‘जो संघात जात नाही तो हिंदू नव्हेच’ असे तेजस्वी उद्गार हैदराबादमधील भाजपचे एक आमदार टी. राजसिंह यांनी भोपाळमध्ये काढले आहे. तसे म्हणत असताना संघाचे मैदान हेच केवळ हिंदूंचे स्थान असल्याचेही त्या माणसाने सांगून टाकले आहे. संघ किंवा भाजप या संघटना राजसिंहाच्या या वक्तव्यावर जोवर त्यांचे म्हणणे मांडत नाही तोवर त्यांचा स्वयंसेवक व तिकीटधारी म्हणून या संघटनांनाही त्याचे म्हणणे मान्य आहे असे म्हणावे लागेल. संघाची स्थापना १९२५ मध्ये डॉ. हेडगेवारांनी केली. नंतरची अनेक वर्षे ते स्वत: गांधीजींच्या नेतृत्वातून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेत होते. राजसिंहाचे तर्कट मागे नेले तर १९२५ पूर्वी भारतात कुणी हिंदू नव्हताच या निष्कर्षावर यावे लागते. त्याच स्थितीत वैदिक ऋषिमुनी, शंकराचार्यांसह सगळे आचार्य, संत आणि छत्रपतींपासून विवेकानंदांपर्यंतचे सारेच अहिंदू ठरतात. आपण काय बोलतो आणि त्याचा परिणाम कसा होऊ शकतो याविषयीचे जराही तारतम्य व ज्ञान नसणारी अशी माणसे संघाच्या मुशीत तयार होत असतील आणि भाजप त्यांना तिकिटे देत असेल तर त्यांच्या तथाकथित सांस्कृतिक राष्ट्रवादाचे खरे स्वरूपही त्यातून उघड होते हे सर्वसंबंधितांना कळतच असणार. तरीही गेल्या तीन वर्षात अशा ‘राजसिंहा’ची संख्या देशात वाढलेली दिसली आहे. या माणसांनी सध्या जो धुमाकूळ घातला त्याची आकडेवारी आता सरकारनेच प्रकाशित केली आहे. गेल्या एक वर्षात देशात झालेल्या धार्मिक दंगलींची संख्या ८२२ एवढी होती. त्याअगोदरच्या वर्षी ती ७०३ होती. मागील वर्षी या दंगलीत १११ जण मृत्यू पावले व २३८४ जबर जखमी झाले. अगोदरच्या वर्षी ही संख्या अनुक्रमे ८६ व २३२१ एवढी होती. मोदींचे सरकार दिल्लीत सत्तारूढ झाल्यापासून अशा दंग्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वार्षिक ३० टक्क्यांहून अधिक वाढल्याचेही आढळले आहे. ‘मोदींना मत देणार नाहीत ते सारे पाकिस्तानी’ असे म्हणून या माणसांनी सगळ्या विरोधी पक्षांवर ते पाकिस्तानी असल्याचा ठपका आधीच ठेवला आहे. पुढे ‘योगी योगी म्हणणार नाहीत त्यांना उत्तर प्रदेशात राहण्याचा हक्क नाही’ असेही या देशबुडव्यांनी त्या राज्यातील साºयांना सांगून टाकले आहे. त्याच घोषणांची निमुळती परिणती ‘संघात येत नाहीत ते हिंदू नाहीत’ या मूर्ख विधानात आता झाली आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदींच्या पक्षाला व त्याच्या आघाडीला देशात ३१ टक्के मते मिळाली. ६९ टक्के लोकांनी त्यांना मत द्यायला नकार दिला. संघाच्या या हिशेबाने ते ६९ टक्के भारतीय ‘हिंदू’ ठरत नाहीत. शिवाय ज्या ३१ टक्क्यांनी मोदींना मत दिले त्यातलेही बहुसंख्य लोक संघात जाणारे नव्हते, असे हिशेब मांडण्यात तसा अर्थ नाही कारण तो भाजप व संघ यांच्या नेत्यांनाही चांगला ठाऊक आहे. मात्र त्यांना त्यांच्यातल्या कुणीतरी असे बोलत राहायला हवे आहे. त्यानिमित्ताने नकारात्मक स्वरूपात का होईना आपली चर्चा समाजात चालू राहणे त्यांना महत्त्वाचे वाटणारे आहे. बेरजेच्या राजकारणाने बळकट होता येणार नसेल तर वजाबाकीचे राजकारण चालू करायचे अशी ही उफराटी तºहा आहे. राजसिंह हे तसेही फारसे कुणाला ठाऊक नसलेले नाव आहे. त्याच्या वक्तव्याची दखल घ्यावी एवढी त्याची पात्रता वा आवाकाही नाही. मात्र ही बिनावजनाची माणसे जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचे वा संघटनेचे प्रतिनिधी म्हणून अशी वक्तव्ये देतात तेव्हा त्याची दखल घेणे आवश्यक ठरते. या संघटनांचे व पक्षांचे दर्शनी रूप व त्यांचे दडलेले खरेपण यांचीही त्यातून समाजाला ओळख पटते. या राजसिंहासारखी माणसे ज्या संघटनांमध्ये असतात व खपतात त्यांचे दर्शनी रूप केवढे बेगडी असते याचाही साक्षात्कार मग अशावेळी होतो. अशा माणसांनी उघड केलेले त्यांचे अपुरेपण त्यांच्या संघटना एक तर झाकतात किंवा त्यांचे ते व्यक्तिगत मत आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. असे दुर्लक्ष करायला ज्या लोकांबाबत आजवर या परिवाराने सांगितले त्यांची संख्याही आता फार मोठी झाली आहे आणि त्यांना आवर घालण्याचा संघटनेकडून प्रयत्न होताना न दिसणे हा प्रकार त्या संघटनांविषयीच लोकांच्या मनात संशय उत्पन्न करणारा आहे.
‘संघाबाहेरचे सारे अहिंदूच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:36 AM