शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
2
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंचा 'या' मतदारसंघातील उमेदवाराबद्दल मोठा निर्णय
3
"...तर पाय कलम करू", नितेश राणेंना मारण्याची धमकी देणाऱ्या सिद्दिकींना नारायण राणेंचे उत्तर
4
AUS vs IND : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी यजमानांची 'भारी' तयारी; क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
5
Salman Khan : हस्ताक्षरामुळे उघड होणार सलमान खानच्या घरावरील गोळीबार आणि पत्राचं रहस्य
6
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो
7
भारत ऑस्ट्रेलियाशी टेस्ट मालिका हरला तरीही WTC Final गाठू शकतो, जाणून घ्या गणित
8
मुस्लिमांसाठी १० हजार कोटींचं बजेट; मविआच्या जाहीरनाम्यात समाजवादी पक्षाची मागणी
9
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
10
‘गुरुचरित्र’सारखा प्रभाव, दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे सार; मनोभावे स्मरण, लाभेल पुण्य!
11
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
12
कोण आहे अमन देवगण? 'आजाद'मधून करतोय पदार्पण, अजय देवगणसोबत आहे हे कनेक्शन
13
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
14
'अनुपमा' फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे नवे आरोप; म्हणाली, "ती माझ्या आईच्या बेडवर..."
15
सीमेवर नवी ताकद... आता भारतीय लष्कराला मेड इन इंडिया ASMI शस्त्र मिळणार!
16
Swiggy IPO गुंतवणूकीसाठी खुला, अँकर गुंतवणूकदारांकडून उभे केले ५००० कोटी; GMP काय?
17
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
18
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
19
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
20
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?

आमीर, आम्हीही तुझ्याप्रमाणे चिंतित आहोत

By admin | Published: November 29, 2015 11:39 PM

आमीर खान हा बॉलिवूडचा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. तो एक विचार करणाराही अभिनेता असून, त्याचे सर्वच चित्रपट नायक-नायिकेने गाणी म्हणत झाडाभोवती गिरक्या घालण्याच्या घिश्यापिट्या चाकोरीहून वेगळे आहेत.

विजय दर्डा, (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)आमीर खान हा बॉलिवूडचा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. तो एक विचार करणाराही अभिनेता असून, त्याचे सर्वच चित्रपट नायक-नायिकेने गाणी म्हणत झाडाभोवती गिरक्या घालण्याच्या घिश्यापिट्या चाकोरीहून वेगळे आहेत. कयामत से कयामत तक या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून देणाऱ्या पहिल्या चित्रपटापासून तर सरफरोश, गुलाम, लगान, मंगल पांडे, रंग दे बसंती, तारे जमीं पे, थ्री इडियट््स आणि पीके इत्यादि आजवरच्या चित्रपटांतून व सत्यमेव जयते या टेलिव्हिजनवरील कार्यक्रमातून त्याने सर्वसामान्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. आमीरने रुपेरी पडद्यावर साकार केलेली पात्रे पाहताना आणि त्याच्या कलेचा आनंद घेताना तो एक मुस्लीम आहे असा कोणी विचार केला असेल, असे मला वाटत नाही. रोजच्या व्यवहारात आपल्या संपर्कात येणारी व्यक्ती अमुक एका धर्माचे प्रतिनिधित्व करणारी आहे, असा विचार करण्याची आपणा भारतीयांना सवय नाही. खरे तर असा प्रश्नच निर्माण होत नाही.गेल्या आठवड्यात दिल्लीत रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात व्यक्त केलेल्या सडेतोड मतांबद्दल आमीरच्या देशभक्तीबद्दल शंका घेतली जाणे व एकूणच त्याच्याविरुद्ध ओरड होणे क्लेषदायी होते. त्यावेळी आमिरने काय म्हटले होते ते जसेच्या तसे उद््धृत करणे येथे अधिक श्रेयस्कर ठरेल: ‘सध्या आधीपेक्षा जास्त भीतीची भावना आहे, हे माझे उत्तर मी पूर्ण करू इच्छितो. मला असे नक्की वाटते की, देशवासीयांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. मी घरी किरणशी (पत्नी) बोलतो तेव्हाही हे जाणवते. मी आणि किरण संपूर्ण आयुष्य भारतात राहिलेलो आहोत. आपण भारत सोडून जाऊ या का, असे किरणने प्रथमच विचारले. किरणने मला असे विचारणे हे खूप मोठे व धोक्याचे होते. तिला तिच्या मुलाविषयी भीती वाटते. रोज वर्तमानपत्र उघडताना ती घाबरते. यावरून वाढती असमाधानाची, वाढत्या निराशेची भावना असल्याचे दिसते. तुम्हाला नैराश्य आल्यासारखे वाटते... असे का बरं होत आहे?’अनंत गोएंका यांनी विचारलेल्या प्रश्नाला आमीरने दिलेल्या प्रदीर्घ उत्तराचा हा भाग होता. त्यात पुरस्कार वापसी, साहित्यिकांचे निषेध व वाढती असहिष्णुता याचीही चर्चा झाली. पण आपण किंवा आपली पत्नी देश सोडून जात असल्याचे किंवा तसा विचार असल्याचे आमीरने कुठेही म्हटले नव्हते. या विधानावरून राजकीय वादळ उठल्यानंतर आमीरने आणखी एक निवेदन प्रसिद्ध करून आपल्या आधीच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला व आपण भारत सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही, आणि आपल्याला आपल्या देशातून कुणीही काढू शकत नाही, असेही त्याने ठामपणे सांगितले. आमीरच्या या विधानाची चिकित्सा करायची झाले तर त्यास एका भारतीय मातेला आपल्या मुलाविषयी वाटणारी चिंता असे म्हणता येईल. पण हल्लीचे वातावरणच असे आहे की या विधानावरूनही ज्याने त्याने आपला फुटपाडू अजेंडा पुढे रेटला. वास्तवात स्वत:ला भाजपा आणि संघाचे कथित हितचिंतक म्हणवून घेणाऱ्यांनीच आमीरविरुद्ध मोहीम चालविली. या टीकेचा रोख आणि भाषा पाहिली असता ती धाकदपटशा करण्याच्या उद्देशाने केलेली होती याविषयी काही शंका राहत नाही. ही भीती व्यापारी बहिष्काराची होती व एका हिंदू देशाने तु्म्हाला ‘किंग खान’ केले आहे याची बॉलिवूडमधील तीन खानांना आठवण करून देण्यासाठी होती. हे केवळ मौखिक पातळीपुरते मर्यादित राहिले नाही, ही आणखी एक चिंतेची बाब आहे. याचे कारण असे की जो कोणी आमीरच्या श्रीमुखात भडकवेल त्याला एक लाख रुपयांचे बक्षिस देण्याचे आव्हानही पंजाबमधील शिवसेनेच्या एका स्थानिक नेत्याने दिले. अर्थात, ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही, असा खुलासा शिवसेनेने केला. तरीही एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने असे हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे विधान करावे का, हा प्रश्न शिल्लक राहतोच.मला असे वाटते की, आमीरच्या वक्तव्यावरून उमटलेल्या प्रतिक्रिया आपणा सर्वांनाच चिंता वाटावी अशा आहेत. सरकारच्या बाजूने असलेल्या लोकांनी आमीरसारख्या संवेदनशील अभिनेत्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासही आक्षेप घ्यावा आणि लोकांना त्यांच्या धर्माच्या आधारे धमक्या दिल्या जाव्या अशा भारताची आम्हाला चिंता वाटते. आमीरसारख्या समाजात प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत असे घडत असेल तर सामान्यांची काय अवस्था होईल, याची सहज कल्पना येऊ शकते. देश आणि एखाद्या वेळी सत्तेवर असलेले सरकार यातील फरक आपण ओळखायला हवा. माझ्या देशभक्तीविषयी शंका घेतली न जाता मी सरकारवर केव्हाही टीका करू शकतो. तो माझा मूलभूत अधिकार आहे. हा जसा आमीरचा मूलभूत हक्क आहे तसा तुम्हा-आम्हा सर्वांचा आहे. राज्यघटना हाच देशाचा एकमेव धर्मग्रंथ असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिलेली असताना, राज्यघटनेने दिलेला हा मूलभूत हक्क बजावल्याबद्दल कोणालाही टीकेचे लक्ष्य केले जाऊ शकत नाही किंवा त्यास त्रास दिला जाऊ शकत नाही.भारतासारख्या विविधांगी संस्कृतींच्या, धर्मांच्या व भाषांच्या देशाच्या मूलगामी स्वरूपास धक्का लावण्याचा काही असामाजिक घटकांचा डाव आहे. साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ, साध्वी प्राची, गिरिराज सिंह यांच्यासारखे लोक अशी प्रक्षोभक विधाने करू शकतात, याची लोकांना खरी चिंता वाटते आहे. यापूर्वीही अनेकांनी वैयक्तिक पातळीवर अशी बेजबाबदार विधाने नेहमीच केली आहेत व समाजानेही फारशा गांभीर्याने न घेता ती पचविली आहेत. पण यावेळी फरक असा आहे की, यावेळी सरकार भाजपाचे आहे व पंतप्रधान मोदी आहेत. अशी वाह्यात बडबड करणाऱ्या स्वपक्षीय खासदारांना आणि मंत्र्यांना पंतप्रधानांनी रोखले पाहिजे जेणेकरून लोकांना विश्वास होईल की, ‘सबका साथ, सबका विकास’ हाच त्यांचा अजेंडा आहे आणि तो मागे पडणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवार्थ राज्यघटनेशी देशाची प्रतिबद्धता व्यक्त करण्यासाठी लोकसभेत झालेल्या दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी सर्व आवश्यक अशी आश्वासने दिली. पण या ‘असहिष्णुतेच्या दूतां’ना मोंदींनी जाहीरपणे खडसावले पाहिजे आणि काही ठोस कारवाई केली पाहिजे जेणेकरून यादिशेने भविष्यात गुन्हे घडणार नाहीत. एक पक्ष या नात्याने भाजपाने असहिष्णुता निर्माण करणाऱ्यांचा बचाव करता कामा नये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहील याची काळजी घेतली पाहिजे. लोकसभेत दिलेल्या आश्वासनांचे पालन करून त्यांच्या पक्षाचे लोक भविष्यात असे प्रमाद पुन्हा करायला धजावणार नाहीत, यासाठी पंतप्रधान कठोर पावले कधी उचलतात आणि देशाला मजबूत करण्यासाठी सर्व धर्मांत भयमुक्त वातावरण कधी निर्माण करतात याची भारतवासीयांना प्रतीक्षा आहे.हे लिखाण संपविण्यापूर्वी...भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नागपूरला एक आगळे वेगळे स्थान आहे. या शहरात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर निर्णायक विजय मिळवून भारताने मालिका २-० अशी जिंकल्याने नागपूरच्या क्रिकेट इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला. भारताच्या या विजयाने दक्षिण आफ्रिकेची नऊ वर्षांची विजयाची अखंड परंपरा खंडित झाली. पाहुण्यांनी याआधी पदेशातील १५ मालिका सतत जिंकल्या होत्या. ही परंपरा भारतीय संघाने खंडित केली. याचे श्रेय रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा व अमित मिश्रा या भारतीय फिरकी गोलंदाजांना द्यायला हवे.