आंबेडकर-ओवेसी समीकरण महाराष्ट्रात बदल घडवेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 06:59 PM2019-02-03T18:59:13+5:302019-02-03T18:59:37+5:30
विकासाच्या जोरावर राजकीय पक्ष सत्ता काबिज करण्याचे स्वप्न पाहतात. तो विकास गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य बहुजन, आदिवासी, अल्पसंख्याक, कष्टकरी, श्रमिक जनतेपर्यंत पोचल्याचे दिसत नाही....
विकास नेहमी आहे रे वर्गाच्या भोवतीच फिरत राहतो. तशीच सत्ता देखील काही घराण्यांमध्येच राहते. वंचित समूह केवळ मतदान करीत राहतात, ते सत्तेचे दावेदार किंवा सत्ताधारी बनत नाहीत. भारिपचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे चाकोरीबद्ध राजकारणाला फाटा देऊन सर्वसमावेशक राजकारण करत आले आहेत. आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अॅड. आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी एकत्र आले आहेत. मात्र, एमआयएममुळे काँग्रेसलाप्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करण्यात अडचण होती, हे हेरून ओवेसी यांनी आंबेडकरांसाठी आपल्याला एकही जागा नको, पण सन्मानाने काँग्रेसने आंबेडकरांना जागा द्याव्यात, असा प्रस्ताव ठेवला आहे.
- धनाजी कांबळे -
निवडणुकीच्या राजकारणात धनशक्तीच्या जोरावर मतांची विभागणी करता येणे शक्य असते. तसेच एका रात्रीत मतदारांचे मन वळविण्याचाही प्रयत्न अनेकदा केला जातो. अशा राजकारणात बहुजन समाजाचे नेते, उमेदवार टिकून राहतीलच याची काही शाश्वती देता येत नाही. तरी देखील राजकारणात नेहमीच पर्याय निर्माण होतात. आता देखील भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी स्थापन झालेली आहे. केवळ राजकारणासाठी नव्हे, तर बहुजनांच्या न्याय-हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी ही एक चळवळ बनेल, असा विश्वास त्यांच्या नेत्यांना आहे.
आज देशातील आणि राज्यातील वातावरणात एकप्रकारचा एकसुरीपणा आला आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, असे तत्व एकीकडे डोक्यावर नाचवले जात असताना सत्ता एकाच ठिकाणी केंद्रीत झाल्यासारखी परिस्थिती आहे. ज्या विकासाच्या जोरावर राजकीय पक्ष सत्ता काबिज करण्याचे स्वप्न पाहतात. तो विकास गेल्या काही वर्षांत सर्वसामान्य बहुजन, आदिवासी, अल्पसंख्याक, कष्टकरी, श्रमिक जनतेपर्यंत पोचल्याचे दिसत नाही. एकीकडे अराजकता, भीती निर्माण केली जात असताना काही लोक आजही समाज बदलाच्या लढाईत घट्ट पाय रोवून उभे आहेत. समतावादी, सम्यक समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पर्याय देणे ही एक विकासनितीच इतिहासात मानली गेली आहे. ज्या वंचित समाजांना अद्यापपर्यंत कधी कुणी प्रतिनिधीत्वच दिले नाही, अशा घटकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राजकीय स्वातंत्र्याची जाणीव करून देण्याचे काम सध्या अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केले आहे. विशेषत: गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून दलित, ओबीसी, आदिवासी, अल्पसंख्याक, धनगर, गरीब मराठा, आलुतेदार-बलुतेदार समाजाला एकत्र बांधण्याचे काम सुरू आहे. विविध वंचित घटकांचे मेळावे, सभा यांच्या माध्यमातून त्यांचे आत्मभान जागविण्याचे काम सध्या सुरू आहे. याला मिळणारा प्रतिसाद विचारात घेता आणि आजवर सत्तेच्या बाहेर असलेल्या या समाजांना सत्ताधारी बनविण्याचा विचार आंबेडकर यांनी केला आहे, असे दिसते. यातूनच त्यांनी अकोला पॅटर्ननंतर वंचित बहुजन आघाडीचा नवा प्रयोग केला आहे. हे सोशल इंजिनिअरिंग किती यशस्वी ठरते यावर पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट होईल. मात्र, ८० च्या दशकापासून आंबेडकर यांनी केलेल्या कामांमुळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जैविक वारसा असल्याने समाजात अॅड. आबेडकर यांच्याबद्दल एक आत्मीयता आणि आपुलकी आहे. त्यामुळेच सध्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यात होत असलेल्या त्यांच्या मेळाव्यांना लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते स्वत:ची भाकरी बांधून हजेरी लावत आहेत. ही ताकद प्रत्यक्षात मतांमध्ये परिवर्तित होईल का, हे आताच सांगता येत नसले तरी मतांची विभागणी मात्र होणार यात शंका नाही.
महाराष्ट्राचा भौगोलिक आणि सामाजिक इतिहास हा गरीब मराठा, आदिवासी, ओबीसी, दलित, बहुजन, मुस्लिम, धनगर समाजांची मोट बांधून सत्तेच्या टापूला धक्का देणारा आहे. हा वंचित समाज निर्णायक ठरू शकतो, याची पुरेपुर कल्पना अॅड. आंबेडकर यांनी आहे. त्यामुळेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीत स्वागत आहे, अशी खुली भूमिका घेतली आहे. त्याचाच परिणाम म्हणून तेलंगणात केसीआर यांच्यासोबत एकत्र राहून स्वत:चे सात उमेदवार मोठ्या फरकाने निवडणून आणण्यात ज्या एमआयएमची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्या एमआयएमचे नेते असुदुद्दीन ओवेसी यांनी आंबेडकर यांच्यासोबत आघाडी केली आहे. औरंगाबाद येथे झालेल्या जाहीर सभेत याबाबत घोषणा करण्यात आली. त्यात प्रकाश आंबेडकर हे आमचे केवळ राजकीय सहकारी नसतील, तर ते आमचे मोठे बंधू आहेत. त्यांच्या शब्दाबाहेर आम्ही जाणार नाही. भारताचे संविधान वाचविण्यासाठी आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, आम्हाला कुणीही एकमेकांपासून वेगळे करू शकत नाही, असे भावनिक आवाहन ओवेसी यांनी या सभेत केले होते. तेव्हापासून साधारण ७ ते ८ सभांमध्ये एमआयएमचे प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीच्या मंचावर येत असून, मोठ्या संख्येने मुस्लिम समाज या सभेलाही गर्दी करीत आहे, ही बाब अधोरेखीत करण्यासारखी आहे. भारिपसोबत एमआयएम आल्याने यांचा फायदा भाजपलाच होईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीत एमआयएमबरोबरच काही कम्युनिस्ट पक्ष आणि २५० सामाजिक संघटनांचा समावेश आहे. महादेव जानकर यांना हाताशी धरून धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन सत्तेची वाट सुकर करणाऱ्या भाजपने फसवणूक केल्याची भावना असलेला धनगर समाज आता वंचित बहुजन आघाडी आणि गोपीचंद पडळकर यांच्यामागे उभा राहिलेला आहे. पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीत यावे, असे आवाहन वंचित बहुजनच्या नेत्यांनी केले आहे. असे झाल्यास धनगरांची एक मोठी ताकद आंबेडकरांच्या सोबत उभी राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात न्यायालयानेच मुस्लिमांना आरक्षण देण्याची सूचना केलेली असताना, भाजप-शिवसेना सरकारने ते दिले नाही, म्हणून मुस्लिम समाजात एक असंतोष आहे. त्याचप्रमाणे तीन तलाक, गोहत्येच्या संशयावरून होणारे मॉब लिंचिंग यामुळे असुरक्षित असलेला मुस्लिम समाज वंचित आघाडीत आला असून, ओवेसी यांच्यामुळे महाराष्ट्रातील मुस्लिम समाज संपूर्ण ताकद पणाला लावण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, पुणे, परभणी, यवतमाळ, बीड, सांगली, नाशिक, नांदेड, सोलापूर, सातारा जिल्ह्यात झालेल्या सभांना आदिवासी, ओबीसी, धनगर, मुस्लिम, दलित समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून, निवडणूक जाहीर होण्याआधीच अवघा महाराष्ट्र प्रकाश आंबेडकर पिंजून काढत आहेत. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा लढवेल, तर लोकसभेच्या १२ जागा लढवण्याची शक्यता आहे.
विशेषत: भीमा कोरेगाव येथे बहुजन स्त्री-पुरुषांवर झालेल्या एकतर्फी हल्ल्यानंतर महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी अॅड. आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. त्यामुळे जे लोक तात्पुरत्या व्यक्तिगत फायद्यासाठी प्रस्थापितांसोबत होते. ते लोक आज प्रकाश आंबेडकर यांचे मागे येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला ‘शासनकर्ती जमात बना’ हा संदेश सत्यात येईल, अशी आशा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना वाटत असावी. असे असले तरी, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आघाडीत सहभागी व्हावे, असा प्रयत्न महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते करीत आहेत. मात्र, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत आजपर्यंत कोणतीच चर्चा दोन्ही बाजूंनी झाली नसल्याचे आंबेडकर सांगत आहेत. त्यातच एमआयएमला सोडून आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे, असा प्रस्ताव काँग्रेसकडून आला होता. त्यामुळे ओवेसी यांनी नांदेड येथील सभेत बोलताना ‘मला एकही जागा नको, पण अॅड. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसने सन्मानाने जागा द्याव्यात,’ असा प्रस्ताव ठेवला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एमआयएम बाजूला झाल्याने आघाडीचा मार्ग सुकर झाल्याचे म्हटले आहे. मात्र, किती जागा वंचित बहुजन आघाडीला सोडल्या जातील, याबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही. ‘मेरे अजीज दोस्तो और बुजुर्गो, इज्जतदार माँ-बहनो...’ अशा काळजाला हात घालणाऱ्या शब्दांनी भाषणाची सुरुवात करून आक्रमकपणे पण अभ्यासपूर्ण मांडणी करण्यात ओवेसी यांचा हातखंडा आहे. जमलेल्या गर्दीला दिशा देणारे आणि माणसा- माणसाला जागे करीत जाणारे वास्तव उलगडणाऱ्या अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचा हा सिलसिला मतांमध्ये परावर्तित होतो का, तिसºयालाच याचा फायदा होतो, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. अॅड. आंबेडकर काँग्रेस आघाडीत सामील झाल्यास त्यांना त्याचा फायदाच होऊ शकेल, मात्र वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांनी आता उठवलेलं रान जर मतांमध्ये परावर्तित झाले, तर काही जागा त्यांना मिळू शकतील. तरीही मतांची विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजप-सेनेला होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
................................
अन् राजगृहाकडे वळली पावले...!
ज्या राजगृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याचा वारसा आहे. त्या ऐतिहासिक राजगृहावरून आता दलित, बहुजनांच्या सत्तेची सूत्रे हलत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजगृहावर जाऊन अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याची घटना ऐतिहासिकच म्हटली पाहिजे. कारण याआधी स्वाभिमान गहाण ठेवून कोणाच्या तरी वळचणीला जाऊन बसणारे दलित नेतृत्त्व अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे स्वाभिमानानेच सत्तेचे राजकारण करता येते, हे अॅड. आंबेडकर दाखवून देतील, अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये आहे.