पालघर जिल्हा निर्मितीनंतर जवळपास साडेतीन वर्षे अस्तित्वात नसलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता रंगात आली आहे. तीन आमदार व दोन खासदारांची प्रतिष्ठा पणाला लावणाºया या निवडणुकीनिमित्ताने ग्रामीण राजकारणाचा, खासकरून शेतकºयांच्या मनातील सरकारबद्दलच्या भावनेचा कल समजणार असल्याने तिला आजवर कधी नव्हते एवढे महत्त्व आले आहे. भिवंडीत सर्वाधिक जागा असल्याने तो तालुका आणि त्याखालोखाल शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या तालुक्यातील राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे. वेगवेगळ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न टोकदार बनले. शिवसेनेला साथसंगत करणाºया श्रमजीवी संघटनेला त्यांच्यापासून तोडून आपल्याकडे खेचत बेरजेच्या राजकारणात भाजपाने आघाडी घेतली. तसेच आक्रमकता दाखवत अन्य पक्षांत फोडाफोडी करून प्रभाव असलेल्या नेत्यांच्या पळवापळवीचा सिलसिला कायम ठेवल्याने इतर पक्ष सावध तर झालेच; पण त्यांनी आजवरचे सर्व मतभेद दूर सारत परस्परांना सहकार्य करून गरज भासेल तशा वेगवेगळ्या युती-आघाड्यांचे नवे पर्व ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात सुरू केले. भाजपा विरुद्ध सारे असेच या लढतींचे स्वरूप बनले. ग्रामीण राजकारणावरील आपला, आपल्या पक्षाचा, आपल्या चिन्हाचा ठसा पुसला जाऊ नये, याची काळजी प्रत्येक पक्ष घेत आला; पण यंदा त्याला सोडचिठ्ठी दिली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भारिप, मनसे, सेक्यूलर आरपीआय अशा पक्षांनी परस्परांशी चर्चा करत उमेदवार दिले. एकीकडे हे राजकीय बदल होत असतानाच आपल्या आरक्षणात वाटेकरी निर्माण होईल, या अस्वस्थेतेपोटी कुणबी समाजही एकवटला. आगरी नेतृत्वाने वरचश्मा कायम राहील, याची तयारी केली. आदिवासींनी आजवरचा एकचएक आदेश न मानता अस्मितेचा हुंकार दिला. त्यातून ओलांडल्या गेलेल्या राजकीय लक्ष्मणरेषा व त्याला लाभलेली जातीय संघर्षाची किनार यामुळे येथील राजकारणाचा बाज बदलून गेला. रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्याच्या सोयी, शिक्षण अशा मुद्द्यांपेक्षा पक्षीय कुरघोडीभोवती ही निवडणूक फिरण्यास सुरुवात झाली आहे. दोन वर्षांनी होणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी सध्या सर्वच पक्षांची चाचपणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात तरी जिल्हा परिषद, पंचायत समितीने मतदारांचा कौल अजमावण्याची संधी राजकारण्यांना उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच तिच्या निकालातून काय हाती लागते यावर सर्व पक्षांचे, त्यातील इच्छुकांचे व निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराच्या तयारीत असलेल्यांचे लक्ष आहे.
भाजपा विरुद्ध सारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 3:49 AM