बाबूजी... तीन अक्षरी मंत्र. दर्डा कुटुंबीय आणि लोकमत परिवाराचे अवघे आयुष्य व्यापून टाकणारे एक जीवनतत्त्व... जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांची आज १०१ वी जयंती आहे. ही जयंती त्यांच्या विचारांची आहे. त्यांच्याप्रति ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. भारत सरकारने बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने १०० रुपयांचे स्मृती नाणे जारी केले आहे. त्या नाण्याचे लोकार्पण आज मुंबईत आयोजित त्यांच्या जयंती समारंभात होणार आहे. यापेक्षा सुंदर योग कोणता असू शकतो? बाबूजींच्या पुढील पिढ्यांनी तन आणि मनाने त्यांच्या विचारांचा स्वीकार केला आहे, म्हणून या सोहळ्याला विशेष अर्थ आहे.
विसावे शतक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आणि स्वातंत्र्योत्तर देश उभारणीचे शतक होते. त्या काळात देशभरातील अनेक महापुरुषांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला. त्यामध्ये महाराष्ट्रात जन्मलेल्या नवरत्नांचा वाटा खूप मोठा होता. अनेक भाग्यवंतांना स्वातंत्र्यपूर्व काळासोबतच स्वातंत्र्योत्तर काळातही देशसेवा करण्याचे भाग्य लाभले. त्यापैकी एक म्हणजे ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी!
आचार, विचारांच्या सत्शीलतेतून घडणाऱ्या कर्मातूनच कुणाही व्यक्तीची थोरवी सिद्ध होते. त्यासाठी वाणी व वर्तनात शुद्धता आणि साधर्म्य असावे लागते. या साऱ्या बाबी जुळून आल्या, की मग ती व्यक्ती केवळ व्यक्ती राहत नाही, तर व्यापक अर्थाने समाजासाठी प्रेरणा व ऊर्जेचा स्रोत ठरते. शक्ती ठरते. मोगऱ्याच्या गंधाने अवघा आसमंत दरवळून निघावा, तसे आपल्या अलौकिकत्वाने इतरांच्या प्रकाशवाटा उजळून काढणारे बाबूजी समस्तांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी केलेली जीवनमूल्यांची रुजवणूक अनेकांच्या आयुष्यात मौलिक ठरली आहे. त्यांच्या कर्तृत्वसंपन्न जीवनसाधनेसाठी चतुरस्त्र, अष्टपैलू, बहुआयामी, सर्वस्पर्शी, व्यासंगी आदी विशेषणेही थिटी पडतात.
खंदा स्वातंत्र्यसेनानी, विरोधकांनाही आपलेसे करणारा संयमी सुसंस्कृत राजकारणी, कृषितज्ज्ञ, विकासपुरुष, सव्यसाची संपादक, यशस्वी उद्योजक, तत्त्वज्ञ असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव नामक छोट्याशा गावात एक शतकापूर्वी जन्म घेऊन, अगदी तरुण वयात स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदविणे, त्यासाठी कारावास भोगणे, स्वातंत्र्योत्तर कालखंडात समाजकारण व राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण करणे, प्रदीर्घ काळ राज्यात मंत्रिपद भूषवून राज्याच्या विकासाला दिशा देणे, ‘लोकमत’ समूहाची आधारशिला रचणे आणि आपल्या हयातीतच त्या समूहाचा वटवृक्ष होताना पाहणे, एवढी प्रचंड कामगिरी ही थक्क करणारी आहे.
महात्मा गांधींच्या प्रेरणेने अवघ्या १७ व्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले होते. पहिल्याच सत्याग्रहात अटक होऊन, त्यांना जबलपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जावे लागले. तारुण्याच्या उंबरठ्यावर सुखी जीवनाची चित्रे रंगविण्याऐवजी, स्वातंत्र्य चळवळीत झोकून देण्याची त्यांची ‘आगळीक’च त्यांच्या पुढील आयुष्यातील अनेकविध वादळे व आव्हानांना जन्म देणारी ठरली. क्रांतिकारी नेते सुभाषचंद्र बोस व भगतसिंग यांच्या आक्रमक विचारांचाही बाबूजींवर प्रभाव होता. यवतमाळमध्ये त्यांनी आझाद हिंद सेनेच्या शाखेची स्थापनाही केली होती.
बाबूजींनी राजकारणात ठसा उमटवला; पण खरे तर त्यांचे मन रमायचे ते पत्रकारितेतच! आज बाबूजींचे नाव निघाल्यावर डोळ्यासमोर उभा राहतो तो ‘लोकमत’ समूह. बाबूजींनी पत्रकारितेच्या क्षेत्रात ‘लोकमत’पूर्वीही काही प्रयोग केले होते. स्वातंत्र्यलढ्यातील घटना-घडामोडी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात, अशी त्यांची शाळेत असतानाच तीव्र इच्छा होती. त्या इच्छेपोटी शालेय जीवनातच ‘सिंहगर्जना’ या हस्तलिखिताचा आणि सोबतच त्यांच्यातील पत्रकाराचाही जन्म झाला. त्यावेळी टिळक युगाचा अंत आणि गांधी युगाचा उदय होत होता. स्वाभाविकपणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर या दोन्ही युगपुरुषांचा प्रभाव पडला. वृत्तपत्राचा संपादक म्हणून एखाद्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेणे, ती निर्धारपूर्वक कृतीत आणणे, समानता, पुरोगामित्त्व व सर्वधर्मसमभावाची कास न सोडणे आदी गुणवैशिष्ट्यांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरील लोकमान्य टिळक व महात्मा गांधीजींच्या प्रभावाची चुणूक अधोरेखित होते.
जुलै १९४९ मध्ये अवघ्या २६ व्या वर्षी त्यांनी यवतमाळमध्ये ‘नवे जग’ या नावाने साप्ताहिक काढले. ते टिळक व गांधीजींच्या विचारांनी जसे प्रभावित होते, तसेच पंडित जवाहरलाल नेहरूंच्या स्वतंत्र भारताविषयीच्या स्वप्नांनीही भारावलेले होते. बाबूजींनी यवतमाळमध्ये १९५३ मध्ये ‘साप्ताहिक लोकमत’ नव्याने सुरू केले. (ते लोकनायक बापूजी अणे यांनी १९१८ मध्ये लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने आणि त्यांनीच सुचविलेल्या ‘लोकमत’ या नावाने सुरू केले होते; पण १९३३ मध्ये ते बंद पडले.) हे साप्ताहिक पुन्हा सुरू करावे, असा विचार बाबूजींनी केला. लोकनायकांनीही त्यांना अगदी आनंदाने परवानगी दिली.
‘साप्ताहिक लोकमत’चा पहिला अंक ‘भूदान यज्ञ विशेषांक’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्यासाठी निवडलेला विषय आणि अंकातील विविध स्तंभ यातून एका वटवृक्षाची बिजे रोवली गेली. त्यानंतर अवघ्या सातच वर्षांत ‘लोकमत’ अर्ध साप्ताहिक आणि आणखी ११ वर्षांनी नागपुरातून दैनिक म्हणून प्रसिद्ध होऊ लागले. बाबूजी केवळ प्रज्ञावंत संपादकच नव्हे, तर वृत्तपत्र व्यवसायाची संपूर्ण जाण आणि दूरदृष्टी असलेले उद्योजकही होते, हे ‘लोकमत’च्या साप्ताहिक ते दैनिक या अल्पावधीतील प्रवासावरून सिद्ध झाले. ‘लोकमत’चे मालक आपण नसून वाचक आहेत, ही त्यांची विचारधारा होती.
जे नवीन आहे, सर्वोत्तम आहे, ते ‘लोकमत’मध्ये असले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. नवे यंत्र व तंत्र आत्मसात केले पाहिजेच; पण त्यासोबत माणुसकीचा धागा विणला पाहिजे, हा त्यांचा आग्रह असे. यंत्र आणि तंत्र यामागचा माणूस तितकाच महत्त्वाचा आहे, हा मोलाचा मंत्रही त्यांनी परिवाराला दिला. बघता बघता विदर्भ अन् पुढे संपूर्ण महाराष्ट्र तर ‘लोकमत’ समूहाने पादाक्रांत केलाच; शिवाय दिल्ली आणि गोव्यातही धडक देत आपले अग्रस्थान निर्माण केले आहे.
‘पत्रकारिता परमो धर्म’ हे ब्रीद अंगीकारून, बाबूजींनी राजकारण व पत्रकारितेत कधीही गल्लत होऊ दिली नाही. संपादकांचे स्वातंत्र्य अबाधित राखले. दीनदुबळ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे सूत्र त्यांनी सांगितले. लोकाभिमुख व विकासाभिमुख पत्रकारितेची वाट त्यांनी रचली. त्याच मार्गावरून ‘लोकमत’चे चेअरमन डॉ. विजय दर्डा व एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांनी वाटचाल केली. आता तिसऱ्या पिढीतील देवेंद्र, ऋषी व करण दर्डा यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने वृत्तवाहिनी, डिजिटल, ऑनलाइन अशा विविध माध्यमांतून ‘लोकमत’ समूहाला वेगळ्या उंचीवर नेले आहे.
मंत्रिमंडळात अनेक खाती सांभाळून मुत्सद्दी व सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. महाराष्ट्राच्या आजच्या वैभवी औद्योगिक विकासाची पायाभरणी बाबूजींनी केली. तत्त्व आणि मूल्यांशी तडजोड न करता, त्यांनी सत्ता आणि पत्रकारितेचा उपयोग लोककल्याणासाठी केला. महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात रचनात्मक कार्याचा अमीट ठसा त्यांनी उमटवला. ‘लोकमत’मधील बातम्यांमुळे त्यांना प्रसंगी विधिमंडळात अडचणींनाही सामोरे जावे लागले; परंतु ते म्हणत की, ‘लोकमत’चे पत्रकार त्यांचे काम करीत आहेत आणि मी माझे!’ काँग्रेसनिष्ठा जपताना अन्य राजकीय पक्षांतील मंडळींचा त्यांनी कधीही दुस्वास केला नाही. एकदा निवडणूक प्रचारानिमित्त स्व. अटलबिहारी वाजपेयी यवतमाळला आले असताना, त्यांच्यासाठी स्वतःचे वाहन उपलब्ध करून देण्याचा दिलदारपणा बाबूजींनी दाखविला होता. अशी अनेक उदाहरणे आहेत.
पत्रकारिता व राजकारणातील जबाबदारीची जाणीव जपणाऱ्या बाबूजींचा संवेदनशील सहृदयतेवर मोठा भर होता. आप्तस्वकीयांचा गोतावळा आणि पत्रकारिता, राजकारण आणि समाजकारणाच्या अविरत धावपळीत जपलेली रसिकता ही बाबूजींची श्रीमंती होती. त्यामुळे त्यांच्या सान्निध्यात आलेला प्रत्येक जण एखाद्या मोहक फुलाच्या सुगंधाप्रमाणे भारावून जात असे. कला- साहित्य- संगीत क्षेत्रातील अनेकानेक मान्यवरांशी त्यांचे छान सूर जुळले, ते त्याचमुळे!
यवतमाळच्या दर्डा उद्यानात पशुपक्ष्यांची किलबिल सुरू असताना ते म्हणायचे, ‘बघा, भीमसेन जोशी, लतादीदी, किशोरी आमोणकर गात आहेत, मला त्यांचे सूर ऐकू येत आहेत.’ त्यांची रसिकता व निसर्गाप्रतिची आत्मीयता त्यातून लक्षात येते. कुटुंबवत्सल असलेले बाबूजी, दर्डा कुटुंबाचे तर पालक होतेच; पण लोकमत परिवारातील सगळ्यांवर त्यांनी मायेची पखरण केली. शांत, संयमी, प्रसन्न. लोभस, रसिक आणि सौजन्यशील व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते. त्यांना रागावलेले, चिडलेले, सहसा कोणी पाहिले नाही. ते रागवायचे नाही तर समजावून सांगायचे. समचित्त आणि स्थितप्रज्ञ हा त्यांच्या व्यक्तित्त्वाचा विशेष स्थायीभाव होता.
मनुष्य कायम सुखाच्या शोधात धावत असतो; पण बाबूजींची सुखाची व्याख्या वेगळी होती. ते म्हणत, ‘आपण शून्यातून जे निर्माण करू ते खरे सुख! एखाद्या अडल्या नडल्या माणसाचे काम करा व त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद बघा. त्यात तुम्हाला खरे सुख म्हणजे काय असते, हे लक्षात येईल!’ आनंद व दु:ख या दोन्ही भावनांप्रतिची निर्विकारता आत्मसात करणे खूप अवघड असते. किंबहुना ती एक साधनाच असते. त्यातूनच जीवनमूल्ये पाझरतात. तीच देण बाबूजींनी दिली. त्यातून असंख्य लोकांचे जगणे मोहरून गेले. दूरदर्शी व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या बाबूजींची कर्तृत्वसंपन्न जीवनसाधना अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. बाबूजींचे स्मरण म्हणजे एक स्फुरण आहे. त्यांची जयंती साजरी करताना उत्साह आहे, तसेच गांभीर्यही आहे. त्यांच्या विचारांचा जागर करून आठवणींना उजाळा आणि वर्तमानाला दिशा देत, भविष्याचा वेध घेणे आहे. बाबूजींच्या तत्त्वांचा विजय होत राहावा आणि त्यांच्या विचारांची ज्योत तेवत राहावी, हीच त्यांना खरी आदरांजली. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. vijay.baviskar@lokmat.com