अमेरिकेच्या राजकारणाने आता अत्यंत असभ्य वळण घेतले आहे. तेथील राष्ट्राध्यक्षपदासाठी येत्या नोव्हेंबरात होणाऱ्या निवडणुकीतील आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी डेमॉक्रेटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांनी लढविलेल्या प्राथमिक निवडणुकीत दिसलेली राजकारणाची उच्च पातळी आता तशी राहिलेली नाही. अंतर्गत सुरक्षा, दहशतवाद, परराष्ट्र धोरण, आर्थिक सुधारणा आणि सामान्य माणसांच्या जीवनमानाची उंचावयाची पातळी यावर तेव्हा दोन्ही उमेदवारांत झडलेले वादविवाद आता इतिहासजमा झाले आहेत. विचारांवर तेव्हा होताना दिसलेली लढाई आता रस्त्यावर उतरून सडकछाप बनू लागली आहे. डेमॉक्रेटिक पक्षाने हिलरी क्लिंटन यांना आपली उमेदवारी दिली, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी हिसकावून घेतली. ट्रम्प यांची पूर्वीच्या निवडणुकीतील भाषणेही विचार, व्यवहार, धोरण आणि प्रशासकीय सुधारणा यावर होत असतानाच एकाएकी व्यक्तिगत आणि तीही खालच्या पातळीवर येताना दिसायची. आपण एका सभ्य व यशस्वी ठरलेल्या महिला उमेदवाराविरुद्ध लढत आहोत म्हणून आपल्या भाषणांची व प्रचाराची उंची अधिक वरची व सभ्य असावी याविषयीचे त्यांचे भान तेव्हाही वेळोवेळी सुटत असे. अनेक अतिश्रीमंत व सामाजिक भान नसलेली माणसे जशी बोलतात व वागतात तसे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्याही काळात उभे राहिले. अमेरिकी वृत्तपत्रांच्या भाषेत सांगायचे तर ते आणि अध्यक्षपद यांत हिलरींचाच काय तो अडसर राहिला आहे. तो दूर करायसाठी ते ज्या गलिच्छ पातळीवर आता उतरले आहेत ती पाहता भारतातील निवडणुका अधिक सभ्य पातळीवर लढविल्या जातात असे कोणालाही वाटावे. हिलरींच्या आयुष्यात आलेला दु:खद व जिव्हारी लागणारा विषय हा त्यांचे पती बिल क्लिंटन यांच्या आयुष्यात आलेल्या अन्य स्त्रियांबाबतचा आहे. मोनिका लेवेन्स्की या मुलीने त्यांच्याशी असलेल्या आपल्या शरीरसंबंधांवर उघडपणे साऱ्यांना सांगून बिल यांना अडचणीत आणले होते. त्यासाठी अमेरिकेच्या सिनेटने बिलविरुद्ध महाभियोगाचा खटलाही चालविला होता. त्या साऱ्या प्रकारांनी आपल्या आयुष्यावर आणलेली काजळी हिलरी यांनी त्यांच्या ‘द लिव्हिंग हिस्ट्री’ या आत्मचरित्रात कमालीच्या सविस्तरपणे आणि पाणीभरल्या डोळ्यांनी सांगितली आहे. मात्र त्यानंतर त्या सिनेटर झाल्या. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री म्हणून यशस्वी झाल्या. (आणि झालेच तर बिल यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकेने जेवढे वैभवशाली दिवस अनुभवले तेवढे त्याआधी व नंतरही त्यांच्या वाट्याला आले नाहीत, हेही येथे नोंदविण्याजोगे.) डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेला पहिला अध्यक्षीय वादविवाद हिलरींनी जिंकल्यानंतर आता होणाऱ्या दुसऱ्या वादविवादात आपण हिलरींच्या नवऱ्याची विवाहबाह्य प्रकरणे चर्चेला आणू, झालेच तर त्या मोनिकाला तो वादविवाद ऐकायला समोरच्या रांगेत आणून बसवू असेही ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. या अपप्रकाराला हिलरींनी कोणतेही उत्तर दिले नाही व तसे काही घडलेच तर त्यालाही त्या समर्थपणे तोंड देतील यात शंका नाही. मात्र अमेरिकेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहचू शकणारा माणूसही कोणती पातळी गाठू शकतो हे या वादात ट्रम्प यांच्या वर्तनाने उघड केले आहे. त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्या पत्नीची, तिच्या तारुण्यातली नग्न छायाचित्रे (जी तेव्हा एका फ्रेंच नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर तिच्या संमतीने प्रकाशित झाली) ती आता उघड्यावर आली आहेत. शिवाय ट्रम्प यांनी १८ वर्षे अमेरिकेच्या संघ सरकारचे कर भरले नसल्याचीही भानगड याचवेळी प्रकाशात आली आहे. त्यावर आपण हे कर शिताफीने व वकिलांच्या सल्ल्याने चुकवून आपल्या बुद्धीची चमकच दाखवून दिली, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. हिलरींनी मात्र त्यांच्या पातळीवर जाण्याचे टाळले असून मिसेस ट्रम्प यांच्या छायाचित्रांविषयी त्यांनी चकार शब्दही आजवर उच्चारलेला नाही. देशाचे प्रमुखपद मिळवू इच्छिणारी व्यक्ती देशाचे कर भरणारी व किमान सभ्य वागणारी असावी अशीच जनतेची अपेक्षा असते. हिलरींनी याविषयीचा आपला संयम अद्याप कायम राखला आहे. (याच काळात न्यू यॉर्क टाइम्स या हिलरींना पाठिंबा देणाऱ्या वजनदार वृत्तपत्राने ‘कुत्री म्हणत असाल तरी हिलरीच हवी’ असे कमालीचे धक्कादायक आठ कॉलमी शीर्षक आपल्या पहिल्या पृष्ठावर प्रकाशित करावे ही तरी कशाची साक्ष?) ट्रम्प हे मात्र ही निवडणूक कोणत्या गटारी पद्धतीने पुढे नेतील याची धास्ती आता अमेरिकेने घेतली आहे. फ्रान्स हा सांस्कृतिकदृष्ट्या अमेरिकेहून अधिक स्वतंत्र व मोकळा देश आहे. त्याचे अध्यक्ष आपल्या मैत्रिणीसोबत अध्यक्षीय प्रासादात सन्मानाने राहतात. त्यांच्या अगोदरच्या मैत्रिणीपासून त्यांना चार मुले झाली आहेत. त्या मैत्रिणीनेही त्या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक एकवार लढवली आहे. मात्र त्या देशात नेत्यांच्या खासगी जीवनाची चर्चा कुणी राजकारणात करीत नाहीत. जगातल्या इतर लोकशाही देशांच्या नेत्यांनी यातून जमेल तेवढा धडा स्वत:साठीही घेतला पाहिजे.
अमेरिका, एवढी असभ्य आणि अप्रगत ?
By admin | Published: October 10, 2016 5:07 AM