- सुधीर लंके
विधिमंडळ अधिवेशनापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपाला ‘ठग्ज आॅफ महाराष्ट्र’ तर भाजपाने त्यांना ‘गँग आॅफ वासेपूर’ संबोधले. अहमदनगर महापालिकेची निवडणूक व येथील राजकारण पाहिले तर भाजपा-सेना व दोन्ही काँग्रेस या सर्वांना मिळून ‘गँग आॅफ वासेपूर’ व ‘ठग्ज आॅफ अहमदनगर’ या दोन्ही उपमा लागू पडतील, अशी परिस्थिती आहे.
महापालिकेच्या १७ प्रभागातील ६८ जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे. त्यासाठी तब्बल ७१५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या वेळी प्रथमच भाजपा-सेना स्वतंत्र लढत आहे. दोन्ही काँग्रेसने आघाडी केली आहे. सांगली, जळगावनंतर आता अहमदनगरवरही झेंडा फडकवून शहरी भागात आमचीच हवा आहे, हे दाखविण्याचा भाजपाचा आटोकाट प्रयत्न आहे. त्यासाठी खास मुख्यमंत्री लक्ष घालणार असल्याचे बोलले जाते. पण, भाजपाने ज्या पद्धतीने सुरुवात केली त्यात वेगळेपण व नावीन्य काहीच नाही. सोवळे खुंटीला टांगून मांसाहार करावा, अशीच त्यांची नीती दिसते. उमेदवारी देताना निष्ठा, सज्जनपणा, चारित्र्य हे न पाहता उमेदवाराकडील पैसा व नातेगोते हाच निकष भाजपानेही ठेवला. एका घरात दोन-दोन उमेदवार दिले. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला काँग्रेसचा माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याच्या पाच समर्थकांना या पक्षाने एका रात्रीत उमेदवाऱ्या दिल्या. ‘आम्हाला फक्त विजय महत्त्वाचा आहे’ असे समर्थन त्याबाबत केले. निष्ठावंतांना बाजूला फेकले. त्यामुळे ‘आम्ही साधनसूचिता पाळतो’ हा भाजपाचा दावा फोल ठरतो.
केवळ आम्हीच ६८ जागांवर उमेदवार दिले असा दावा भाजपा करत होता. पण, खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र व सुनबार्इंचाच अर्ज बाद झाल्याने ते तोंडघशी पडले. गांधी यांना स्वत:च्या बंगल्याचे अतिक्रमण भोवले. या मुद्यांवरून शिवसेना आता भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करेल. सेनेने ६० जागांवर उमेदवार दिले. पण, त्यांनीही उमेदवार आयात केले. ज्यांनी पक्षाला फसविले त्या ठगांना या पक्षाने उमेदवारी दिली. कारण त्यांच्याकडेही नव्या चेहऱ्यांचा दुष्काळ आहे.
जागावाटपात राष्ट्रवादीला ४३, तर काँग्रेसला २५ जागा आहेत. पण, काँग्रेसचे पाच उमेदवार ऐनवेळी भाजपात पळाले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे यांना ‘अहमदनगर’ मतदारसंघातून खासदार व्हायचे आहे. पण, त्यांचा पक्ष सर्वात कमी जागांवर लढतो आहे. कोणत्याही पक्षाला न दुखावता जमेल तेवढे करा, अशी विखेंची पडखाऊ नीती दिसते. विखेंमुळे बाळासाहेब थोरातही शांत दिसतात.
विकासाचे सांगण्यासारखे मुद्दे कोणत्याच पक्षाकडे दिसत नाहीत. निवडणूक सुरू असताना गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे ६१९ जणांना प्रशासनाने हद्दपार व तडीपारीच्या नोटिसा काढल्या. त्यात आजी-माजी आमदार व सर्वपक्षीय नावे आहेत. ही शहरासाठीच एकप्रकारे नामुष्की आहे. निवडणुकीत तुम्हाला शहरात थांबता येणार नाही असा धब्बा ज्या लोकांवर आहे त्यांच्याकडेच शहराची सूत्रे जाणार हा केवढा मोठा विरोधाभास आहे.
या सगळ्या मुद्यावर सर्व पक्षांचे नेते मतदारांना काय उत्तर देणार? हे महत्त्वाचे आहे. नागरिक यापैकी कोणाला निवडणार याबद्दलही अर्थातच सर्वांना उत्सुकता आहे. पालकमंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि सेनाप्रमुखही इतरवेळी शहरात लक्ष घालत नाहीत. त्यांना थेट निवडणुकीतच शहर आठवते, असा इतिहास आहे. शहर सर्वांनी फायद्यापुरते वापरले, अशी मतदारांची भावना झाली आहे.