शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

डोसा-सांबार नाही, पॉपकॉर्न आणि पिझ्झाच!

By aparna.velankar | Published: August 03, 2024 8:09 AM

त्यांच्या नावात ‘कमळ’ आहे, त्यांच्या आईचे माहेर तामिळनाडूचे; म्हणजे ‘त्या आमच्याच’ हा भारतीय गळेपडूपणा कमला हॅरिस यांना परवडणारा नाही. कारण?

अपर्णा वेलणकर, कार्यकारी संपादक, लोकमत

‘माझी मुलगी टीनएजर आहे, समजा काही करून बसली आणि प्रेग्नन्ट झाली तर मी तिला कशी सोडवू त्यातून?’ - अमेरिकेतल्या मुक्कामात एक मैत्रीण संतापून अत्यंत उद्वेगाने हे म्हणाली, तेव्हा घमासान चर्चा सुरू होती अमेरिकेतल्या अध्यक्षीय निवडणुकीची! जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातला ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’ नुकताच होऊन गेला होता. थकलेल्या, आत्मभान पुरते गमावून बसलेल्या बायडेन यांची बेफिकीर, वाचाळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पार वाताहत होऊन गेली होती. 

अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक मतदारांमध्ये टोकाची निराशा पसरलेली.  ट्रम्प समर्थक चेकाळलेले आणि बायडेन यांचे नावही घेण्याचा उत्साह नसलेले डेमोक्रॅट मतदार हतबल, वैतागलेले, असे एकूण चित्र! पण काही दिवसांतच (बायडेन यांच्या अध्यक्षीय स्वप्नांचा  खून करणारी) ‘ती’ गोळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाला चाटून जाणे, बायडेन यांनी निवडणुकीतून माघारीची घोषणा करणे आणि कमला हॅरिस नावाच्या खमक्या बाईने डेमोक्रॅटिक पक्षाचे नॉमिनेशन मिळवून ट्रम्प यांच्यासमोर मैदानात उतरणे हे इतक्या वेगाने घडले की उद्वेगाने दगड घासायची वेळ आलेली असताना एकदम ठिणगीच उडावी! बायडेन यांचा दुबळा प्रतिकार सहज चिरडून ट्रम्प(च) प्रेसिडेंट होणार हे गृहीत धरण्याची सक्ती झालेल्या  आणि तसे झाल्यास ‘स्वेच्छा गर्भपाता’वरची काही राज्यातली बंदी देशव्यापी होऊन अधिक आवळली जाण्याच्या शक्यतेने धास्तावलेल्या त्या मैत्रिणीच्या मनातले ‘अमेरिकन ड्रीम’ आता पुन्हा जिवंत झालॆ आहे.. आणि अशी भावना असलेली ती  एकटी नाही.  

एरवी अमेरिकेत बहुसंख्य नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी राजकारण थेट जोडलेले नसते, कारण अपवाद वगळता उत्तम चालणाऱ्या दैनंदिन व्यवस्था! पण यावेळचे चित्र काहीसे वेगळे आहे. ‘बाईचा तिच्या देहावर हक्क असावा की नाही?’, ‘(किमान अधिकृत) स्थलांतरितांच्या समूहांचे ‘अमेरिकन ड्रीम’ हा देश शाबूत राखणार की नाही?’ आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ‘मुक्त आचार-विचार स्वातंत्र्याचे जीवतोड रक्षण करणारा देश’ ही अमेरिकेची ओळख कायम राहणार की कमावलेले सारे पुसून ही महासत्ता कट्टर धर्मनिष्ठ, संकुचित आणि वर्चस्ववादी उजव्या  मानसिकतेतून आपली दारे-खिडक्या बंद करून घेणार?- याचा फैसला यावर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत व्हायचा आहे. 

व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य जाणणाऱ्या.. वेगळा धर्म, वेगळा वंश, वेगळ्या आचार-विचारांच्या सहअस्तित्वाचे  नेमके भान असणाऱ्या कमला हॅरिस यांचे अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणे त्या देशातल्या उदारमतवादी, स्वातंत्र्यप्रिय लोकांसाठी महत्त्वाचे आहे ते या पार्श्वभूमीवर! ‘तिकडल्या’ इंडियन-अमेरिकन समूहामध्ये कमलाबाईंबद्दल उत्सुकता आहे का?- तर आहे, पण ती ‘इकडल्या’ इंडियन-इंडियन समूहासारखी अकारण गळेपडू नाही. बाईंच्या नावात कमळ आहे, त्यांची ‘भारतीय’ आई तामिळनाडूतल्या एका छोट्या गावातून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती आणि छोटी कमला तिच्या बहिणीसह  लहानपणी आपल्या आजोबांना भेटायला दर उन्हाळ्याच्या सुटीत चेन्नईला येत असे, या भांडवलावर ‘त्या आमच्याच’ असा हक्क सांगू पाहणाऱ्या कट्टर उजव्या भारतीयांना कमला हॅरिस यांनी उपाध्यक्ष असतानाच्या   गेल्या चार वर्षांत फारसा भाव दिलेला नाही. त्या अध्यक्षपदी निवडून आल्या तरीही या वास्तवात बदल होण्याची शक्यता कमीच! 

..कारण अमेरिकेत अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘आयडेंटिटी पॉलिटिक्स’चे कमला यांना असलेले नेमके भान! ‘फेल्ड, वीक अँड डेंजरसली लिबरल’ अशी कुत्सित टीका असलेली  जाहिरात प्रसारित करून  ट्रम्प यांनी आपल्या नव्या प्रतिस्पर्ध्याचे ‘स्वागत’ केले. दोनच दिवसांपूर्वी शिकागोत झालेल्या कृष्णवर्णीय पत्रकारांच्या अधिवेशनात तर त्यांनी कहरच केला. “हू इज शी? ब्लॅक ऑर इंडियन?’ असा अत्यंत उद्धट प्रश्न करून ते म्हणाले, ‘आताआतापर्यंत तर ही बाई आपले ‘इंडियन हेरिटेज’ मिरवत होती आणि आता तिने आपण ब्लॅक आहोत असे सांगायला सुरुवात केलीय. आहे कोण ही नक्की?’- या प्रश्नाचे नेमके उत्तर तयार  ठेवण्याची खबरदारी कमला हॅरिस यांनी सार्वजनिक जीवनात उतरण्याच्या कितीतरी आधीपासून  घेतलेली दिसते. 

आई भारतीय वंशाची, वडील आफ्रिकेतून स्थलांतरित झालेले. जमैकन. मिश्र वर्णाच्या कमला गेली अनेक वर्षे स्वतःला ‘साउथ एशियन अमेरिकन, आफ्रिकन अमेरिकन’ असेच म्हणवून घेत आल्या आहेत. मात्र, त्यांच्या एकूण ‘आयडेंटिटी पोझिशनिंग’मध्ये कृष्णवर्णीयांशी असलेली थोडी अधिकची जवळीकही त्यांनी लपवलेली नाही. ‘वंशभेदाची ठळक रेघ असलेल्या अमेरिकेत आपण दोन ब्लॅक मुलींना वाढवतो आहोत हे माझी आई कधीही विसरली नाही’ असा उल्लेख त्यांनी ‘द ट्रुथ वी होल्ड’ या आत्मचरित्रातही केलेला आहे. त्यांची आई श्यामला गोपालन  या साठच्या दशकात अमेरिकेत कृष्णवर्णींयांच्या हक्कांसाठी उभ्या राहिलेल्या चळवळीत सक्रिय होत्या. तोच वारसा घेऊन अमेरिकन अध्यक्षपदाच्या लढाईत उतरलेल्या कमला हॅरिस यांचे मिश्रवर्णीय (खरेतर गौरेतर) असणे, स्थलांतरित असणे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्त्री असणे हे त्रांगडे किती अडचणीचे असू शकते याची कल्पना (आताच्या) अमेरिकेबाहेरच्या व्यक्तीला करता येणे मुश्कीलच! 

गौरवर्णीय वंशवर्चस्व अहंभावाने मिरवणाऱ्या ट्रम्प यांच्यासारख्या वाचाळ प्रतिस्पर्ध्याचा सामना करताना आपले ‘भारतीय’ (आणि जमैकन) मूळ बाजूला सारून खऱ्याखुऱ्या ‘अमेरिकन ड्रीम’ला साद घालण्यात कमला यशस्वी होतात का, यावरच ‘स्वींग स्टेट्स’मधल्या मतदानाची गणिते ठरतील. एका ख्यातनाम कुकरी शो मध्ये कुरकुरीत ‘डोसा’ बनवून दाखवणाऱ्या; पण लगेच ‘पॉपकॉर्न आणि पिझ्झा हेच माझे ‘कम्फर्ट फूड आहे’ हे सांगायला न विसरणाऱ्या कमलाबाई अमेरिकेतल्या भारतीय समुदायाला ‘आपल्या’ वाटल्या, तरी तशा ‘दूरस्थ’च आहेत, त्या म्हणूनच!aparna.velankar@lokmat.com 

टॅग्स :Kamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिका