दारुड्या बापाची मुलाकडूनच हत्या होऊ लागल्याचे प्रकार भयावहता दर्शविणारे
>> किरण अग्रवाल
दारू पिऊन आईला त्रास देणाऱ्या बापाची मुलाकडूनच हत्या घडून आल्याचा प्रकार केवळ नात्यांना नख लावणारा व अवघे समाजमन अस्वस्थ करणाराही आहे. व्यसनाधीनतेतून होणाऱ्या या दुर्घटना रोखायच्या असतील तर समाजालाच सजग व्हावे लागेल.
व्यसन कोणतेही असो, ते अपायकारकच असते हे ज्ञात असूनही संबंधित लोक त्यापासून परावृत्त होत नाहीत आणि स्वतः सोबत कुटुंबीयांच्याही अडचणीत भर घालत राहतात. दारूमुळे आईला त्रास देणाऱ्या वडिलांची मुलाकडूनच हत्त्या घडून आल्याचा जो प्रकार अकोल्यात पुढे आला त्यातूनही व्यसनाधीनता ही कशी नात्यांच्या मुळावर उठते आहे हे लक्षात यावे.
तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता हा आज समाजासमोरील चिंतेचा विषय बनला आहे. विडी सिगारेट पाठोपाठ गुटखा सेवनाने अनेक तरुणांनी कर्करोगाला निमंत्रण देऊन ठेवल्याने ते मरणयातना अनुभवत आहेत. गुटखा बंदी असतानाही बाजारात मात्र तो चोरून लपून मिळतो हे उघड सत्य आहे. अकोला जिल्ह्यात मागे स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून आलेला दोन ट्रक गुटखा विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाकडून जप्त करण्यात आला होता. नशा आणणाऱ्या गांजा सेवनाचे प्रमाणही अलीकडे वाढत चालले आहे. बार्शीटाकळी व पातुर परिसरात काही ठिकाणी अवैधपणे गांजा शेती केली जात असल्याचे उघडकीस आले आहेच, शिवाय वेळोवेळी गांजा जप्तीच्या घटनाही घडत असतात; यावरून बाजारात उपलब्ध होणाऱ्या गुटखा व गांजाची कल्पना यावी.
दारूच्या व्यसनामुळे तर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. गाव खेड्यातील गुत्त्यांचे सोडा, शहरातील अधिकृत बारच्या समोर अनेकदा चक्क रांगा लागल्याचे बघावयास मिळते इतकी ही व्यसनाधीनता फोफावली आहे. बरे, दारू पिऊन रस्त्यावर लोळणाऱ्यांकडे आपण तुच्छतेने बघतो; पण हल्ली लग्नादी समारंभात कॉकटेल पार्टी ठेवणाऱ्यांकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून बघितले जाऊ लागले आहे त्याचे काय? दारू पिऊन वरातीत नाचणाऱ्यांमुळे लग्न समारंभांना उशीर होऊ लागल्याची तक्रार सामाजिक नेत्यांकडून केली जाण्याइतपत हे फॅड वाढले आहे. इतिहासातील संत महात्मेच नव्हे, हल्लीचे प्रख्यात कीर्तनकार इंदोरीकर महाराज व सत्यपाल महाराज यांच्यासारखे अनेक महाराज आपल्या कीर्तन, प्रवचनातून या व्यसनाधीनतेवर प्रहार व जनजागरण करीत असतात, पण सवयींच्या आहारी गेलेले लोक सुधारताना दिसत नाहीत. यात समाधानाची बाब इतकीच की, महिलांनी बाटली आडवी केली म्हणून काही गावात दारूबंदी केली गेली; परंतु बहुसंख्य ठिकाणचे गुत्ते सुरूच आहेत.
दुर्दैव असे की, मद्यप्राशनानंतर मन, बुद्धीवरील ताबा सुटला व तोल गेला की नको ते होते आणि दुर्घटना घडते. अकोल्यात तेच झाले. नवरा दारू पिऊन त्रास देतो म्हणून एक महिला मंगरूळपीर येथून आपल्या दोन मुलांना घेऊन अकोल्यात राहावयास आली, पण तो येथेही येऊन त्रास देऊ लागला. अखेर दोन दिवसांपूर्वी आईला मारहाण करणाऱ्या या दारुड्या वडिलांची हत्या त्यांच्या मुलाकडूनच घडून आली. दोन महिन्यांपूर्वी अकोल्याच्याच गीता नगर परिसरात येऊन केरसुणी बनविणाऱ्या छत्तीसगडमधील एका कुटुंबीयात असेच दारू पिऊन त्रास देणाऱ्या पित्याला त्याच्या अल्पवयीन मुलाने संपविल्याची घटना घडली होती. या झाल्या थेट हत्त्येच्याच घटना, परंतु काही कुटुंबाततील पुरुषांवर या व्यसनाधीनतेमुळे आपल्याच मुलांकडून हात उचलले जाण्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. या व्यसनाधीनतेतूनच वासनांधता बळावून पोटच्या मुलीवरच अत्याचार केले गेल्याच्या घटनाही पोलीस स्टेशनात नोंदल्या गेल्या आहेत. नात्यांमधील आदर व मर्यादेला नेस्तनाबूत करीत नख लावणाऱ्या अशा घटना घडतात तेव्हा समाजमन अस्वस्थ होऊन जाणे स्वाभाविक ठरते.
गुटखाबंदी असो की दारूबंदी, शासन स्तरावर जे प्रयत्न करायचे ते केले जातातच, पण यातील अवैध व्यवसायाची पालेमुळे खणून काढण्यासाठी स्थानिक यंत्रणांकडूनही गांभीर्य बाळगले जावयास हवे. केवळ शासनाच्या प्रयत्नांनी व्यसनाधीनतेची ही कीड संपणार नाही, त्यासाठी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकांनीही पुढे यायला हवे. पुढच्या पिढीचे भविष्य जपायचे असेल तर समाजकार्यातील महत्त्वाचा भाग म्हणून हे सर्वांनी करायलाच हवे.
सारांशात, दारुड्या बापाला आपल्या मुलांकडूनच संपविले गेल्याच्या ज्या घटना समोर येऊ लागल्या आहेत त्यातुन व्यसनाधीनतेचे भयावह परिणाम समोर येत असून ही अवनती रोखायची असेल तर त्यासाठीच्या शासकीय प्रयत्नांना सामाजिक संघटनांची मदत लाभणेही गरजेचेच आहे.