महाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर शुक्रवारी पंचतत्त्वात विलीन झाले. त्यांच्या निधनामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी व सहकार क्षेत्राची जाण असलेला नेता महाराष्ट्राने गमावला. त्याचबरोबर पश्चिम विदर्भानेही राज्यव्यापी ओळख व कर्तृत्व असलेला एकमेव नेता गमावला. भाऊसाहेब सच्चे भूमिपुत्र होते. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील नारखेड या छोट्याशा गावातील सर्वसामान्य कुटुंबातून सुरू झालेला भाऊसाहेबांचा जीवनप्रवास राज्याचे कृषिमंत्री म्हणून संपुष्टात आला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १९९८ व १९९९ मध्ये केंद्रात भारतीय जनता प़क्षाचे सरकार स्थापन झाले, त्यावेळी दुर्दैवाने भाऊसाहेबांना अकोला लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागला; अन्यथा ते कदाचित देशाचेही कृषिमंत्री झाले असते. भाऊसाहेबांच्या संपूर्ण जीवनप्रवासादरम्यान त्यांची जमिनीशी जुळलेली नाळ कधीही तुटली नाही. भाऊसाहेब कर्तबगारी व मेहनतीच्या बळावर मोठे होत गेले; पण ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत, आधी जनसंघ व नंतर भारतीय जनता पक्ष मोठा करण्यासाठी अपार कष्ट केले, त्यांचा त्यांना कधीही विसर पडला नाही. छोट्यातील छोट्या गावातील लहान कार्यकर्त्याशीही नजरानजर झाली की भाऊसाहेबांच्या चेहऱ्यावर ओळखीचे स्मित उम़टायचेच उमटायचे! त्या बळावर गावोगावी निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फौज, हीच त्यांची खरी गंगाजळी होती. शुक्रवारी खामगाव येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो शोकाकूल कार्यकर्त्यांंनी केलेली गर्दी त्याची साक्ष देत होती. आज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रासह केंद्रात आणि इतरही अनेक राज्यात सरकार आहे; पण मूठभर अभिजनांचा पक्ष ही त्या पक्षाची जुनी ओळख पुसून टाकून, पक्षाला बहुजन चेहरा देण्यासाठी, खेडोपाडी, वस्त्या, तांड्यांपर्यंत पक्ष पोहचविण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या मोजक्या नेत्यांमध्ये भाऊसाहेबांचा समावेश होतो. त्याचा मोबदला म्हणून त्यांनी पक्षाकडून कधीही बड्या पदांची अपेक्षा केली नाही; मात्र पक्षाने जी जबाबदारी दिली, ती इमानेइतबारे पार पाडली. संसद किंवा विधिमंडळात, तसेच इतर व्यासपीठांवरही विरोधकांवर तुटून पडणाºया भाऊसाहेबांचे सर्वपक्षीय नेत्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या भाऊसाहेबांचे अचानक निघून जाणे हा त्यांच्या पक्षासाठी, तसेच पश्चिम विदर्भासाठीही मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी पश्चिम विदर्भात बराच काळ जाणवत राहील.
अजातशत्रू भाऊसाहेब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 5:52 AM