- किरण अग्रवाल
पेरणीपूर्व मशागत केली जाते त्या पद्धतीने निवडणूक पूर्व संघटनात्मक बांधणीला व लोकप्रश्नांवर आंदोलने करण्याला आता मोठ्या प्रमाणात प्रारंभ झाला आहे. यात प्रस्थापित राजकीय पक्षांसोबतच इतर लहान पक्षांचीही आपले अस्तित्व दर्शविण्याची धडपड दिसून येत आहे.
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले असून, पक्ष संघटनात्मक पातळीवरील उत्साह वाढीस लावतानाच मतदारांसमोर जाण्यासाठीही त्यांच्यात चढाओढ सुरू झालेली आहे. निवेदनबाजी व जनआंदोलने त्यामुळे वाढली असून, विकासकामांच्या श्रेयाची स्पर्धाही रंगताना दिसणे स्वाभाविक ठरले आहे.
निवडणुकीची तयारी आता दिवसेंदिवस गडद होऊ पाहते आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या असून, मतदारांच्या नजरेसमोर राहण्यासाठी त्यांची उपक्रमशीलताही वाढली आहे. यावर्षी प्रथम लाेकसभा निवडणूक हाेणार असल्याने अपेक्षेप्रमाणे देशात ४०० जागांचा टप्पा गाठण्यासाठी भाजप यात सर्वांत आघाडीवर दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम वऱ्हाडतील पाच लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अकोला दौऱ्याचे नियोजन नजीकच्या काळात होत आहे. शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातही केंद्रीय मंत्र्यांचे वरचेवर दौरे होत आहेतच; मात्र भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची महायुती असल्याने वऱ्हाडातील जागावाटपाबाबतचे चित्र स्पष्ट हाेण्याकडे नेत्यांंसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दाैराही हाेणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी त्यासाठी पेरणी सुरू केली आहे. वाशिम जिल्ह्यात शिवसेना नेते, मंत्र्यांचे दाैरे वाढले आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही वाशिमचा दाैरा करून वाशिम-यवतमाळ, बुलढाणा-रावेर लाेकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याचे अधाेरेखित हाेत आहे. काँग्रेस पक्षाने पश्चिम वऱ्हाडातील तीनही मतदारसंघांची चाचपणी केलेली आहे. इंडिया आघाडीतील जागावाटपाचे चित्र स्पष्ट हाेणे बाकी असले तरी त्यादृष्टीने हा पक्ष अगाेदरपासूनच कामाला लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने पश्चिम वऱ्हाडावर लक्ष केंद्रित केले असून आमदार अमाेल मिटकरी यांच्या माध्यमातून विकासकामांवर भर दिला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही जाेमाने कामाला लागल्याचे चित्र आहे. राजकीय व सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी, सामान्यांचे प्रश्न साेडविण्यासाठी नेते, कार्यकर्ते झटत आहेत. अकाेला लाेकसभा मतदारसंघाकडे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही लक्ष केंद्रित करून त्यादृष्टीने दाैरे सुरू केले आहेत.
मतदारांच्या नजरेत भरावा अशा विकासकामांवर सत्तापक्षाकडून भर दिला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते दुरुस्ती, बांधणीची कामे हाती घेण्यात आल्याचे निदर्शनात येत आहे. दुसरीकडे अकाेला जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित दराची गॅरंटी मिळावी, यासाठी शेतकरी संघर्ष यात्रेचा प्रारंभ करून ग्रामीण भाग पिंजून काढण्यावर भर दिला आहे. मनसे, बसपा, प्रहार, रिपाइं असे अन्य पक्षही आपापल्या शक्तीप्रमाणे बैठकांचा धडाका लावून आपले अस्तित्व अधोरेखित करण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत. शेतकरी, शेतमजूर, शहरी, ग्रामीण भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सर्वच राजकीय पक्षांकडून भर देण्यात येत आहे. प्रत्येक समाज, छाेट्या-छाेट्या घटकांच्या समस्या, गाऱ्हाणे शासनदरबारी मांंडण्यासाठीची निवेदनबाजी वाढलेली आहे. उपाेषण मंडपांना भेटी देऊन सहानुभूती प्राप्त करण्यावरही भर दिला जात आहे.
येऊ घातलेली लाेकसभा निवडणूक सत्ताधाऱ्यांना जेवढी महत्त्वाची आहे, त्यापेक्षा अधिक ती विराेधी पक्षांसाठी महत्त्वाची असल्याने त्यांचे नेते, पदाधिकाऱ्यांचे ग्रामीण भागातील दाैरे वाढले आहेत. लाेकप्रतिनिधी केलेल्या कामांचे श्रेय घेऊ पाहत असून, विरोधक मात्र ती कामे पूर्वीच कशी मंजूर झाली आहेत, हे सांगण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. यावरून श्रेयवादाची लढाई रंगताना दिसत आहे.
सारांशात, निवडणूक घोषित होण्यापूर्वी सारेच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले असून मतदारांचे मन काबीज करण्यासाठी साऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. राजकीय विषय, लोकहिताचे मुद्दे व स्थानिक विकासकामे अशा विविध पातळींवर सध्या मशागत सुरू असून, यात कोण पुढे जाते, हेच आता पाहायचे.