यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत
‘अजित पवार यांचे बंड हे शरद पवार यांच्या संमतीने झाले आणि ही दोघांनी परस्पर सामंजस्यातून केलेली चाल आहे’ असे तर्क अनेकांनी सुरुवातीच्या काळात लावले होते. ‘भाजपसोबत उद्या अजितदादांचे जमले नाही तर ते काकांकडे परत जातील, हे सगळे ठरवून झाले आहे. एवढेच काय तर भाजपच्या मदतीने आपले आमदार कनिष्ठाने निवडून आणायचे, तिकडे ज्येष्ठाने महाविकास आघाडीतील दोन पक्षांच्या मदतीने काही आमदार जिंकवायचे अन् मग दोघांनी एकत्र येऊन एखाद्या मोठ्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करायचे, जमले तर मुख्यमंत्रिपदही पदरी पाडायचे असे ठरले आहे’, इथपर्यंतची मांडणीही करण्यात आली होती. फेसबुक आणि व्हॉट्सॲपने हल्ली प्रत्येकालाच पत्रकार बनविले आहे. कल्पनेच्या गाडीत बसून तर्कांच्या रस्त्यावर बिनबोभाट सैर करणाऱ्यांची कमतरता राहिलेली नाही; पण अशावेळी जबर अपघात होण्याची शक्यताच अधिक असते.
जे घडले ती पवार घराण्याची मॅचफिक्सिंग नाही हे आधीही इथे लिहिले होते. एकदाचा निर्णय घेऊन टाकायचाच, या निर्धाराने पेटलेला नंतरच्या पिढीतील नेता आणि त्याचे बंड होत असताना अगतिक झालेले मूळपुरुष असा हा संघर्ष होता. दोन पवारांच्या संबंधांबाबत अनेकांच्या मनात आजही शंका आहेत. त्या तशाच राहाव्यात, हे दोघांपैकी कोणाच्या अधिक सोईचे होते हे जरा बारकाईने विचार केला तर लक्षात येईल. दोघांमधील बंध पूर्णत: तुटलेले नाहीत असे आजही भासविण्यात येते. बरेचदा अजितदादा, प्रफुल्ल पटेल यांच्याशी बोलणे सुरू ठेवत त्यांना कुरवाळणे सुरू ठेवले जाते. फक्त कुरवाळायचे; पण प्रत्यक्षात सोबत यायचे नाही ही खेळी लक्षात आल्यानेच अजितदादा आता काकांना हेडऑन घेत असल्याचे दिसते. आतापर्यंतच्या संदिग्धतेने नुकसान हे पुतण्याचेच होत होते. आज जे शरद पवार यांच्यासोबत उरले आहेत ते हा विचार करूनच की ‘उगाच का जायचे? उद्या दोघेही एकत्र आले तर? त्यापेक्षा आहे तिथेच राहिलेले बरे!’
- मात्र, आता अजितदादांनी पाश तोडण्याचे आणि तसे जाहीरपणे सांगण्याचे धोरण अंगिकारलेले दिसते. त्यांनी आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी परस्पर चर्चेतून पाशमुक्तीचा निर्णय घेतला असे म्हणतात. त्यातूनच मग गेल्या आठवड्यात बारामतीत पुतण्याने वाक्बाण चालविले. ‘मी वयाच्या साठाव्या वर्षी निर्णय घेतला, तुम्ही तर वयाच्या ३८व्या वर्षी वेगळी भूमिका (खंजीर खुपसला) घेतली होती’, असे जिव्हारी लागणारे वाक्यही आले.
परवा बारामतीत जाऊन ते लोकांना सांगून आले की, ‘यापूर्वी तुम्ही अनेकांचे ऐकले, आता फक्त माझे ऐका!’ भाजपला हे फार आधी अपेक्षित होते. अजित पवार यांनी मोठ्या साहेबांवर सुरुवातीच्या एकदोन महिन्यांनंतर सडकून टीका करण्याची भूमिका घेतली असती तर आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊन राष्ट्रवादीच्या दोघा-चौघांना संधी मिळाली असती. अजित पवार बंधमुक्त व्हायला तयार नसतील तर मग त्यांना आणखी कशासाठी म्हणून द्यायचे असा विचार भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने केला असावा.
आपल्याबाबतचे शंकेचे ढग स्वत:च दूर करायला अजितदादांना एवढा वेळ का लागला असावा?- कारण बंडानंतर लगेच टोकाची टीका केली तर ती बुमरँग होईल, अशी शंका होती. पावसातील सभेने २०१९ मध्ये मिळवून दिलेल्या सहानुभूतीची आपल्या टीकास्रांनी पुनरावृत्ती तर होणार नाही ना अशी भीती सतावत असावी. त्यामुळेच साहेबांवर थेट आणि टोकाची टीका कोणीही करायची नाही, असे स्पष्टपणे बजावण्यात आले होते.
महत्त्वाचे म्हणजे याबाबत शिवसेनेचे उदाहरण डोळ्यासमोर होते. शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेच उद्धव ठाकरेंवर तोफ डागणे सुरू केले. मातोश्रीबाबत काही कमेंट केल्या, त्यातून उद्धव यांना सहानुभूती मिळाली. त्या सहानुभूतीची डोकेदुखी शिंदे गटाला अजूनही सतावत आहे. त्यामुळेच सहानुभूतीच्या घड्याळातील काटा सिल्व्हर ओककडे झुकू नये, याची काळजी अजितदादा कॅम्पने घेतली. मात्र, आता परखडपणा दाखवला नाही तर भाजप आपल्याकडे संशयाने पाहत राहील, याची जाणीव त्यांना झालेली दिसते. पक्षावरील पकड अधिक मजबूत करण्यासाठीही आता काकांवर तोफ डागणे आवश्यक असल्याचे लक्षात आले असावे. कुठे, कधी, कसे वागावे याचे प्रशिक्षण काकांकडूनच आजवर मिळत राहिले; त्याचा उपयोग काकांबाबतच केला जावा ही नियती असावी.
वटवृक्ष अनेकांना सावली देतो हे जेवढे खरे आहे तेवढेच त्याच्याखाली अन्य वृक्ष वाढत नाहीत हीदेखील वस्तुस्थिती असते. आता सावली चांगली वाटते म्हणून सावलीतच राहायचे की स्वत: वटवृक्ष होऊन इतरांना सावली द्यायची, असा विचार कधी ना कधी मनात येतो. हा विचार अमलात आणल्याशिवाय मोठे होता येत नाही याचे पूर्ण भान आता आलेले दिसते. एकूणच, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन पवारांमधील वाक्युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
जाता जाता : राज्यातील एका मंत्र्याच्या मुलाने चार्टर्ड फ्लाइटमधून फिरत असल्याचे इन्स्टाग्रामवर टाकले. सगळे कुटुंब कुठे कुठे फिरले म्हणतात. जलसंधारण ऐकले होते; हे हवाई संधारण नवीनच दिसते आहे.