दक्षिण गोलार्धातील न्यूझीलंड हा एक वेगळाच देश आहे. या देशाची लोकसंख्या फक्त साडेबावन्न लाखाच्या आसपास आहे, पण क्षेत्रफळ मात्र तब्बल अडीच लाख चौरस किलोमीटर आहे. या देशाच्या एकूण साडेबावन्न लाख लोकांपैकी सुमारे सतरा लाख लोक तर तिथल्या दोन मोठ्या शहरांमध्ये राहतात. त्यामुळे न्यूझीलंड या देशाच्या बहुतेक सगळ्या भागात अतिशय विरळ लोकवस्ती आहे. त्यातही न्यूझीलंड हा काही एकसंध भूमीवर वसलेला देश नाही, हा देश म्हणजे सहाशेहून अधिक बेटांचा समुच्चय आहे.
आधीच वस्ती विरळ, त्यात ती दूर दूर विखुरलेली आणि वेगवेगळ्या बेटांवर वसलेली! या परिस्थितीत आपल्या देशाच्या नागरिकांपर्यंत पोहचणं हे न्यूझीलंड सरकारसाठी फार किचकट काम आहे. त्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतुकीवर अवलंबून राहावं लागतं. रस्ते वाहतुकीमुळे अर्थातच प्रदूषण होतं. हे प्रदूषण टाळण्यासाठी एअर न्यूझीलंडने एक नामी उपाय केला आहे. त्यांनी चक्क बॅटरीवर चालणारं छोटं इलेक्ट्रिक विमान मालवाहतुकीसाठी विकत घेतलं आहे.
एअर न्यूझीलंडने बीटा टेक्नॉलॉजीज या विमान बनविणाऱ्या अमेरिकन कंपनीकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर चालणारं आलिया एअरक्राफ्ट विकत घेतलं आहे. हे विमान बॅटरीवर चालणार असलं तरी त्याचं टेक ऑफ आणि लँडिंग मात्र नेहमीच्या विमानासारखंच होणार आहे. हे विमान अगदी म्हणजे अगदीच छोटं असणार आहे. याची लांबी सुमारे १२ मीटर आणि त्यात केवळ ५ माणसांची बसण्याची व्यवस्था आहे. मात्र याची माल वाहतूक करण्याची क्षमता मात्र चांगली आहे. हे विमान एका वेळी सुमारे ५६० किलो माल वाहून नेऊ शकतं. या विमानाचा जास्तीत जास्त वेग ताशी २७० किलोमीटर इतका असू शकतो. म्हणजेच हे विमान इतर पारंपरिक विमानांच्या तुलनेत हळू उडेल आणि अर्थातच त्याला प्रवासाला जास्त वेळ लागेल.
हे विमान बॅटरीवर चालणारं असल्यामुळे बॅटरीवर चालणाऱ्या गाडीबद्दल ज्या शंका असतात त्या सगळ्या या विमानाच्या बाबतीतही आहेतच. म्हणजे एका चार्जिंगमध्ये हे विमान ४८० किलोमीटरहून जास्त प्रवास करू शकतं अशी त्याची क्षमता आहे. मात्र प्रत्यक्षात ते एका उड्डाणाच्या वेळी १५० किलोमीटरच उडवलं जाणार आहे. त्यातही हे केवळ न्यूझीलंडच्या देशांतर्गत मार्गांवरच उडवलं जाईल. या विमानाची बॅटरी पूर्ण डाऊन झाली तर ती रिचार्ज व्हायला साधारण ४० ते ६० मिनिटं लागतात. याच आकाराच्या पारंपरिक विमानांना यापेक्षा थोडासाच कमी वेळ लागतो. या विमानाचं उड्डाण कुठल्या कुठल्या मार्गावर करायचं हे एअर न्यूझीलंडला आधी ठरवायला लागणार आहे. कारण हे विमान जिथे जिथे जाईल तिथे तिथे ते चार्ज करण्यासाठीची विशेष व्यवस्था करावी लागेल.
अर्थात हे मालवाहतूक करणारं विमान एअर न्यूझीलंडच्या प्रदूषण कमी करण्याच्या प्रवासातील पहिलं पाऊल असेल. एअर न्यूझीलंडचे चीफ एक्सिक्युटिव्ह ग्रेग फॉरेन म्हणतात, एअर न्यूझीलंड २०३० सालापर्यंत ‘झिरो एमिशन’ करणाऱ्या इलेक्ट्रिक विमानांमधून प्रवासी वाहतूकदेखील करू शकेल अशी आशा आहे. मालवाहतूक करणारं बॅटरीवर चालणारं विमान हे त्या दिशेने उचललेलं पहिलं पाऊल आहे. कारण मालवाहतूक करणाऱ्या विमानावर प्रयोग करणं तुलनेनं सुरक्षित असतं. न्यूझीलंडचा भूगोल, अंतर आणि एअर न्यूझीलंडच्या आत्ताच्या वाहतुकीतील प्रवासी संख्या हे सगळं लक्षात घेता मालवाहतूक करण्यासाठी बॅटरीवर चालणारं विमान वापरणं हीच झिरो एमिशनच्या दिशेने जाणारी तार्किक सुरुवात आहे.
फॉरेन असंही म्हणतात, की “आम्हाला आमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या आधी या नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करायचा आहे. त्यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येणाऱ्या अडचणी समजून घ्यायच्या आहेत. आणि त्या प्रत्यक्ष वापरातूनच सगळ्यात चांगल्या समजू शकतात. हे विमान वळवायचं कसं? हे रिचार्ज व्हायला खरोखर किती वेळ लागतो? हे चाललं नाही तर काय? - हे सगळं आम्हाला करून बघायचं आहे.” एअर न्यूझीलंडचं हे पहिलं वहिलं बॅटरीवर चालणारं विमान मालवाहतूक करण्यासाठी २०२६ साली आकाशात भरारी घेईल असा अंदाज आहे.
भविष्यात पर्याय हवा म्हणून...
हे विमान घेण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएलची उपलब्धता. कमी प्रदूषण करणारं इंधन वापरण्यासाठी विमान कंपन्यांवर खूप दबाव असतो मात्र दक्षिण गोलार्धात भविष्यात या इंधनाची चणचण भासेल असाही अंदाज आहे. त्यामुळेच एअर न्यूझीलंडने एक आलिया विमान घेतलं आहे, त्याच प्रकारच्या दोन विमानांचं बुकिंग केलं आहे आणि बीटा कंपनीच्या आणखी २० विमानांच्या व्यवहाराचे हक्क राखून ठेवले आहेत.