वसंत भोसले -प्रणवदा यांनी एक सुंदर भाषण केले. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सर्वसमावेशक विचारधारेचा आग्रह धरणारा विचार व्यक्त केला. तो संघाच्या विचार परंपरेला छेद देणारा वगैरे आहे म्हणून तो बरे झाले, असे नाही, तर सर्वसमावेशकतेचा आग्रह धरणे आजच्या घडीला जरुरीचे आहे.‘‘भारतीय राष्ट्रवाद ही वैश्विक भावना आहे आणि हा राष्ट्रवाद ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वावर आधारित असल्याने भारताचे दरवाजे सर्वांना खुले आहेत. राष्ट्रवाद विशिष्ट एका जातीचा,धर्माचा किंवा भाषेच्या अधीन नाही. देशासाठी सर्वसमावेशक आणि समर्पित भावना हीच खरीदेशभक्ती आहे.’’
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे हे उद्गार खूप मौलिक आहेत. शिवाय त्यामध्ये भारतीय जीवन पद्धतीचा आदर्श, इतिहास, तत्त्वज्ञान आणि मूल्यांचे महत्त्व, आदींचा अंतर्भाव आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीतून आपली विद्यमान लोकशाही व्यवस्था उभी राहिली असली तरी अनेक ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महापुरुषांनी भारतीय समाजमन घडविण्यासाठी हीच तत्त्वज्ञानाची बैठक सांगितली आहे. त्यामध्ये अनेक अंतर्विरोध असतील, संघर्ष झाले असतील. मात्र, अखेर सर्वसमावेशक, मानवी कल्याणाचा अर्थ सांगणारे चिरंतन टिकले आहे. अलीकडच्या दोन-तीनशे वर्षांतील काही व्यक्तिमत्त्व किंवा ऐतिहासिक घटनांचा संदर्भ पाहिला तरी प्रणव मुखर्जी यांनी नागपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी मांडलेल्या भूमिकेचे महत्त्व लक्षात येते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाच ही भूमिका स्वीकारायची आहे की, आपला सामाजिक स्तराचा विस्तार अधिक करायचा आहे, याचे गणित काही सुटत नाही. याची दोन कारणे आहेत, एक तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अधिक व्यापक समाजहिताची भूमिका मांडली आणि दुसरे कारण म्हणजे प्रणव मुखर्जी यांची राजकीय भूमिका माहीत असतानाही त्यांना समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले. त्यांना बोलावणे आणि त्यांनी उपस्थित राहण्याने संघाच्या तसेच मुखर्जी यांच्या प्रतिमेत फरक पडणार नाही, असेही भागवत यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया फार बोलकी आहे. त्या म्हणतात की, त्यांनी (प्रणव मुखर्जी) निमंत्रण स्वीकारण्यास माझा विरोध होता. त्यांची विचारसरणी संघाच्या विचारांशी मिळतीजुळती नाही. त्यामुळे विनाकारण त्यांच्या प्रतिमेस तडा जाणार आहे. गैरसमज निर्माण होणार आहेत. असे असूनही माझ्या वडिलांच्या या कृतीस जाहीरपणे विरोध दर्शविण्याचे स्वातंत्र्य माझ्या कुटुंबास आहे. हीच आमची वैचारिक शक्ती आहे. माझा विरोधही ते स्वीकारतील. तरीही माझी भूमिका कायम राहणार आहे.
ही सर्व मोकळीकता महत्त्वाची आहे. हीच ती सहिष्णुता आहे. वास्तविक कॉँग्रेसच्या विचारधारेत याचे बीज रोवलेले आहे. आज आपणास काही राजकीय पक्ष कट्टर वाटत असतील, काहीजण राज्यघटनेच्या मूळ उद्दिष्टाला बगल देण्याची किंवा ती बदलण्याची भावना व्यक्त करीत असतील. मात्र, राज्यघटनेचा मसुदा तयार करताना कॉँग्रेसमध्येही अनेकजण अनेक बाबींना विरोध करीत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. राम मनोहर लोहिया म्हणायचे की, कॉँग्रेस पक्ष हा एका विशिष्ट विचारधारणेचा पक्ष नसून ती अनेक विचारांना सामावून घेणारी आघाडी आहे. त्यामुळे ती सर्वसमावेशक आहे. कॉँग्रेसचा पराभव करण्यासाठी विविध प्रकारच्या विचारसरणीच्या पक्षांनी किंवा गटांनी संयुक्त आघाडी करून लढा दिला पाहिजे. तरच कॉँग्रेसचा पराभव करता येईल.
यासाठी समाजवादी, डावे पक्ष, हिंदुत्ववादी पक्ष आदी सर्वांची आघाडी करून बिगर कॉँग्रेसवादाचे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले होते. ही पार्श्वभूमी पाहिली तर प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निमंत्रण स्वीकारणे आश्चर्य वाटण्यासारखे अजिबात नाही. डॉ. लोहिया यांच्या मांडणीच्या धर्तीवरच आज बिगर भाजपवादाचा विचार मांडला जात आहे. मात्र, त्यात थोडा फरक आहे. कॉँग्रेसमध्ये विविध विचारधारांवर श्रद्धा असणारी मंडळी एकत्र होती. भाजपमध्ये एकच विचारधारा असणारी बहुसंख्य मंडळी आहेत आणि बिगर भाजपवादाच्या छताखाली एकत्र येऊ पाहणारी मंडळी विविध विचारधारेची आहेत. बिगर कॉँग्रेसवादाच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष किंवा पूर्वाश्रमीचा जनसंघही सक्रिय होता. १९७७ चे जनता पक्षाचे सरकारही त्याच घडामोडीची परिणती होती.कॉँग्रेस पक्ष एक राष्ट्रीय चळवळ म्हणून अधिक सर्वसमावेशक होता. स्वातंत्र्यानंतरही कॉँग्रेस अनेक वर्षे सर्वसमावेशक तत्त्वज्ञानाचा आधार घेत राजकारण करीत आला आहे.
राज्यकर्ते म्हणूनही तोच धागा पकडून कारभार केला आहे. त्यामुळेच कॉँग्रेसने अनेक वर्षे भारतीय राजकारणावर आपली पकड ठेवली. अनेक वर्षे सत्तेवर राहिला. अनेक समाज घटकांमध्ये जनाधार टिकवून ठेवू शकला. याला थोडा छेद बसला तो आर्थिक उदारीकरणाची धोरणे स्वीकारल्यानंतर. कारण त्या आर्थिक धोरणांचा लाभ अनेकांना झाला असला आणि एक मोठा नव मध्यम वर्ग उदयाला आला असला तरी सर्वसामान्य गरीब किंवा स्वकष्टावर (शारीरिक) आपली उपजीविका करणारा वर्ग उपेक्षित राहिला. त्याचा असंतोष वेगवेगळ्या रूपाने प्रकट होत राहिला आहे. मात्र, नव्या मध्यमवर्गीयांच्या उदयामुळे त्याची क्षमता क्षीण झाली. त्याचे राजकारणातील महत्त्व कमी होत जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे किंवा शेतमालाचे भाव चढते ठेवण्याचे धोरण सोडून देण्याचे कारणही तेच आहे. शेतमालाचे भाव वाढल्याने जीवनावश्यक वस्तू म्हणून महागाई वाढणार असेल परिणामी मध्यमवर्गीय माणूस नाराज होणार असेल तर त्याला धक्का लावायला सध्याचे सरकार तयार नाही. त्यातून ग्रामीण भागातील गरिबी अधिकच वाढणार आहे.
अशा वातावरणात राष्ट्रवादाचा संघर्ष करण्यात अनेकांना रस असतो. विकासाचे प्रश्न, दारिद्र्य संपविण्याचा विचार किंवा नवी आव्हाने पेलण्याची धोरणे स्वीकारण्याची रणनीती याकडे दुर्लक्षच होते. राष्ट्र उभारणी ही समर्पित भावना, प्रखर राष्ट्रवाद अंगीकारल्याने आपोआप होत नाही. संपत्ती निर्माण करणाºया वर्गाला अधिक बळ देण्याने , संपत्ती निर्माण करण्याच्या कामात अधिकाधिक लोकांना सामील करून घेण्याने ते शक्य होणार आहे. त्यासाठी नवे तंत्रज्ञान, विविध ज्ञानशाखांचे ज्ञान आत्मसात करून तरुणपिढी तयार करावी लागणार आहे. त्यासाठी मुळात सर्वसमावेशक आणि समर्पित जीवनासाठीची लोकशाही मूल्ये स्वीकारावी लागणार आहेत. ती अधिक शाश्वत आहेत.
ज्या थोर विभूतींनी ही जीवनमूल्ये स्वीकारली ती आजही आदर्शवत आहेत. समाजामध्ये बदल झाले. तंत्रज्ञानामध्ये बदल झाले, जीवनपद्धती बदलली. राहणीमान बदलले. इतकेच नव्हे तर सुखी जीवनाचा अर्थही बदलत चालला आहे. तरीही अशा थोर विभूतींनी दिलेली मूल्ये कायम आहेत. ती शक्ती आहे, प्रेरणा आहेत. यासाठीच विचारधारा किंवा जीवनमूल्ये ही सर्वसमावेशक असायला हवीत. यावरच प्रणव मुखर्जी यांनी भर दिला आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली. ती उभी केली. त्यासाठी अथक परिश्रम घेतले. ती सर्व प्रेरणा सर्वसमावेशक होती. ती नवी मानवी मूल्ये निर्माण करणारी होती. पावणेदोनशे वर्षांपूर्वी सत्यशोधक समाजाच्या निर्मितीसाठी झटणारे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीही तोच मार्ग अनुसरला होता. त्याच जीवनमूल्यांच्या वाटेवरून ते जात होते. त्यातही सर्वसमावेशकता होती. त्यांनी तत्कालीन रूढी-परंपरांवर आघात केले आणि नवी जीवन पद्धती स्वीकारण्याचा आग्रह केला. दलितांसाठी स्वत:ची विहीर खुली करून दिली.
स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात केली. विधवा, परित्यक्ता, स्त्रियांच्या पुनर्विवाहाचा विचार मांडला आणि तशी कृती केली. त्यातील एकतरी नवी पद्धत आजचा समाज नाकारेल का? केशवपन कोणी करेल का? मुलींना शिक्षण द्यायचे नाही, असे कोणी म्हणेल का? विधवेच्या विवाहास विरोध होईल का? सर्व जाती-पातीच्या लोकांनी एकत्र यावे, यासाठीची मोहीम कोणी नाकारेल का? फुले दाम्पत्यानी मांडलेल्या विचारांपासून एक तसूभरही मागे जाता येत नाही.
महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी सर्वसमावेशक समाजरचनेसाठीच संघर्ष सुरू केला. त्यांनी सर्व समाजाला एकत्र आणून स्वातंत्र्याचा लढा उभा केला. तो आज कोणीही नाकारू शकणार नाही. सर्व जाती-धर्म, स्त्री-पुरुष यांना एक केले. तो सर्वसमावेशकतेचा मार्गच होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर राज्यघटनेबरोबरच अनेक विषयांत भारताच्या विकासाची वाट तयार करून दिली. राज्यघटनेत अनेक आधुनिक मूल्यांची पेरणी त्यांनी केली. भारतीय समाजरचनेतील अंतर्विरोध किंवा विरोधाभास माहीत असल्याने हा समाज एकसंघ कसा राहील, त्याची उन्नती कशी होईल, याचा विचार त्यांनी मांडला. तोदेखील सर्वसमावेशकतेचा भाग होता. या विभूतींच्या नावासह काही संदर्भ दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की, त्यांनी केलेली मांडणी,केलेला संघर्ष आणि निर्माण केलेला आदर्श हा सदैव मानवी जीवनाच्या कल्याणासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. यासाठीच समाजातील अंतर्विरोध विचारात घेऊन समाज जोडणारी सर्वसमावेशकतेची तत्त्वे अंगीकारणे आवश्यक असते. राजर्षी शाहू महाराज यांचा विचार आणि कृती हीसुद्धा त्याच परंपरेतील आहे. तत्कालीन मानवी समाजाचा सर्वसमावेशक विकास होण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते त्यांनी केले.
आपल्या समाजात दारिद्र्य का आहे, गरिबी का आहे, मागासलेपण का आहे, याचा विचार त्यांनी केला. त्यावर उपाय काय असू शकतो, याचा विचार करून कृती कार्यक्रम राबविला. शिक्षण असेल तरच मानवाच्या अंगी कुशलता येईल, हे त्यांनी हेरले. कुशल मानवाला चांगली शेती, उद्योग आणि व्यापार करता आला पाहिजे, हे त्यांनी मांडले. त्यासाठीच्या सर्व पायाभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील हे त्यांनी हेरले. हा विचार आजही तंतोतंत लागू पडतो.या सर्व विभूतींची विचारधारा, कृती कार्यक्रम आणि संघर्ष संपूर्ण समाजाचा एकसंघपणे विचार करणारा होता. म्हणूनच शिवरायांची प्रेरणा अखंडपणे तेवत राहणार आहे. महात्मा फुले यांचा कार्यक्रम अखंडपणे चालत राहणार आहे. त्यापासून मागे येताच येणार नाही.
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समाज एकसंघ करण्यासाठीच्या समाजरचनेचा पाया मजबूतच करावा लागणार आहे. राजर्षी शाहू महाराज तर महान उद्योगशीलच होते. आधुनिक समाजरचनाकारच ते होते. या सर्वांच्या विचारधारेमध्ये एकसमान सूत्र दिसते ते ‘वसुधैव कुटुंबकम्!’ यासाठीच प्रणव मुखर्जी यांनी एका ठरावीक विचारधारेच्या आणि राष्ट्रवादाच्या आग्रहाची मांडणी करणाऱ्या व्यासपीठावरून त्यांनी केलेली मांडणी महत्त्वपूर्ण वाटते. ती सर्व समाजाला सामावून घेणारी आहे. जगभरातील अशा विभूतींच्या कार्याचा आणि विचारधारेचाही हाच अनुभव आहे.
प्रणवदा यांनी एक सुंदर भाषण केले. आपला विचार ठामपणे मांडला. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सर्वसमावेशक विचारधारेचा आग्रह धरणारा विचार व्यक्त केला, हे फार बरेच झाले. तो संघाच्या विचार परंपरेला छेद देणारा वगैरे आहे म्हणून तो बरे झाले, असे नाही, तर सर्वसमावेशकतेचा आग्रह धरणे आजच्या घडीला जरुरीचे आहे. ज्या ज्यावेळी सर्व समाज एकवटतो त्या-त्यावेळी मानवी कल्याणाच्या मूल्यांचाच विजय होतो. याची उदाहरणे दिली आहेत. छत्रपती शिवराय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत ती परंपरा आहे. तीच आपली प्रेरणा आहे.