शिवसेना नावाच्या झंझावाताने अनेकांच्या जीवनाला आकार दिला. त्यातील एक काेहिनूर हिरा म्हणजे मनाेहर गजानन जाेशी! मराठी माणसाला मायावी मुंबईत चेहरा मिळावा, त्याच्या हाताला काम मिळावे, त्याचा आत्मसन्मान वाढीस लागावा म्हणून १६ जून १९६६ राेजी शिवसेनेचा झंझावात सुरू झाला. त्याचवेळी मनाेहर जाेशी हा सामान्य कुटुंबातील युवकही या झंझावातात सहभागी झाला. एकेकाळी माधुकरी मागून पाेट भरणारा आणि मोठ्या कष्टाने शिक्षण पूर्ण करण्यासाठी झटणारा हा तरुण शिवसेनेच्या स्थापनेनंतर दाेनच वर्षांत राजकीय क्षितिजावर उदयास आला. मनोहर जोशी १९६८ मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि सलग चव्वेचाळीस वर्षे मुंबई महापालिका, महाराष्ट्र विधिमंडळाच्या दाेन्ही सभागृहांचे सदस्य आणि संसदेच्याही दाेन्ही सभागृहांचे सदस्य म्हणून त्यांनी उत्तम काम केले. राजकारणात प्रवेश केल्यानंतर मुंबईत दादरला ‘काेहिनूर’ ही शिक्षण संस्था काढून उत्तम शिक्षक असलेल्या जोशी सरांनी शिकवणीचे वर्गही सुरू केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जात. त्यांनी गरिबीचे चटके सहन केले हाेते. परिणामी गरीब तथा सामान्य माणसांच्या सुख-दु:खाविषयी त्यांच्या मनात कणव हाेती. शिवसेनेचा सैनिक म्हणून सातत्याने काम करत राहणे आणि सामान्य माणसाला शिवसेनेशी जाेडून घेणे हे काम त्यांनी अविरतपणे केले. शिवसेना हीच त्यांची राजकीय पार्श्वभूमी! घर-घराण्याची पार्श्वभूमी असण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, आपल्या कामाच्या कल्पक पद्धतीत अग्रेसर असलेले आणि सतत विनाेदीबुद्धी तल्लख ठेवणारे मनोहरपंत सगळ्यांना आपलेसे करून घेत. त्यांनी १९६८ ते १९८९ पर्यंत नगरसेवक म्हणून काम केले. १९७६-७७ मध्ये मुंबईचे महापाैरपद भूषविले. १९७२ ते १९८९ पर्यंत त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेवरही नामनियुक्त सदस्य म्हणून काम केले. १९९० मध्ये ते दादरमधून विधानसभेवर निवडून गेले. शिवसेनेचे पक्षनेते म्हणून विराेधी पक्षनेत्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. अफाट वक्तृत्त्व कलेच्या जाेरावर असंख्य विषय त्यांनी विधानसभेच्या पटलावर मांडले आणि विधिमंडळात जनतेचा आवाज बनून राहिले. शिवसेना-भाजप युतीने १९९५ मध्ये बहुमत मिळवले तेव्हा बिगर काॅंग्रेसी सरकारचे पहिले तर महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री म्हणून मनोहरपंतांना संधी मिळाली. स्वातंत्र्यानंतर मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला मिळालेला हा पहिला शहरी चेहरा.
युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून आणि प्रबळ विराेधी पक्ष असताना आपल्या खेळकर, विनाेदी शैलीने प्रसंगी कठाेर हाेत त्यांनी आपली चार वर्षांची कारकीर्द उत्तम निभावली. संसदेवर निवड हाेताच केंद्रीय मंत्रिपद मिळाले, पुढे लाेकसभेचे सभापती म्हणूनही त्यांनी उष्कृष्ट योगदान दिले. मुंबईचे महापाैर असताना ‘स्वच्छ मुंबई-हरित मुंबई’ ही माेहीम माेठ्या प्रमाणात राबवली. या माेहिमेला शब्दरूप देऊन पुस्तक प्रसिद्ध केले. अखिल भारतीय महापाैर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. विधिमंडळातील विराेधी पक्षनेत्यांचा गट असलेल्या ‘राष्ट्रीय विराेधी पक्षनेता संघा’च्या स्थापनेतही त्यांचाच पुढाकार होता. मुख्यमंत्री असताना जागतिक मराठी चेंबर ऑफ काॅमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढावी, यासाठी त्यांनी ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र’, ‘ॲग्राे ॲडव्हान्टेज महाराष्ट्र’ अशा संकल्पना राबविल्या. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुंबईत फ्लायओव्हर्स, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात पुढाकार घेतला. या साऱ्याचे श्रेय मुख्यमंत्री म्हणून मनाेहर जाेशी यांनाच जाते. पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खाेऱ्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कर्जराेख्यांद्वारे निधी उभा करण्याचे धाडस मनाेहर जाेशी यांनीच केले. परिणामी, कृष्णा खाेऱ्यातील रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लागले. त्यासाठी कृष्णा खाेरे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. टॅंकरमुक्त महाराष्ट्राची संकल्पना राबविण्यात आघाडी घेतली. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची सुरूवातही त्यांनी केली. त्यांच्या निधनाने शिवसेनेने एक सच्चा शिवसैनिक गमावला आहे आणि महाराष्ट्राने एक सुसंस्कृत, अभ्यासू, स्वत:च्या संकल्पनांनी शासक म्हणून प्रभाव पाडणारे नेतृत्त्व गमावले आहे. गेली काही वर्षे मनाेहर जाेशी यांची तब्बेत बरी नव्हती. त्या अवस्थेत गेल्या दीड वर्षात शिवसेनेमधील फूट त्यांना पाहावी लागली. एक सच्चा शिवसैनिक म्हणून त्या घडामोडींचा त्यांना किती त्रास झाला असेल, याची कल्पना करता येते. तरीही शक्य त्या सर्व प्रकारे समाजासाठी सातत्याने झटून काम केल्याचे समाधानही त्यांना निश्चित मिळाले असेल. त्यांच्या स्मृतीस अभिवादन !