काय, कोणत्याही दहशतवादाकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. पण, भारतीय परिप्रेक्ष्यात त्याची ज्या प्रकारे विपर्यस्त मांडणी केली जाते, त्यामागे काही पूर्वनियोजित कारस्थान आहे, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.
युरोपमधून असंख्य जण अशा दहशतवादी संघटनांमध्ये सामील झालेले असताना, भारतातून सामील होणाऱ्यांची संख्या फक्त ६६ आहे. ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. खरे तर, केरळसारख्या राज्यात साक्षरतेचे आणि स्त्री साक्षरतेचेही प्रमाण सर्वाधिक आहे. स्त्री-पुरुष गुणोत्तरातही केरळ आदर्श आहे. असे असताना ‘फेक’ गोष्टी पसरवून विखारी वातावरण तयार केले जाणे धोकादायक आहे. मुलींच्या बेपत्ता होण्याचा मुद्दा काळजीचा आहेच, पण त्याकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहिले जाणे आवश्यक आहे. गर्भातच मुलीला मारले जाते, त्यावर भाष्य करायचे नाही. हुंड्यासाठी विवाहितेला जाळले जाते, त्यावर बोलायचे नाही आणि धार्मिक विखार निर्माण करून चर्चा वेगळ्याच दिशेने न्यायची, हे त्यावरील उत्तर नाही. हा प्रश्न गंभीर आहेच. पण, त्याचे अचूक निदान झाल्याखेरीज आपल्याला उपचार सापडणार नाहीत!