शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

गोव्यात काय मरायचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 8:47 AM

गोवा किलर स्टेट झाले आहे काय असे गोव्याबाहेरील पर्यटक अलिकडे विचारतात. होय, गोव्याचे रस्ते सध्या रक्ताने माखले आहेत असेच नमूद करावे लागेल.

गोवा किलर स्टेट झाले आहे काय असे गोव्याबाहेरील पर्यटक अलिकडे विचारतात. होय, गोव्याचे रस्ते सध्या रक्ताने माखले आहेत असेच नमूद करावे लागेल. यात काहीजणांना अतिशयोक्तीही वाटेल, पण तीन दिवसांत सात बळी जातात हे भयावहच आहे. अगदी कोवळ्या वयातील मुलांचे रक्त रस्त्यावर सांडत आहे. यावर्षी जानेवारी ते १६ सप्टेंबरपर्यंत दोनशे व्यक्तींचे बळी रस्ता अपघातात गेले आहेत. यात अनेक युवक आहेत. एकोणीस ते चाळीस वयोगटातील युवा-युवती रस्त्यावर मरत आहेत. कधी टक चालक. बस चालक किंवा चारचाकी कारसारख्या वाहन चालकांचा दोष असतो, तर कधी दुचाकी चालकच पूर्ण दोषी असतात. अत्यंत बेजबाबदारपणे आजचा युवक दुचाक्या चालवतोय. पणजी, दोनापावल, मिरामार, गोवा विद्यापीठ रस्ता, करंजाळे या भागात जाऊन पाहा किंवा मडगाव, फोंडा, डिचोली, मडगाव, वास्को या शहरांना भेट देऊन अभ्यास करा. दुचाकी चालक सुसाट वेगाने जातात. कुठून चार चाकी येतेय किंवा कुठून ट्रक येतोय ते पाहात नाहीत. जिथे छोटी वाट आहे, तिथून घुसण्याचा प्रयत्न करतात. सरकारी यंत्रणा सध्या हप्ते गोळा करण्याच्या कामात बिझी आहे. ते फक्त गोव्याबाहेरील वाहनांना थांबवायचे, महाराष्ट्रातील ट्रकांना अडवायचे किंवा पर्यटकांना छळायचे एवढेच काम करतात. गोवा वाढते वाहन अपघात व वादग्रस्त पोलिसांमुळे बदनाम होत आहे.

वाहन अपघात रोखण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वारंवार वाहतूक पोलिस, आरटीओ, बांधकाम खाते यांच्या बैठका घ्यायला हव्यात. मात्र मुख्यमंत्री तसे करताना दिसत नाहीत. विद्यमान सरकारमधील अधिकाधिक मंत्री आणि मुख्यमंत्रीदेखील देव दर्शनासाठी जास्त वेळ देत आहेत. धार्मिक विधीतच जास्त वेळ जात आहे. गोव्यात महामार्ग बांधले गेले. काही रस्ते सहा पदरी तर काही आठपदरी केले गेले. उड्डाण पूल झाले. बायपासची व्यवस्था केली, पण वाहन चालकांमध्ये शिस्त आलेली नाही. जिथे वाहतूक पोलिस किंवा आरटीओ असायला हवेत तिथे ते नसतातच. पणजीत अटल सेतूवरून दुचाकी नेऊ नये हे पर्यटकांना कळत नाही. त्यांना ते कळावे म्हणून पर्वरीच्याबाजूने पोलिसांनी उभे राहून त्यांना योग्य रस्ता दाखवायला हवा. मात्र पोलिस उभे राहतात मेरशीच्या बाजूने. तुम्ही तिसऱ्या पुलावरून दुचाकीने येण्याचा गुन्हा करा, मग आम्ही तुम्हाला अडवून तालांव देतो, अशा पराक्रमी थाटात पोलिस उभे असतात.

बिचारे पर्यटक आपल्या बायको-मुलांसह रणरणत्या उन्हात तालांव भरताना रोज दिसतात. मुख्यमंत्री सावंत किंवा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो किंवा डीजीपी वगैरेंना हे चित्र दिसत नाही काय? हा पर्यटकांचा छळ का म्हणून केला जातो? पर्यटकांना तालांव देण्यातच शक्ती वाया घालवणाऱ्या गोवा पोलिसांनी जिथे वाहतूक कोंडी होते किंवा जी अपघातप्रवण स्थळे आहेत, तिथे उभे राहणे गरजेचे आहे. पेडणे तालुका तर अॅक्सिडंट हब झाला आहे. तेथील महामार्गावरील धोकादायक वळणांनी व अन्य जागांनी अनेकांचे बळी घेतले आहेत. रस्त्यांवर खड्डे असले तरी माणसे मरतात आणि रस्ते रुंद व दुरुस्त झाले तरी अपघात घडतात. दारू पिऊन वाहन चालवणारे गोव्यात कमी नाहीत.

सायंकाळनंतर तर काही मार्गावर वाहन चालविणे धोकादायकच. आई वडील तरुण मुलाला आधुनिक पद्धतीची दुचाकी घेऊन देतात. ही मुलं वाट्टेल तशी दुचाकी उडवतात. अल्कोमीटरने वाहन चालकांची तपासणी करण्याचे काम सरकारी यंत्रणेने पुन्हा बंद केले आहे. रस्त्यांवरील वळणे कापणे किंवा धोकादायक पद्धतीने उभे असलेले वीजखांब अन्यत्र हलविणे हे काम यंत्रणा करत नाही. सरकारला फक्त कोट्यवधींच्या उधळपट्टीचे सोहळे करण्यात रस आहे. गेल्या साडेआठ महिन्यांत एकूण १ हजार ८०० वाहन अपघात झाले आहेत. १९० अपघात भीषण आहेत. कुणी अपंग झाले तर कुणी कायमचे जीवास मुकले. प्रत्येक तीन दिवसांत हेल्मेट नसलेला एक दुचाकी चालक गोव्यात ठार होतोय ही सरकारी आकडेवारी आहे. २०२१ ते २०२३ पर्यंत साडेतीनशे दुचाकीस्वार प्राणास मुकले, ज्यांनी हेल्मेट घातले नव्हते. गोवा किलर स्टेट नाही, हे दाखवून देण्यासाठी सरकारलाच आता कडक उपाययोजना करावी लागेल.