हरीष गुप्ता(नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शब्दांची घुळघुळ न करता थेट बोलून टाकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कोविड आणि इतर आरोग्यविषयक समस्यांमुळे तीन महिने ते पडद्यामागे होते. पंतप्रधान मोकळेपणाने बोलत नाहीतच, त्यामुळे शहा यांची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवत होती. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डाही माध्यमांपासून दूरच असतात. त्यामुळे वादग्रस्त विषयांवर बोलण्याचे अधिकार असलेले सत्तारूढ पक्षात मग कोणीच उरत नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीचे प्रभारी करण्यात आल्यानंतर पक्षाचे वजनदार सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनीही गप्प राहायचे ठरवले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कोशाबाहेर येतात, पण नेमून दिलेल्या कामात गर्क राहून केवळ खात्याशी संबंधित विषयावर बोलतात. अधिकारवाणीने बोलेल असे मग उरले कोण?
अशावेळी अमित शहा प्रकट झाले आणि विविध विषयांवर बोलू लागले; पण त्यांच्या बोलण्यात नेहमीचा धारदारपणा नाही. त्यांनी थोडे मवाळपण स्वीकारलेले दिसले, तरीही सध्याच्या एकूण प्रकरणांवर परिवारातील कट्टर मंडळींनी ताशेरे ओढून जे काही बोलून ठेवले होते; त्यावर स्पष्ट भूमिका घेत शहा यांनी नाराजी व्यक्त केलीच. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र, अमलीपदार्थ रॅकेटची चौकशी केवळ बॉलिवूडशी जोडणे, सुशांतसिंह राजपूत प्रकरणी चालवली गेलेली मीडिया ट्रायल, जातीय सलोख्यावर ‘तनिष्क’ची जाहिरात, अशा विषयांवर बोलताना त्यांनी हातचे राखून ठेवले नाही. गेल्या तीन महिन्यांत हे जे काही चालले होते त्याच्याशी त्यांचा किंवा केंद्रातील सरकारचा काही संबंध नव्हता हे त्यांनी निक्षून सांगितले. या मामल्यात कोणी दुखावले असेल तर त्याबद्दल ते किंवा पक्षाला जबाबदार धरता येणार नाही असेच अमित शहा यांना सुचवायचे होते. याचा अर्थ ते शिवसेनेशी पुन्हा जुळवून घेऊ पाहत आहेत का?- ते सांगता येणे कठीण! बॉलिवूडला मात्र त्यांनी स्पष्ट सांगितले की एनसीबीने जे केले ते, तसेच राजकीय लागेबांधे काही असोत टीव्हीतील पापाराझी जे करत आहेत तेही आपल्याला पसंत नाही, हे त्यांनी स्वच्छ सांगून टाकले. देशाला माहीत असलेल्या अमित शहांपेक्षा हे अमित शहा जरा वेगळे वाटतात ना?
अशीही आत्मनिर्भरतासरकारने संरक्षण क्षेत्रातील १०० वस्तू आयात न करता भारतातच आत्मनिर्भर योजनेखाली निर्माण करण्याचा मनोदय वाजतगाजत जाहीर केला. संरक्षण मंत्रालयाने अशा वस्तूंची यादी संकेतस्थळावर टाकली आणि अनेकांची करमणूक झाली. कारण? त्यातल्या ४०हून अधिक वस्तू आजवर कधी आयातच करण्यात आल्या नव्हत्या.
पाणबुडी शोधणारे यंत्र आयात न करण्याचे ठरले खरे; पण डीआरडीओने यापूर्वीच तशी दोन यंत्रे विकसित केली आहेत. केवळ संरक्षण क्षेत्राला पुरवठा करण्यासाठी काही कंपन्या स्थापन झाल्या. यातल्या डझनभर कंपन्यांनी निविदा भरल्या. त्या रद्द करण्यात आल्या. मागणीच न उरल्याने हे कारखाने आता बंद पडले आहेत. दारूगोळा पुरवण्यासाठी २०१६ पासून वाटाघाटी चालल्या होत्या आणि आत्ता तब्बल चार वर्षांनी हे पाऊल टाकण्यात आले.
चिरागचे काय करायचे?पंतप्रधान मोदी २३ ऑक्टोबरला बिहारचा निवडणूक प्रचार दौरा सुरू करत आहेत. चिराग पासवानबद्दल ते काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. चिरागचा लोक जनशक्ती पक्ष मते खाणारा असल्याचे भाजपने म्हटले असले तरी निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी काही तसे म्हटलेले नाही. ‘निवडणुकीनंतर पाहू’ असे म्हणून गृहमंत्री अमित शहा यांनीही प्रश्न टाळला आहे. लोजपाला एनडीए बाहेर काढा, रामविलास पासवान यांच्या निधनाने रिक्त झालेली राज्यसभेची जागा त्या पक्षाला देऊ नका, असे संयुक्त जनता दल म्हणतोय. एकंदरीत भाजप बिहारमध्ये खराब खेळपट्टीवर दिसतोय.