शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

आता ड्रग्जचे माहेरघर? रुग्णालयातूनच ड्रगचे रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 7:34 AM

पुणे तिथे काय उणे, असे नेहमीच बोलले जाते.

पुणे तिथे काय उणे, असे नेहमीच बोलले जाते. सकारात्मक अशा या उक्तीचे रूपांतर शहरात घडणाऱ्या अमली पदार्थांच्या गुन्हेगारीमुळे नकारात्मकतेच्या दिशेने तर होणार नाही ना, असा प्रश्न पडू लागला आहे! अमली पदार्थांच्या विळख्यात शहरातील तरुणाई अडकत असून, पोलिसांत दाखल गुन्हे आणि व्यसनमुक्ती केंद्रात येणारी तरुणाई यांचे आकडे पाहिले, तर काळजीचे चित्र नक्कीच आहे. येरवडा कारागृहातील कैदी आणि ड्रगमाफिया ललित पाटील हा उपचारांच्या नावाखाली थेट ससून रुग्णालयातूनच ड्रगचे रॅकेट चालवत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. पुणे पोलिसांनी दोन कोटी १४ लाख ३० हजार रुपयांचा ‘मॅफेड्रोन’ हा अमली पदार्थ जप्त केला. हवालाच्या पैशांतून पाटील आणि त्याच्या साथीदारांना कायदेशीर मदतही मिळत असल्याची माहिती आहे. अमली पदार्थांच्या प्रकरणातच २०२०पासून ललित पाटील तुरुंगात असून, आतापर्यंत निम्म्याहून अधिक काळ तो उपचारांनिमित्त ससून रुग्णालयात येत होता. अमली पदार्थांच्या तस्करीची व्याप्ती किती मोठी आहे, याची कल्पना या प्रकरणातून यावी. अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणाची २०१९पासूनची आकडेवारी पाहिली, तर हे वर्ष काळजीत भर टाकणारे आहे. २०१९मध्ये तीन कोटी ८१ लाख रुपयांचे अमली पदार्थ, २०२०मध्ये एक कोटी ९५ लाख ८ हजार ६१६, २०२१मध्ये दोन कोटी ५८ लाख दोन हजार ७४ रुपयांचे अमली पदार्थ सापडले. २०२२मध्ये यात लक्षणीय वाढ होऊन नऊ कोटी ९३ लाख ३२ हजार ७६५ आणि या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत १३ कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहेत. ही आकडेवारी केवळ पुणे शहरातील आहे. शिवाय, ती फक्त पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जची आहे.

मुंबईतील नायजेरियन तस्करांचा धुमाकूळ नुकताच बातम्यांमध्ये उमटला आहे. देशातील चित्र अधिक चिंता निर्माण करणारे असणार आहे. कोरोनानंतरच्या काळात अमली पदार्थांशी निगडित गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे लक्षात येते, तसेच अफीम, गांजा, चरस यांच्या आहारी जाणारी तरुणाई आता कोकेन, मेफेड्रोन, एलएसडी स्टॅम्प, मशरूम, हशीश तेलाच्या आहारी जात आहे. पोलिसांनी नुकतेच सव्वाकोटी रुपयांचे एलएसडी स्टॅम्प जप्त केले, तसेच मॅफेड्रोन हा अमली पदार्थ सर्वाधिक जप्त केला. नऊ महिन्यांत पुण्यात १५१ आरोपींना अटक झाली आहे. आयटी हब, शिक्षणाचे माहेरघर, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट यासह मोठा वारसा असलेल्या पुण्यनगरीतील तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात अधिकाधिक सापडत जावी, ही खरेच चिंतेची बाब. अमली पदार्थांचे सेवन करणारे बहुतांश तरुण सुशिक्षित आणि कथित चांगल्या घरातील असल्याचे समोर आले आहे. नागरिकांचे, तरुणांचे समुपदेशन करण्याबरोबरच व्यसनमुक्ती शिबिरेही पोलिसांसह स्वयंसेवी संघटना त्यासाठी चालवत आहेत.  मुक्तांगण केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांनीही या वर्षी केंद्रात येणाऱ्या तरुणांची संख्या वाढल्याचे नमूद केले आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीची पाळेमुळे इतर राज्यांतही निश्चितपणे आहेत. ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान अशा राज्यांतून विविध अमली पदार्थांची तस्करी चालल्याचे समोर येत आहे.

अमली पदार्थांची खुली विक्री करण्याची परवानगी नाही. साधारणतः खासगी पार्टी, मित्रांचे गट यांच्यामध्ये प्रामुख्याने अमली पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे अशा पार्ट्यांवर लक्ष ठेवण्याबरोबरच  सरकारी रुग्णालयातूनच अमली पदार्थांचे व्यवहार होत असतील, तर सरकारी यंत्रणांचीही याबाबतीत कसून चौकशी व्हायला हवी. तरुणाईचे बदलते ट्रेंड, पाश्चिमात्त्यांचे अंधानुकरण थांबायला हवे. कुठल्याही व्यसनाचे उदात्तीकरण आणि त्याला प्रतिष्ठेचे बनवणे टाळायला हवे. व्यसनमुक्ती केंद्रे आणि पोलिसही समुपदेशन आणि इतर मार्गांनी तरुणाईचे मार्गदर्शन करतील; पण घरातूनही हे बोलले जायला हवे. परवानगी नसलेले नशेचे पदार्थ विकणे अर्थात अमली पदार्थांची तस्करी याअंतर्गत पोलिस गुन्हे दाखल करतात; पण मुळात नशा उत्पन्न करणारे आणि विकण्यास परवानगी असलेले पदार्थही वाईटच, हे तरुणाईला समजले पाहिजे. अल्कोहोलचे सेवन एकेकाळी चाचपडत होत असे; पण आता ते चित्र नाही. रेव्ह पार्टीवर छापा टाकून पुण्यात झालेली कारवाई सर्वांनाच आठवत असेल. यावरून अमली पदार्थांची तरुणांमध्ये नशा किती आहे, हे लक्षात यावे. तरुणाई म्हणजे देशाचे भवितव्य. त्यांची काळजी घ्यायला हवी. गुन्हेगारांवर जरब बसायला हवी. त्यासाठी केवळ मलमलट्ट्या नकोत. गरज आहे ती सर्वंकष प्रयत्नांची!