अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आजवरच्या इतिहासात कधीही झाला नव्हता इतका गलिच्छ आणि खालच्या पातळीवरचा प्रचार यावेळी होतो आहे. चार दिवसांपूर्वी रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभाषणाच्या ज्या ध्वनिमुद्रित आवृत्त्या लोकांसमोर आल्या, त्यातील महिलांच्या संदर्भातील अत्यंत अश्लील व अर्वाच्य शेरीबाजीच्या संभाषणाबद्दल ट्रम्प यांनी माफी मागितली खरी, पण त्यात मानभावीपणाच अधिक होता. या पार्श्वभूमीवरच ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यातल्या वादविवादाची दुसरी फेरी पार पडली.यावेळी काही निवडक निमंत्रितांना उमेदवारांना प्रश्न विचारण्याची संधी मिळाली. त्यात एक मुस्लीम महिला गोर्बा हमीद हीदेखील होती. अमेरिकेत सध्या वाढत असलेल्या इस्लामोफोबियाबद्दल काय करण्याची त्यांची योजना आहे असा थेट प्रश्न तिने दोन्ही उमेदवारांना केला. इसीसचा उदय, सिरीयासह मध्य आशिया आणि आफ्रिकेतला सध्याचा हिंसाचार आणि संघर्ष व त्यामुळे युरोपासह इतर देशांमध्ये जाणारे मुस्लीम निर्वासितांचे लोंढे या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या निवडणुकीत मुस्लीमांच्या विषयाला वेगळे महत्व येणारच आहे. गोर्बा हमीदने विचारलेला प्रश्न आणि त्याला ट्रम्प आणि क्लिंटन यांनी दिलेले उत्तर याची चर्चा अमेरिकेच्या आणि जगातल्या इतर देशांच्या प्रसारमाध्यमांमध्ये होते आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने आपल्या संपादकीयात म्हटले आहे की, ट्रम्प हे सतत वेगवेगळ्या लोकांचा उपमर्द करीत असल्याच्या क्लिंटन यांच्या आरोपाचे प्रत्यंतर लगेचच पाहायला मिळाले. अमेरिकेतले मुस्लीम सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची असणारी माहिती लपवतात आणि अमेरिकेत येणारे मुस्लीमांचे अतिरेक्यांशी संबंध असतात असे ट्रम्प यांनी सांगितले. मुस्लीमांना प्रवेशबंदी करण्याचा आपला विचार योग्यच असल्याचेही त्यांनी ध्वनित केले. पण हे कसे साधणार याविषयी कोणतीही व्यवहार्य आणि ठोस कल्पना ते सांगू शकले नाहीत. मात्र हिलरी यांनी अमेरिकेविषयीच्या आपल्या कल्पनेत धर्माच्या आधारावर कोणालाही वेगळे करणे मान्य नसल्याचे सांगितल्याचे पोस्टने नमूद केले आहे. इस्लामवर घालण्यात येणाऱ्या सर्वंकष बंदीची अंमलबजावणी कशी होईल याबद्दल कोणतीही निश्चित कल्पना ट्रम्प यांना मांडता आली नाही, हे रॉबर्ट कोस्टा , फिलीप रुकेर आणि ज्युलियन ऐल्प्ररीन यांनी पोस्टमधल्या आपल्या आढाव्यातही नोंदवले आहे. उलट ट्रम्प यांचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार माईक पेन्स यांना ही बंदी मान्य नाही हे सांगितल्यावर आपले याबद्दलचे मत त्यांच्यापेक्षा वेगळे आहे असे ट्रम्प यांनी बेधडकपणाने सांगितले.
-प्रा. दिलीप फडके
‘गार्डियन’मधल्या आपल्या वार्तापत्रात रिचर्ड वोल्फे यांनी ट्रम्प यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. आपल्याबद्दलच्या अत्यंत आक्षेपार्ह गोष्टी उघड झाल्याने ट्रम्प यांना लाज वाटल्याचे वा पश्चाताप झाल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून दिसत नव्हते, असे सांगून ते लिहितात, एखादे जखमी श्वापद ज्याप्रमाणे विचित्रपणाने वागत असते त्याप्रमाणेच ट्रम्प यांचे वर्तन होते. मुस्लीम महिलेच्या प्रश्नाचे उत्तर देतांना तिच्यापासून केवळ दोन फुटांवर उभे राहात इस्लामोफोबिया असणे लाजीरवाणे आहे असे म्हणत असतांनाच त्याचे त्यांनी समर्थनही केले व आजच्या काळात राजकीयदृष्ट्या ही भूमिका योग्य असल्याचेही सांगितले. याउलट हिलरी क्लिंटन अधिक संतुलित व पोलिटिकली अधिक करेक्ट होत्या असेच म्हणावे लागेल. पाकिस्तानच्या ‘द नेशन’ने, मुस्लीमांवरच्या बंदीबाबत हिलरीने ट्रम्प यांच्यावर टीका केली अशा आठ कलमी मथळ्याखाली दिलेल्या विशेष वार्तापत्रात अध्यक्षीय निवडणुकीतल्या वादविवादामधील इस्लामशी संबंधित भागाला महत्वाचे स्थान दिले आहे. ‘मी अशा अनेक मुस्लीमांना भेटले आहे, जे अमेरिकेला आपला देश मानतात आणि आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी काम करतात व ज्यांना आपण अमेरिकेच्या दृष्टीने महत्वाचे आहोत आणि अमेरिकेतल्या समाजात आपला समावेश होतो याचा अभिमान आहे’, असे हिलरी यांनी सांगितल्याचा उल्लेख नेशनने आवर्जून केला आहे. ‘आपल्या कल्पनेतल्या अमेरिकेत जे कुणी अमेरिकेसाठी कठोर परिश्रम घेण्यास तयार आहेत आणि इथल्या समाजासाठी आपले योगदान देण्यास तयार आहेत अशा सर्वांना स्थान आहे व हेच अमेरिकेचे खरे स्वरूप आहे आणि आपल्या मुला-नातवांसाठी आपल्याला अशीच (व्यापक पायावर आधारलेली) अमेरिका हवी आहे’ असे हिलरींनी सांगितल्याचेही नेशनने नमूद केले आहे. हिलरी-ट्रम्प वादविवादानंतर ट्विटरवर अनेक मुस्लीमांनी ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठवल्याची सविस्तर माहितीही नेशनमध्ये वाचायला मिळते. याच मुद्द्यावरून ट्रम्प यांच्यावर ट्विटरवरु न झालेल्या टीकेची सविस्तर माहिती ‘टाईम’मध्येही वाचायला मिळते. याच विषयावरचा नेशनमधला मीना मलिक हुसेन यांचा ‘सॉक्रेटिक स्टेट’वरचा लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. तुमचे नाक जिथे सुरु होते तिथे माझे व्यक्तिस्वातंत्र्य संपते से सांगत त्यांनी सॉक्रे्टसलासुद्धा समाजाचे सर्वमान्य नियम स्वीकारावे लागले होते, हे सांगत व्यक्तिगत अधिकारांच्या मर्यादा सांगितल्या आहेत. ट्रम्प यांच्यासारखी भ्रष्ट नैतिकता असणारी आणि कोणतेही नीतीनियम न पाळता बोलणारी आणि वागणारी व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर येण्याची नुसती चर्चा होणे हेदेखील कितीही वाईट आणि धोकादायक असले तरी लोकशाही व्यवस्थेची चौकट अधिक महत्वाची आहे हे त्यांनी सांगितले आहे. त्या चौकटीतच याबद्दलचा विचार आणि कृती व्हायला हवी असे त्या सांगतात.पाकिस्तानच्या ‘डॉन’मधला जन्नत मजीद यांचा मी पाकिस्तानी आहे आणि ट्रम्प यांचा उदय मला घाबरवतो आहे हा लेखदेखील वाचण्यासारखा आहे. अमेरिकेत राहणाऱ्या मूळ पाकिस्तानी मजीद यांना या साऱ्याबद्दल जे वाटते, ते त्यात प्रकट झाले आहे. ट्रम्प यांचा उदय विनाकरण झालेला नाही असे सांगत आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या वातावरणात लोकांच्या मनातली भीती आणि अस्वस्थता यांचा रोख मुस्लीम समाजाकडे वळवणे अधिक सहज शक्य झाले आहे. मुस्लीम समाज हा विश्वासपात्र नाही आणि देशामधल्या कायद्याचे पालन करायची त्यांची तयारी नाही असा समज उत्पन्न करून त्यांना बळीचा बकरा बनवून ट्रम्प यांचा सगळा प्रचार सुरु असल्याचे मजीद यांनी सविस्तरपणे मांडले आहे. एकूणातच अमेरिकेच्या निवडणुकीत अमेरिकेशी संबंधित इतर विषयांबरोबरच तिथल्या आणि पर्यायाने जगातल्या इस्लाम धर्मीयांबद्दलच्या चर्चेलादेखील विशेष महत्व आले आहे व या इस्लामोफोबियाच्या विरोधात जनमत व्यक्त व्हायला लागले आहे.