पाकिस्तानात ज्या घडामोडीची अनेक दिवसांपासून अपेक्षा होती, ती माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक अखेर मंगळवारी झालीच! गत अनेक दिवसांपासून निवासस्थानी व न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात समर्थक गोळा करून, इम्रान खान अटक टाळत आले होते; पण ती कधीतरी अपेक्षित होतीच! त्यांना ज्या प्रकारे अटक करण्यात आली, ते मात्र सुसंस्कृत जगासाठी अनपेक्षित होते. इम्रान खान यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. अशाच एका प्रकरणात ते न्यायालयात उपस्थित झाले असताना, पाकिस्तानी रेंजर्स या निमलष्करी दलाचे जवान चक्क न्यायालयाच्या इमारतीच्या खिडकीची काच फोडून आत शिरले आणि त्यांना अटक केली. एवढेच नव्हे तर रेंजर्स त्यांना चक्क धक्काबुक्की करीत, गळा पकडून घेऊन गेले. राजकीय नेत्यांना, माजी सत्ताधाऱ्यांना अटक होणे तसे नवे नाही. जगभर अनेकदा असे झाले आहे; पण ते करताना किमान कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जाते. इम्रान खान यांना अटक करताना मात्र तमाम स्थापित प्रक्रिया धाब्यावर बसविण्यात आल्या, हे दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून बघायला मिळाले.
मुळात एखाद्या आरोपीला पोलिसांऐवजी निमलष्करी दलांनी अटक करणे, हेच अनाकलनीय आहे. इम्रान खान न्यायालयातील प्रक्रिया पूर्ण करून बाहेर पडल्यावरही त्यांना अटक करता आली असती. मंगळवारी न्यायालयाच्या परिसरात इम्रान खान यांचे समर्थक खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते, असेही नाही. त्यामुळे इम्रान खान यांना नाट्यमय रीतीने अटक करून सत्ताधारी, सेना व गुप्तचर संस्था आयएसआयला एक संदेश द्यायचा होता, असे दिसते. इम्रान खान सत्तेत असताना, त्यांचे सेना आणि आयएसआयसोबत चांगलेच गूळपीठ होते; परंतु सत्तेतून पायउतार झाल्यापासून ते सेना व आयएसआयलाच धारेवर धरत होते. इम्रान खान पंतप्रधान असताना, विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ, त्यांचे बंधू व माजी पंतप्रधान नवाज शरीफ, नवाज शरीफ यांची कन्या मरियम शरीफ, सत्ताधारी युतीतील प्रमुख पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते आसिफ झरदारी या सगळ्यांना अटक झाली होती. त्यामुळे इम्रान खान यांनाही कधी ना कधी अटक होणे अपरिहार्य होतेच! पाकिस्तानचा इतिहासच त्याची साक्ष देतो. सत्तेतून पायउतार झाल्यावर झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर लटकविण्यात आले, तर नवाज शरीफ व परवेज मुशर्रफ यांना देशातून परागंदा व्हावे लागले, हा पाकिस्तानचा इतिहास आहे. अन्य एक लष्करशहा झिया उल हक पदासीन असताना विमान अपघातात झालेला त्यांचा मृत्यूही संशयास्पदच आहे.
त्यामुळेच आता जिवाचे बरेवाईट होण्याची भीती इम्रान खान यांनाही वाटत आहे. तसे त्यांनी अनेकदा बोलूनही दाखविले आहे. त्या भीतीपोटीच त्यांनी आजवर प्रत्येक वेळी स्वत:च्या निवासस्थानी आणि न्यायालयाच्या परिसरात समर्थकांना मोठ्या प्रमाणात गोळा केले. वातावरण चिघळण्याच्या भीतीने पोलिसांनी त्यांना अटक करण्याचे टाळले आणि न्यायाधीशांनीही ते न्यायालय कक्षात उपस्थित नसतानाही त्यांना जामीन मंजूर केले. बहुधा त्यामुळेच त्यांना धडा शिकविण्यासाठी जिद्दीला पेटलेल्या सत्ताधारी, सेना व आयएसआयने मंगळवारी इम्रान खान यांचे फार समर्थक न्यायालय परिसरात उपस्थित नसल्याचे बघून, न्यायालयाची बेअदबी होण्याचीही तमा न बाळगता, निमलष्करी दलाकरवी त्यांना अटक केलीच! सत्ताधाऱ्यांना जे करायचे होते, ते तर त्यांनी केले; पण त्यासाठी जो मार्ग पत्करण्यात आला, त्यामुळे न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत; तर दुसरीकडे, इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या पक्षाने उग्र निदर्शने सुरू केली आहेत. इम्रान खान हे तसे लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या आवाहनावर लाखो समर्थक रस्त्यावर उतरत असत; पण आता त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे दुसऱ्या फळीतील नेतृत्व समर्थकांना कितपत प्रेरित करू शकेल, या संदर्भात शंकाच आहे. इम्रान खान यांना लवकर जामीन मिळू शकला नाही आणि समर्थकांचा प्रारंभीचा उत्साह कालौघात ओसरला, तर इम्रान खान यांना कदाचित बराच काळ गजाआड घालवावा लागेल. सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न तोच असणार आहे. तसे झाल्यास त्यांच्या पक्षापुढे अस्तित्वाचेच संकट उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे आधीच अराजकतेच्या वाटेवर निघालेल्या पाकिस्तानची स्टोरी यापुढे कशी उलगडत जाते, हे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांसाठी औत्सुक्याचे ठरणार, हे मात्र निश्चित!