एकनाथ संभाजी शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना मी वाढदिवसानिमित्त आदरपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचे अभीष्टचिंतन करतो. गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान या मोदीजींच्या प्रवासाचे, वाटचालीचे आपण सर्वच साक्षीदार आहोत.
माझा आणि मोदीजींचा परिचय जुना. युतीच्या सुरुवातीच्या काळात ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असत. अधूनमधून भेट, बोलणे होत असे. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे स्नेहबंध होते. बाळासाहेबांविषयी ते आजही खूप भरभरून बोलतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब, माझे गुरु धर्मवीर आनंद दिघे आणि मोदीजींच्या व्यक्तिमत्त्वात अनेक साम्यस्थळे आहेत. अयोध्येतील राममंदिर पूर्णत्वास जाण्यामागे मोदीजींची मुत्सद्देगिरी आहे, हे बाळासाहेबांनीही मान्य केले असते. ‘मी जर पंतप्रधान झालो तर कलम ३७० रद्द करेन,’ असे बाळासाहेब म्हणत. आता तर हे कलम रद्दही झाले आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मोदीजींवर कौतुकाचा वर्षावच केला असता. आजचा समृद्ध गुजरात दिसतो, त्याच्या उभारणीत मोदीजींच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीचा निश्चितच मोठा वाटा आहे. गुजरातमध्ये शेती, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी दिशादर्शक ठरतील, अशा अनेक प्रकल्पांची उभारणी केली. हे प्रकल्प मोदीजी यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत उभे आहेत.
जीवनात त्यांच्या वाट्याला आलेल्या संघर्षातूनच मोदीजी कणखर आणि दुर्दम्य आशावादी बनले असावेत. माझ्याही बाबतीत आघात आणि संघर्षच वाट्याला आले; पण धर्मवीर दिघे यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि मीही डगमगलो नाही. बाळासाहेब, धर्मवीर आणि पंतप्रधान मोदीजी; या सगळ्यांकडून मी प्रेरणा घेत आलो आहे. नजर नेहमीच भव्य-दिव्य गोष्टींकडे लागून राहिलेली असली तरी पाय जमिनीवरच असावेत, हे मी त्यांच्याकडून शिकलो. अनेक मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी असो किंवा प्रकल्प पूर्णत्वानंतरचे लोकार्पण, पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पांवर काम करणाऱ्या मजूर, कामगार-कष्टकऱ्यांचा कायम सन्मान केला. त्यांना त्यांच्या कामाचे श्रेय दिले. हे असे याआधी कधी झाले नव्हते. हेच मोदीजींचे वैशिष्ट्य आहे.
पंतप्रधान मोदीजींच्या भेटीचे योग जुळून आले. या मोजक्या चर्चांमधून देश आणि तळागाळातील प्रत्येक घटकाविषयीची त्यांची तळमळ जाणवत राहिली आहे. आता तर थेट त्यांचे मार्गदर्शनच मिळते आहे. सोबतीला तितक्याच धडाडीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ आहे. मोदीजींना अपेक्षित असलेल्या देश, राज्य आणि एकूणच सर्वच क्षेत्रातील विकासकामांची प्रकल्पांची चर्चा आमच्यात नेहमीच होते. सगळ्यात मला भावते ती मोदीजी यांची कार्यशैली.
मला नेहमीच पत्रकार आणि जवळची मंडळी विचारतात, ‘तुम्ही रात्र-रात्र आणि पहाटेपर्यंत काम करता, त्यामागचे रहस्य काय?’ - तर सदैव ऊर्जेने भारलेल्या मोदीजींच्या कार्यशैलीची प्रेरणा हे एक रहस्य निश्चितच आहे, हे प्रांजळपणे सांगतो. मोदीजींकडे घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची दृढनिश्चयी वृत्ती आहे. लंब्याचौड्या बैठकांपेक्षा त्यांची भिस्त फलनिष्पत्ती होऊ शकणाऱ्या गोष्टींवर असते. त्यामुळे लगोलग निर्णय घेतले जातात. प्रभावी अंमलबजावणी सुरू होते. याचे प्रतिबिंब आपण डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, गंगा नदीची स्वच्छता यांसारख्या कित्येक धडाडीच्या प्रकल्पांमध्ये दिसते. आत्मनिर्भर भारत असो की आपल्या संरक्षण दलाची सज्जता, या सगळ्या आघाड्यांवर मोदीजींनी आपल्या नेतृत्वगुणांचा जगाला परिचय करून दिला आहे. जगभरातील अनेक बलाढ्य देशांना आणि त्यांच्या नेतृत्वाला, तेथील नागरिकांना मोदीजींविषयी अप्रूप आहे, कुतूहल आहे, ते म्हणूनच.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाला मोदीजींचे नेतृत्व लाभणे हा आपल्या सर्वांसाठी आणि खंडप्राय देशासाठीही अमृतयोग आहे. उत्तरोत्तर मोदीजींचे नेतृत्व बहरत जाईल. त्यांचा प्रखर देशाभिमान आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वातील पैलूंनी देश, जगाचे क्षितिजही उजळून निघेल, असा विश्वास आहे. मोदीजींचे पुन्हा एकवार अभीष्टचिंतन करतो, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना!