प्रभू चावला, ज्येष्ठ पत्रकार
प्रतिस्पर्ध्याला बेमालूमपणे खाली खेचणाऱ्या “चक्र” नावाच्या एका डावात कुस्तीगीर मुलायमसिंग तरबेज होते. पुढे अधिक धोकेबाज राजकीय आखाड्यात त्यांनी त्याहून मोठ्या कुस्त्या जिंकल्या. शेवटी राष्ट्रीय स्तरावरील राजकीय स्पर्धांत त्यांनी पंचाची भूमिकाही निभावली. अखिलेश यादव या त्यांच्या मुलानं ‘नजरेत भरण्याची कला’ पुरती साधलीय. आपलं राजकीय स्थान उंचावण्यासाठी अनेक तरुण खासदार नवे मित्र जोडतात, जुनं शत्रुत्व सोडतात. प्रादेशिक पक्षांनी एनडीएविरोधात जंतरमंतरवर आयोजित केलेल्या निदर्शनात जोरदारपणे सहभागी होऊन अखिलेशनी दाखवून दिलंय की आता प्रादेशिक हेच राष्ट्रीय होय! अखिलेश आपल्या राजकीय पटाचा विस्तार उत्तर भारतापलीकडे करून २०२९ पर्यंत राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवू इच्छितात. लोहियावादाचं ओझं टाकून देत, जातीचं राजकारण टाळत, आधुनिक आचारविचारांचा तरुण नेता या रूपात (केवळ यादव जातीचाच नव्हे, तर) विशाल जनसमूहाचा नेता म्हणून अखिलेश पुढे येत आहेत.
उत्तर प्रदेशातील ३७ जागा जिंकून समाजवादी पक्षाला १८ व्या लोकसभेतील तिसरा सर्वांत मोठा पक्ष बनवल्यानंतर अखिलेश पक्षात आणि पक्षाबाहेरही झपाट्याने कामाला लागलेले दिसतात. ते आता मागच्या रांगेतील सरदार राहिलेले नाहीत. उपहास, काव्य आणि सावधपणाने भरलेली सखोल अभ्यासपूर्ण भाषणं देतात, सर्व पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतात, वार्ताहरांना चमकदार बाइटस् द्यायला अतिउत्सुक दिसतात. लोकसभेत ते कटाक्षाने आपली पत्नी डिंपल यांच्याबरोबरच येतात. देशहिततत्पर आकर्षक दाम्पत्य असा “केनेडी टच” मिळवण्याचा उद्देश त्यामागे असतो. लोकसभेतील अजेंडा ठरवण्यात ते हिरीरीने पुढे असतात. समाजात मिसळण्याची एकही संधी सोडत नाहीत. विशेषज्ञांच्या भेटीसाठी प्रयत्न, प्रवास करतात. या वर्षभरात ते कोलकाता, पाटणा, चेन्नई आणि मुंबईला जाऊन आले.
कितीतरी वर्षांनी भारतात एक तरुण प्रादेशिक लोकनेता राष्ट्रीय भूमिका पार पाडताना दिसत आहे. ममता, स्टॅलिन, तेजस्वी यादव हे नेते साधारणपणे आपापल्या राज्यापुरते पाहत असताना अखिलेश दिल्लीत त्या सर्वांच्या खासदारांबरोबर संबंध जुळवत आहेत. समाजवादी पक्षाचं रूपांतर एका सर्वसमावेशक व्यासपीठात करून सर्वोच्च स्थान प्राप्त करणं हेच त्यांचं अंतिम ध्येय आहे. भ्रष्ट प्रतिमा असलेल्या जुन्या घरभेद्यांना नारळ देत ते आता आपली स्वतःची शैली घडवत आहेत. अखिलेशचा पहिला संघर्ष त्यांच्या कुटुंबीयांशीच होता. २०१२ साली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलायमनी त्यांना पक्षाध्यक्ष बनवलं. राज्यव्यापी रथ व सायकल यात्रेमुळे अखिलेश राज्यातील युवकांचे दैवत बनले. समाजवादी पक्षाला दोन तृतीयांशपेक्षाही अधिक जागा मिळाल्या. मुख्यमंत्री म्हणून बस्तान बसवत असतानाच कुटुंबातील बंडखोरीचा सामना करावा लागला. मुलायमनी नेमलेल्या कौटुंबिक, राजकीय आणि अधिकारी वर्गातील लोकांना अखिलेशनी नारळ दिला. मुलायम चिडले आणि त्यांनी अखिलेशनाच पक्षातून काढून टाकलं. यावर तोडीस तोड जबाब देत अखिलेशनी मुलायम यांनाच पक्षाध्यक्ष पदावरून काढलं आणि पक्षाचा कारभार आपल्या हातात घेतला. हे भांडण निवडणूक आयोगाकडे गेलं. त्यांनी पक्ष आणि चिन्ह अखिलेश यांना बहाल केलं. २०१७ उजाडेतो अखिलेश सर्वाधिकारी बनले होते.
अखिलेश हे एकटेच आपले निर्णय घेतात. त्यांची पुढची चाल काय असेल याचा पत्ता कुणाला नसतो. सावलीसारखा वावरणारा कुणी सल्लागार जवळ न बाळगणारे ते कदाचित एकमेव मोठे भारतीय राजकारणी असतील. देशातील आणि परदेशातीलही विद्यापीठातून पर्यावरण अभियांत्रिकीची पदवी घेतलेली असल्यामुळे “पर्यावरणीय व्यवस्थापनाच्या” कलेत ते वाक्बगार आहेत. त्यांच्या पक्षातील निम्मी पदं आणि विधिमंडळातील निम्म्या जागा यादवांनीच काबीज केलेल्या होत्या; परंतु राष्ट्रीय सत्ता काबीज करायची असेल तर इतर समाजघटकांबरोबर सत्ता वाटून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही हा मुद्दा अखिलेशनी आपल्या कुटुंबाच्या गळी उतरवला. पित्याने घडवलेली मुस्लीम आणि यादवांची (MY) राजकीय आघाडी विस्तारून त्यांनी PDA ( पिछडे, दलित आणि अल्पसंख्यांक) अशी नवी घोषणा साकारली. या PDA ने खेळाचा नूरच पालटून टाकला.
२०२४ ला समाजवादी पक्षाच्या खासदारांची संख्या पाचावरून सदतीसवर पोहोचली. अखिलेश आता भांडवलशाहीची मूल्यं जोपासणारी उदारमतवादी आणि मानवतावादी भाषा बोलू लागले आहेत. प्रत्येक राजकीय कार्यक्रमात अखिलेश यांच्या डोक्यावर तांबडी टोपी असतेच असते. हृदयाने समाजवादी असूनही मुक्त बाजारपेठेचं तत्त्व त्यांनी मनोमन स्वीकारलं आहे. योगी किंवा मोदी यांच्यासह एकाही भाजपा नेत्याविरुद्ध त्यांनी एकही विखारी शब्द कधी उच्चारलेला नाही. उत्तर प्रदेशच्या राजकीय मैदानात भलेही ध्रुवीकरण झालेलं असेल; पण मुख्यमंत्री म्हणून योगी आणि विरोधी पक्षनेता म्हणून अखिलेश नेहमीच सुसंस्कृत राजकीय वर्तन करताना दिसतात. हे दोघे समवयस्क आहेत आणि पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार आहेत.
- तरीही राहुल आणि अखिलेश या यूपीच्या दोन तरुण नेत्यांपैकी कुणाच्या गळ्यात माळ पडेल हा कळीचा मुद्दा शिल्लक राहतोच. २०२७च्या विधानसभा निवडणुकीतून याचं उत्तर काही प्रमाणात मिळेल. मुलायम म्हणत, ‘स्पर्धेत अंतिम यश मिळवणार असाल तर एखादा सामना गमावणं ठीकच आहे.’ याबाबतीत अखिलेश यांचा सामना शत्रू आणि मित्र अशा दोघांशीही आहे!