जागतिक एड्स दिन जगभरात १ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. गेल्या तीन दशकांत एचआयव्ही / एड्सच्या नियंत्रणासाठी जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर लक्षणीय कार्य झाले आहे. सध्या जगातील प्रत्येक चार एचआयव्ही बाधितांपैकी तीन जणांना त्यांच्या आजाराविषयी माहिती आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अहवालानुसार, एचआयव्ही रोगाच्या नियंत्रणासाठी एचआयव्ही संसर्गित व्यक्तींचे लवकरात लवकर निदान करणे व त्यांच्यापर्यंत उपचार व प्रतिबंध सेवा पोहोचणे यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.
एड्स किंवा एचआयव्ही रोग बऱ्याच देशांसाठी गंभीर आरोग्य समस्या निर्माण करत आहे. भारतात एड्सची पहिली केस १९८६ साली आढळली होती. भारताने एचआयव्हीविरुद्ध लढण्यासाठी तपासणी केंद्रे सुरू केली. त्यानंतर ही लढाई व्यापक स्तरावर लढण्यासाठी नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम सुरू करण्यात आला. एड्सविरुद्ध लढण्यासाठी प्रतिबंध हा मुख्य आधार मानून एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एड्सविषयी माहिती, शिक्षण व संवाद साधण्यावर भर देण्यात आला.
जागतिक पातळीवर एड्स निर्मूलनासाठी २०३० पर्यंत ९०-९०-९० लक्ष्य गाठायचे आहे. म्हणजेच, मुंबई शहरातील ९० टक्के एचआयव्ही बाधितांना शोधणे, एचआयव्ही बाधितांपैकी ९० टक्के रुग्णांचे उपचार सुरू करणे आणि उपचार प्रक्रियेत असणाºया ९० टक्के बाधितांमध्ये आजार आटोक्यात आणणे हे लक्ष्य गाठायचे आहे. दुर्दैवाने अजूनही एचआयव्ही तपासणीसाठी लोक स्वत:हून पुढे येत नाहीत. एचआयव्ही आजारासंबंधी भय आणि गैरसमज यामुळे जोखमीचे वर्तन असणारे तसेच युवावर्ग एचआयव्ही तपासणी करून घेत नाही. पर्यायाने जोखीममुक्त लैंगिक वर्तनासंबंधी समुपदेश व इतर प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकत नाही.
आपल्याकडे नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनची स्थापना १९९० साली करण्यात आली. जिचा मुख्य उद्देश एचआयव्ही संसर्ग बाधितांची संख्या वाढण्यापासून रोखणे आणि त्यापासून होणारे मृत्यूदर कमी करणे होता. सध्या आपला देश कार्यक्रमाच्या पाचव्या टप्प्यात असून रोगप्रतिबंधक प्रतिसाद वाढण्यासाठी प्रत्येक एचआयव्ही बाधिताला मोफत उपचार मिळण्यासाठी अँटी रेट्रो वायरल थेरपी म्हणजेच एआरटी केंद्रांशी जोडले जात आहे. आता आमच्या देशात ५३६ मुख्य एआरटी केंद्रे व ११०८ उप एआरटी केंद्रे सुरू आहेत. ज्यांच्याद्वारे मोफत अँटी व्हायरल उपचार आणि समुपदेशन सेवा पुरवली जात आहे.
२००० ते २०१५ या दरम्यान नवीन एचआयव्ही संसर्ग वाढण्याच्या दरात ६६ टक्के घट झाली आहे. ही घट जागतिक सरासरी ४१ टक्केच्या तुलनेत लक्षणीय आहे. भारताने एड्सविरुद्ध जागरूकता निर्माण होण्यासाठी रेड रिबीन एक्स्प्रेस नावाची ट्रेन सुरू केली आहे. या ट्रेनचा शुभारंभ २००९ मध्ये जागतिक एड्स दिनी झाला होता. या ट्रेनमध्ये एचआयव्ही आणि एड्सविषयी माहिती देण्यासाठी प्रदर्शन मांडले आहे. ज्याद्वारे प्रेक्षकांना पुरेपूर माहिती मिळून त्यांच्या शंकांचे निरसन होईल. या ट्रेनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. भारताच्या संसदेने एचआयव्ही आणि एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा २०१७ नुकताच संमत केला असून याद्वारे एड्सचे २०३० सालापर्यंत देशातून संपूर्ण उच्चाटन करण्याचे ध्येय बाळगले आहे. तसेच एचआयव्ही बाधित व्यक्तीच्या उपचाराविषयी पूर्ण गोपनीयता पाळली जाईल याची दक्षता घेण्यात येईल.
- डॉ. श्रीकला आचार्य । अतिरिक्त प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था