शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 6:14 AM

आतिशी मार्लेना सिंह या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आता त्या देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री, तर सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतरच्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला.

आतिशी मार्लेना सिंह या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असतील. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आता त्या देशातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री, तर सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतरच्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका पुढच्या फेब्रुवारीत होऊ घातल्या आहेत. म्हणजे जेमतेम पाच-साडेपाच महिने आतिशी मुख्यमंत्रिपदावर असतील. असे औटघटकेचे मुख्यमंत्रिपद सुषमा स्वराज यांना लाभले होते. १९९८ च्या ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. नंतरच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला आणि सुषमा स्वराज देशाच्या राजकारणात आल्या. आता मद्य धोरण घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे डाग धुऊन काढण्यासाठी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यासोबतच स्वत:च्या स्वच्छ प्रतिमेची जनमत चाचणी घोषित केली आहे.

जनतेने स्वच्छ कारभाराचे प्रमाणपत्र दिले तर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसू, अशी राणा भीमदेवी थाटाची घोषणा करीत ते पायउतार झाले आहेत. ही जनमत चाचणी महाराष्ट्रासोबतच दिल्लीची निवडणूक घेऊन फेब्रुवारीऐवजी नोव्हेंबरमध्येच पार पाडली जावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. मनीष सिसोदियादेखील जामिनावर बाहेर आले आहेत आणि गेले काही महिने अनाैपचारिकरीत्या पक्षातील क्रमांक तीनचे पद ज्यांच्याकडे होते अशा आतिशी मुख्यमंत्री बनत आहेत. या जबाबदारीसाठी निवड होताच त्यांनी ‘अरविंद केजरीवाल यांच्यावरील भ्रष्टाचाराचे बालंट दिल्लीची जनता दूर करील व तेच पुढचे मुख्यमंत्री असतील’, असे जाहीर केले आहे. केजरीवाल यांच्याप्रमाणेच आतिशी उच्चशिक्षित आहेत. ऑक्सफर्डमध्ये शिकल्या आहेत. ऱ्होड्स स्काॅलर आहेत. अवघ्या ४३ व्या वर्षी, अगदीच तरुणपणी त्यांना देशाच्या राजधानीचे मुख्यमंत्रिपद मिळत आहे. पक्षात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. केजरीवाल व सिसोदिया हे दोघे तुरुंगात असताना बहुतेक सगळ्या, विशेषत: दिल्लीतील शाळांचे रूपडे बदलणाऱ्या शिक्षण खात्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पेलली आहे. महत्त्वाचे म्हणजे, दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दोन, तसेच एकत्रित महापालिकेतील अनपेक्षित पराभवामुळे बैचेन असणाऱ्या भाजपकडे आतिशी यांच्यावर टीकेसाठी मोठा, ठोस व गंभीर असा मुद्दा नाही. लोकसभा निवडणुकीवेळी केजरीवाल यांना अटकेबद्दल सहानुभूती मिळू नये म्हणून प्रचाराची मुभा मिळाली का आणि आता हरयाणा विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या मतांच्या विभाजनाचे काही गणित त्यांच्या जामिनामागे आहे का, हे प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. तथापि, अशा प्रश्नांना शेंडा नसतो तसेच बुडूखही नसते.

राजधानीतील भाजप-आप-काँग्रेस हा राजकीय त्रिकाेण व त्यामधील गुंतागुंत थोडी बाजूला ठेवली तरी हे नक्की आहे की, या निर्णयामुळे पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांनी तिथला राजकीय सामना ‘आप विरुद्ध भाजप’ असा थेट बनवला आहे. केजरीवाल यांचा राजीनामा व आतिशी यांची मुख्यमंत्रिपदावर वर्णी या घडामोडींबाबत काय प्रतिक्रिया द्यावी याबाबत भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रचंड संभ्रमात आहेत. काँग्रेसचे एक बरे आहे की, त्यांनी प्रतिक्रिया दिली किंवा नाही दिली तरी फरक पडत नाही. भाजपचे तसे नाही. लोकसभेच्या दिल्लीतल्या सातही जागा जिंकणाऱ्या व केंद्रात सत्तेवर असणाऱ्या, दिल्ली पोलिसांवर गृहखात्याची हुकूमत असताना भाजपच्या प्रतिक्रियेला मात्र मोठे महत्त्व आहे. मद्यधोरणाच्या घोटाळ्यात अटक झाल्यानंतर, तिहार कारागृहात असूनही अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिला नाही या मुद्द्यावर भाजप आक्रमक होता. राजीनामा द्या, राजीनामा द्या, असा धोशा लावला होता. सहा महिन्यांनंतर कारागृहातून सुटून आल्यानंतर राजीनाम्याची घोषणा करून केजरीवाल यांनी भाजपला पहिला धक्का दिला. दुसरा धक्का आतिशी यांच्या निवडीचा होता. या दोन धक्क्यांनी भाजप गडबडल्याचे दिसते. त्या डाव्या विचारांच्या असणे, त्यांच्या मार्लेना नावाला मार्क्स व लेनिन यांचा संदर्भ असणे किंवा संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अफजल गुरू याच्या फाशीविरुद्धच्या पत्रकावर आतिशी यांच्या मातापित्यांच्या सह्या असणे, या मुद्द्यांवर भाजपने केलेली टीका हास्यास्पद आहे. विचाराने डावे असणे हा गुन्हा नाही, तसेच आई व वडिलांनी एखाद्या मुद्द्यावर घेतलेली भूमिका मुलीवर थोपविण्यात साधी तर्कसंगतीदेखील नाही. थोडक्यात, दिल्लीची राजकीय दंगल तोंडावर असताना आम आदमी पक्षाने विधानसभेची शाळा हेडमिस्ट्रेस आतिशी यांच्या हाती सोपविली आहे. या शाळेचेही रूपडे त्या बदलतात का, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

टॅग्स :delhiदिल्ली