- सुधीर महाजन
शेतीच्या वर्तमान काळातील समस्या म्हटल्या तर लहरी निसर्ग, शेतमालाला न मिळणारा बाजारभाव आणि बियाणे-खते-मजुरी यांचे वाढलेले दर आणि सर्वात महत्त्वाचे सरकारचे शेतीप्रती उदासिनता. हे प्रश्न जागतिक पातळीवरचे आहेत आणि जगभरातील शेतकऱ्यांची कमी अधिक प्रमाणात अशीच अवस्था आहे. रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या होणाऱ्या घटना पाहता त्याविषयीची संवेदना बोथट होत चाललेली दिसते. सरकारकडे धोरणाचा आभाव म्हटल्यापेक्षा शेती व शेतमालाविषयी बोटचेपी भूमिका कारण काय तर मतपेढी. देशात ग्रामीण मतदारांचे प्रमाण कमी होतांना दिसते त्यामुळे शहरी मध्यमवर्गीय मतदारांचे अनुनय करण्यासाठी शेतमालाचे भाव सरकार वाढवत नाही की नियंत्रण मुक्त करत नाही. शिवाय देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा झपाट्याने कमी होत १७/१८ टक्यावर आला, तसे शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्याही घटली. शहरीकरणाचा हा परिणाम आहे.
आजचे शेती पुढचे प्रश्न हे असले तरी यापेक्षा वेगळ्या समस्येने शेती हळुहळु अडचणीत येत असून येत्या काही वर्षात ही समस्या गंभीर स्वरूप धारण करणार. आज शेती करणारा जो गट आहे तो झपाट्याने वृद्धत्वाकडे झुकत असतांना तरुणांनी शेतीकडे पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांची मुले शेती करण्यास उत्सुक नाही. चांगली शेती असतांनाही मिळणारी कोणतीही नोकरी शोधून शहरात जाण्यात तो उताविळ दिसतो. याचे महत्त्वाचे कारण समाजात शेतीला प्रतिष्ठा राहिली नाही. २०५० पर्यत भारताची लोकसंख्या १ अब्ज ९० कोटीवर असेल त्यावेळी दोन तृतींश मध्यमवर्गाची लोकसंख्या असणार आहे याचाच अर्थ शेतकऱ्याच्या संख्येत कमालीची घट होणार. आज देशातील शेतकऱ्याच्या सरासरी वयाचा विचार केला तर ते ५०.१ वर्ष आहे म्हणजे भरतीय शेती वृद्धत्वाकडे वाटचाल करतांना दिसते. याचाच अर्थ गेल्या २५ वर्षात तरुण शेतीकडे पाठफिरवतांना दिसतात आज त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते.
एकीकडे लोकसंख्या वेगाने वाढत असतांना शेतकऱ्यांची संख्या कमी होताना दिसते त्याचा परिणाम अन्नधान्य उत्पादनावरही होणार आहे. तीस वर्षांनंतर अंदाजे दोन अब्ज जनतेचे पोट भरण्यासाठी कृषी उत्पादनात त्यागतीने वाढविण्याची योजना तयार करावी लागेल. २०११ साली झालेल्या जनगणनेच्या आधारावर आकडेवारीचा विचार केला तर त्यावेळी ७० टक्के युवक ग्रामीण भागातील होते; पण त्यापैकी फारच थोड्या तरुणांनी शेती हा रोजगाराचा मार्ग स्वीकारला. या आकडेवारीच्या आधारावर समीकरण मांडले तर दररोज दोन हजार शेतकरी हा व्यवसाय सोडत आहेत. अॅन्युअल स्टेट आॅफ एज्युकेशन रिपोर्ट या अहवालाचा अभ्यास केला तर त्यांनी ३० हजार ग्रामीण युवकांचे सर्वेक्षण केले यात केवळ १.२ टक्के मुलांची शेती करण्याची इच्छा आहे. १२ टक्के मुलांना लष्करात भरती व्हायचे आणि १८ टक्के मुलांना इंजिनिअर व्हायचे आहे. ग्रामीण शेतीमध्ये सर्वात जास्त रोजगार महिलांना असला तरी आता २५ टक्के तरुणींना शिक्षण क्षेत्रात रस आहे. शेतमजुरांची संख्या झपाट्याने कमी झाली आणि मजुरांची टंचाईच निर्माण झालेली दिसते. भारतीय शेतीसमोरची ही सर्वात गंभीर समस्या आहे. संशोधन, यांत्रिकीकरण या आघाड्यांवर आपण पिछाडीवर आहोत. शेती शिक्षणातही प्रगती नाही. अशा एक ना अनेक प्रश्नांनी शेतीला वेढले आहे.