- किरण अग्रवाल
निवडणूक विषयक आढावे घेऊन झालेत, तयारीही अंतिम टप्प्यावर आहे; पण महायुती व महाआघाडी अंतर्गत कोणती जागा कोणाला व उमेदवार कोण हेच समोर आलेले नसल्याने अनिश्चितता व संभ्रम टिकून आहे, जे उत्कंठावर्धकच ठरले आहे.
लोकसभा निवडणुक आता अगदीच जवळ आली आहे, या दोन चार दिवसातच त्यासंबंधीची घोषणा होऊन आचारसंहिता जारी होण्याची शक्यता असल्याने राजकीय परिघावरील लगबग वाढली आहे; मात्र अजूनही विशेषता आपल्याकडील जागा महाआघाडी व महायुती अंतर्गत कोणाला सुटेल व तेथील उमेदवार कोण असेन याची स्पष्टता नसल्याने संभ्रम कायम आहे.
राजकीय पडघम दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहेत. स्थानिक पातळीवरील तयारीला तर वेग आला आहेच, शिवाय राष्ट्रीय नेत्यांचे आढावे व बैठकांनीही वातावरण ढवळून निघत आहे. धामधुम वाढली आहे, वाजंत्री वाजते आहे; पण (उमेद)वराचाच पत्ता नाही अशी स्थिती आहे. बरे, मोठ्या व तुल्यबळ म्हणविणाऱ्या पक्षांचेच जागावाटप व उमेदवार अजून समोर आलेले नसल्याने तुलनेने लहान पक्षांकडून अपेक्षा करण्यात अर्थ नाही. यात ऐन वेळच्या उमेदवाराला मोठ्या पक्षांचे पाठबळ खऱ्या अर्थाने कामी येईलच, परंतु तुलनेने मर्यादित बळ असणारे पक्ष व त्यांच्या उमेदवारांची दमछाक होणे निश्चित आहे.
केंद्रीय गृहमंत्री व सत्ता पक्षातील मातब्बर नेते अमित शाह नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेलेत. अकोल्यातही बैठक घेऊन त्यांनी सहा लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. बूथ स्तरावरील यंत्रणांना कामाला लागण्याच्या सूचना देतानाच महायुती अंतर्गत उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, तो भाजपाचा असल्याचे समजून काम करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. शाह यांचे अकोल्यात ठिकठिकाणी ज्या जल्लोषात स्वागत झाले ते पाहता पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावून गेले. मात्र या दौऱ्यानंतरही कुठला उमेदवार कोण, याबाबत स्पष्टपणे सांगता येऊ नये अशी स्थिती खुद्द भाजपातच आहे. अर्थात हे केवळ भाजपातच आहे असे नाही, प्रतिस्पर्धी काँग्रेस महाआघाडीचेही उमेदवार वा जागावाटप अद्याप नक्की नाही.
महाआघाडीत ''वंचित''चा समावेश होवो अगर न होवो, ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील आपली उमेदवारी घोषित केलेली आहे. तिकडे वाशिम - यवतमाळसाठी विद्यमान खासदार शिवसेना शिंदे गटाच्या भावना गवळी यांनी ''मेरी झासी नही दूंगी'' म्हणत पुन्हा लढण्याचे स्पष्ट केले आहे. असे असताना महाआघाडी अंतर्गत अकोल्याची जागा व महायुतीमध्ये वाशिमची जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाईल हे स्पष्ट झालेले नाही. दुसरीकडे अकोल्यात भाऊसाहेब फुंडकर यांच्यापासून ते संजय धोत्रे यांच्या पर्यंतचा भाजपाचा सततचा विजय पाहता हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणवला जातोय खरा, पण असे असताना यंदा येथील उमेदवार नक्की कोण हे गुलदस्त्यातच आहे. वाशिममध्ये सहयोगी शिवसेना शिंदे गटाकडे खासदारकी असली तरी तेथे भाजपाच्या जोर बैठका अधिक सुरू आहेत.
बुलढाणा जिल्ह्यात मागे शिवसेनेचे उद्धव ठाकरे येऊन गेलेत, त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारीची घोषणा अपेक्षिली जात होती; पण तसे काही झाले नाही. अर्थात विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याही उमेदवारी बाबत संभ्रमच असल्याने सर्वांच्याच हाती ''वाट बघणे'' आले आहे. अशात, उमेदवारीच्या रेसमध्ये अनेकांची नावे चर्चिली जात आहेत, मात्र तेवढ्या समाधानाखेरीज नक्की काही नसल्याने वैयक्तिक प्रचाराने वेग घेतल्याचे दिसून येऊ शकलेले नाही. संपूर्ण पश्चिम वऱ्हाडात सद्यस्थितीत फक्त अकोल्यातील प्रकाश आंबेडकर यांचाच वैयक्तिक प्रचार दिसून येत आहे. बाकीच्या सर्वांचीच ''सावधपणे'' पावले पडत आहेत.
सतत यशाचे तोरण बांधलेले विद्यमान खासदार असतांना व सत्तारूढ पक्षाची मातब्बरी असूनही उमेदवार निश्चित का होईनात हा यातील खरा प्रश्न आहे. नेत्यांचे आढावे घेऊन झालेत, निवडणूक तयारीचे पक्ष पातळीवरील नियोजनही तयार आहे; किंबहुना पक्षीय पातळीवरील मतदारांची मशागतही सुरू झाली आहे, तरी उमेदवारांची निश्चिती नाही. यातील अविश्वास व अनिश्चिततेच्या कारणामुळेही उद्या काय?ची उत्सुकता वाढीस लागून गेली आहे.
सारांशात, निवडणुकीची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही जागा वाटपाची व उमेदवारांची निश्चिती नसल्याने संभ्रमाचेच ढग दाटून आहेत. त्यामुळे एकदाच्या निवडणुकीच्या तारखा घोषित होण्याकडे व त्यानंतर सारे चित्र स्पष्ट होण्याची उत्कंठा लागून राहणे स्वाभाविक बनले आहे.