डॉ. रीता श्रीकांत पाटील
आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपली काम करण्याची आणि जगण्याची पद्धत बदलणे अपेक्षित आहे. AI चा अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान (ET) यांची सांगड कशी घालता येईल, याची चर्चा आता सुरू झाली आहे. सध्या मानवाकडून केली जाणारी बरीच कामे निकट भविष्यात रोबोटद्वारे करून घेतली जातील. त्याच वेळी, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे नवीन रोजगार निर्माण होतील. या येऊ घातलेल्या बदलांचे शिक्षण क्षेत्रावर महत्त्वाचे परिणाम होणार आहेत. शाळांनी विद्यार्थ्यांना श्रमिक बाजारात स्पर्धात्मक राहण्यासाठी तयार केले पाहिजे आणि माध्यमिक नंतरच्या संस्थांनी विद्यार्थ्यांना आणि विस्थापित कामगारांना संबंधित शिक्षण आणि पुनर्प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तंत्रज्ञानातील नवकल्पना शिक्षक, विद्यार्थी आणि इतरांना पुन्हा प्रशिक्षण आणि रोजगार मिळवून देणाऱ्यांना मदत करण्यासाठी नवीन साधनेदेखील तयार करतील.
समस्या सोडवणे, टीमवर्क, गंभीर विचार, संप्रेषण, आणि सर्जनशीलता या क्षेत्रांमधील कामावर ऑटोमेशनचा फार परिणाम होणार नाही. त्यामुळे शैक्षणिक व्यवसायात कर्मचाऱ्यांच्या मागणीत मोठी घट होण्याची शक्यता नाही. कामाचे स्वरूप बदलत असतानाही नोकरीच्या बाजारपेठेत स्पर्धात्मक राहण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे हे शिक्षकांना प्रामुख्याने करावे लागेल. विश्लेषण करता येणे, समस्या सोडवण्याच्या दिशेने विचार करता येणे आणि इतरांना बरोबर घेऊन “टीमवर्क” करता येणे या कौशल्यांची भविष्यात मोठी गरज असेल. शास्त्र, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या विषयांमधली अव्वलता विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक भविष्यात टिकून राहण्यास मोठी मदत करतील.
AI आणि ETमधील बदल आव्हाने निर्माण करत असताना, ही तांत्रिक प्रगती संधीदेखील निर्माण करतेच. कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवकल्पना शिक्षकांना मौल्यवान साधने प्रदान करू शकतात. मिश्रित शिक्षण, “रिअल-टाइम डेटा’चा वापर, प्रत्येक विद्यार्थ्याचा कल / क्षमता लक्षात घेऊन केल्या गेलेल्या वैयक्तिक सूचना हे भविष्यकाळातील शिक्षणाच्या प्रक्रियेचे प्रमुख साथीदार असतील. वर्गात सरसकट दिल्या जाणाऱ्या शिक्षणाऐवजी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गतीने शिकायला, समजून घ्यायला मदत करणे एआयमुळे शिक्षकांना शक्य होऊ शकेल. या नवा तंत्रज्ञानामुळे स्व-अभ्यास (सेल्फ स्टडी) ची संस्कृती विकसित करणे आपल्याला शक्य होईल. एआय आणि इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर एकाचवेळी मोठ्या संख्येने वापरता येतील अशी शिक्षण-साधने तयार करण्यासाठी केला जाऊ शकेल. भारतासारख्या लोकसंख्याबहुल देशात शिक्षणाच्या पारंपरिक प्रक्रियेतले अनेक अडथळे दूर करण्यासाठी हे तंत्रज्ञान
शिक्षकांच्या मदतीला येईल.परदेशातील काही विद्यापीठे या नवकल्पनांवर काम करत आहेत. त्यातून नवी साधने विकसित होतील. बहुसंख्येने असलेल्या विद्यार्थ्यांना एकाचवेळी मदत करतील अशी साधने विकसित करण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर केला जात आहे. बदलत्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी नवी कौशल्ये शिकणे गरजेचे असलेल्या प्रौढांना मदत करतील आणि या सर्वांना रोजगाराच्या संधींशीही जोडतील !
AI, ब्लॉकचेन, रोबोटिक्स, कॉम्प्युटर व्हिजन, ड्रोन, ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग, नैसर्गिक भाषा प्रक्रिया यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये धोरण / रणनीती आखण्याच्या कामात हा विभाग सध्या गुंतलेला आहे.
मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष वापरात आलेले असूनही एआयला अजूनही ‘उभरते’ तंत्रज्ञान असेच म्हटले जाते, कारण त्यामध्ये सातत्याने आणि वेगवान उत्क्रांतीच्या शक्यता अक्षरश: अगणित आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन २०१७ साली जे म्हणाले होते ते खरेच आहे ! पुतीन म्हणाले होते, “जो कोणी विद्यमान एआय शर्यतीचे नेतृत्व करेल तोच उद्याच्या जगाचा शासक होईल”!
(लेखिका नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ सल्लागार, आहेत)