लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात झाडून सारे पक्ष ऊठसूट रोज नारीशक्ती वंदनेच्या भूपाळ्या गात असताना आणि महिला सशक्तीकरणाची वचने, गॅरंटी दिली जात असताना कर्नाटकातील विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला आहे. वोक्कालिगा जातीच्या भरवशावर दक्षिण कर्नाटकावर वर्षानुवर्षे सत्ता गाजविणाऱ्या धर्मनिरपेक्ष जनता दलाचा हासनचा तेहतीस वर्षांचा खासदार प्रज्वल रेवण्णा याने शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. निवडणूक प्रचारकाळात त्या अत्याचाराचे व्हिडीओ बाहेर येऊ लागले होते. शुक्रवारी तिथे मतदान आटोपले आणि शनिवारी सकाळच्या विमानाने प्रज्वल रेवण्णा जर्मनीतील फ्रैंकफर्टला पळून गेला. अत्याचाराची पहिली तक्रार दाखल होताच कर्नाटक सरकारने या वासनाकांडाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची घोषणा केली. त्यानंतर पुढे आलेले या प्रकरणाचे तपशील अत्यंत किळसवाणे व संतापजनक आहेत. शिवाय, ते वाचून ऐकून भीतीने अंगावर काटाही उभा राहतो. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा हा बिघडलेला नातू, राज्यात मंत्री राहिलेल्या एच.डी. रेवण्णा यांचा दिवटा एक नव्हे, दोन नव्हे किंबहुना शेकडो महिलांच्या अब्रूवर हात टाकतो.
आपली ही वासनांध घाणेरडी वृत्ती-कृती मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपतो आणि लॅपटॉपवर थोडेथोडके नव्हे तर तीन हजारांच्या आसपास व्हिडीओ क्लीप जमा करतो. त्यात घरकाम करणाऱ्या बायका आहेत. राजकारणात पुढे जाण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आणि त्यासाठी कर्नाटकातील या फॅमिली नंबर वनमधील सदस्यांशी संपर्क वाढविणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. काही प्रशासकीय अधिकारीही आहेत. डोके भणाणून सोडणारी गोष्ट म्हणजे देवेगौडा, त्यांचा मुलगा रेवण्णा यांना खाऊ घातल्याचे सांगत साडीला हात घालू नको अशी हात जोडून विनवणी करणारी, ओक्साबोक्सी रडणारी प्रज्वलच्या आजीच्या वयाची एक ६८ वर्षीय वृद्धाही त्यात आहे. हासन हे शहराचे नाव हासनंबा देवीच्या नावावरून पडले आहे. नेमक्या त्याच ठिकाणी माताभगिनींच्या अनुचे धिंडवडे निघावेत, लोकप्रतिनिधी म्हणून ज्याला संसदेत पाठवले, विश्वासाने ज्याच्या खांद्यावर डोके टेकविले, आशा-आकांक्षा ज्याच्या हाती सोपविल्या त्यानेच वासनेचा असा बाजार भरवावा, हे अत्यंत वेदनादायी आहे. खरे तर वाईट आणि अपरिहार्यदेखील बाब ही, की या स्कँडलने राजकीय वळण घेतले आहे. देवेगौडांनी पंतप्रधानपद, मुख्यमंत्रिपद भूषविले असल्याने वासनाकांडाला राजकीय वळण मिळणारच, स्वतः पाचवेळा विजय मिळविलेला हक्काचा मतदारसंघ गेल्यावेळी भानगडबाज नातवाला देणारे देवेगौडा यांनी अजून तोंड उघडलेले नाही. धर्मनिरपेक्ष जनता दलाने तीन दिवसांनंतर प्रज्वलला पक्षातून निलंबित केले. जो करेल तो भरेल, असे म्हणत प्रज्वलचे काका, माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी हात झटकले. दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यात मुलासोबत वडील रेवण्णा हेदेखील आरोपी आहेत.
हे व्हिडीओ चार-पाच वर्षे जुने आहेत, आपल्याविरुद्ध हे षडयंत्र आहे, असा रेवण्णांचा मखलाशीवजा बचाव आहे. तथापि, जेडीएससोबत युती करून कर्नाटकात मागच्यासारखेच मोठे यश मिळविण्याची स्वप्ने पाहणान्या भारतीय जनता पक्षाची खरी अडचण झाली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या वासनाकांडाची माहिती गेल्या डिसेंबरमध्येच पक्ष नेतृत्वाला दिली होती. परंतु, राजकारणापुढे अशा पत्रांना किंमत नसते. आता ही भानगड गळ्याशी येताच आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे फेक व्हिडीओची टूम सोडली गेली आहे. मातृशक्तीचा जयजयकार करणाऱ्यांची वाचा बसली आहे. त्याचप्रमाणे, हा राज्य सरकारच्या अखत्यारितला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असूनही कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने आधीच कारवाई का केली नाही, असा उलटा आणि तितकाच विनोदी प्रश्न भाजप विचारत आहे. असेच होते तर पश्चिम बंगालमधील संदेशखालीचा मामला तिथल्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर सोपविण्याऐवजी तिथे भाजपच्या नेत्यांनी पर्यटन का केले, हा प्रश्न देश भाजपला विचारल्याशिवाय राहणार नाही. परंतु, खरी समस्या वासनाकांडाचे राजकारण ही नाहीच. सुन्न, निराश, हताश करणारी गोष्ट ही आहे, की स्त्रीला शक्तीचे रूप मानणारा, तिला देवी बनवून मखरात बसवणारा हा देश प्रत्यक्षात तिच्याकडे मादी म्हणूनच पाहतो. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे बिरुद मिरविणारा देश महिलांसाठी अजिबात सुरक्षित नाही. वासनांधांना कायद्याचा धाक नाही आणि ज्यांच्यावर महिलांचा आत्मसन्मान, टिकविण्याची जबाबदारी त्यांच्यापासूनच तिला अधिक धोका आहे. प्रज्वल रेवण्णाला देशात आणून कठोर शिक्षा दिली तरच हे खोटे आहे असे वाटेल.