दादासाहेब : (हातात पेपर धरून बेडरुममध्ये येतात, सौंच्या अंगावरची रजई ओढतात आणि म्हणतात) अहो, उठा पटकन... घर आवरायला घ्या... हॉलमधल्या सोफ्याची कापडं बदला, डायनिंग टेबलवरच्या मॅट नवीन टाका... त्या परवा आणलेल्या भगव्या रंगाच्या मॅट टाका... मस्त उपमा बनवा... थोडे ढोकळे पण करा... त्यावर कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी टाका... उठा, उठा, खूप कामं आहेत...बायको : (वैतागून दादासाहेबांच्या कपाळाला हात लावले, म्हणते) काय सकाळी सकाळी कटकट. कोण येणारंय? बरी आहे ना तब्येत... की ताप आलाय. तापात बडबडता तुम्ही म्हणून विचारलं...दादासाहेब : (हात झिडकारत) मी ठणठणीत आहे आणि बरा नसलो तरी आज मला बरं वाटलंच पाहिजे.बायको : सकाळी सकाळी तुमच्या माहेरचे येणार असतील तर मी नाही काही करणार... सांगून ठेवते. तुम्ही हॉटेलातून मागवा जे काय मागवायचं ते...दादासाहेब : अगं संपर्क अभियान सुरू आहे. आज साक्षात अमित शहा येणार आहेत आपल्या घरी. चल तयारीला लाग...बायको : ते कशाला येतील तुमच्याकडे. मागे देखील नरेंद्र मोदींनी जनतेच्या घरी जा, त्यांच्यासोबत जेवण करा असं सांगितलंय असं म्हणालात आणि आठ दिवस कुणी ना कुणी घरी येईल म्हणून उपाशी बसलात. आलं का कुणी भेटायला...?दादासाहेब : अगं ती गोष्ट वेगळी होती. आज अमितभाई माधुरी दीक्षित, लता मंगेशकर, रतन टाटा असे सगळ्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. संपर्क अभियान चालूय ना...बायको : अहो पण त्या सगळ्यांनी काही ना काही केलंय देशासाठी, तुम्ही कधी साधी साडी आणलीत का माझ्यासाठी? तुम्ही काय दिवे लावले म्हणून ते येतील तुम्हाला भेटायला... उगाच नसती भुणभूण नका करू.दादासाहेब : अगं आपण त्यांना मत दिलंय. आपण मतदार राजा आहोत. आपल्या मतांमुळं ते तिकडे बसलेत ना... तेव्हा ते आपल्याकडे पण येणारंच... तूच नको फाटे फोडूस... तयारीला लाग आता...बायको : अहो, तुम्हाला माधुरी आवडते ना... तशीच त्यांना पण... किंवा ‘बकेट लिस्ट’चं प्रमोशन करायला गेले असतील.दादासाहेब : अगं त्यांची बकेट लिस्ट फार मोठीयं. ती तुला नाही कळायची. पण तुला सांगतो माधुरीकडेच का गेले ते. कारण ती मराठी, लताबार्इं आजारी पडल्या ते सोडून दे पण त्यांचे नाव निवडले कारण त्या मराठी. मातोश्रीवर जाणार कारण तेही मराठी... एक लक्षात घे. ते सगळ्या मराठी माणसांकडे जातायत. आपणही मराठी... म्हणून ते आपल्याकडे नक्की येणार... जरा डोकं लावत जा बाईसाहेब...बायको : तुम्ही लावता तेवढं पुरे नाही का? पण तो देशपांड्यांचा अभय काय म्हणत होता माहितीय का, लहानांना ठेच लागली की आई आठवते आणि मोठ्यांना ‘मातोश्री’ कळलं काही तुम्हाला...दादासाहेब : बोलताना मातोश्रीवर एवढा जोर द्यायची गरज नाही काही. तेवढं फाफडा आणि ढोकळ्यांचं बघा जरा... त्याशिवाय काही सत् ना गत... त्यांना आणि आपल्याला.(atul.kulkarni@lokmat.com)
आपल्या घरी पण येणार...?
By अतुल कुलकर्णी | Published: June 13, 2018 12:20 AM