दादांची ‘झाकली’ मूठ! अजितदादांचा वादा किती मर्यादित होता,  हे आता स्पष्ट होतंय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 05:08 AM2024-09-10T05:08:55+5:302024-09-10T05:10:13+5:30

उत्साही कार्यकर्ते ‘अजितदादा, एकच वादा!’ अशी नेहमी घोषणा देतात. एकदा वादा दिला (आश्वासन) तर दादा काम करणारच, असा त्यांना विश्वास आहे. इतका विश्वास असणाऱ्या अजितदादांना आता पुन्हा पराभवाला सामोरे जायला नको, असे का  वाटत असावे?

An editorial on the political situation of Deputy Chief Minister Ajit Pawar | दादांची ‘झाकली’ मूठ! अजितदादांचा वादा किती मर्यादित होता,  हे आता स्पष्ट होतंय

दादांची ‘झाकली’ मूठ! अजितदादांचा वादा किती मर्यादित होता,  हे आता स्पष्ट होतंय

राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार ऊर्फ दादा अनेकवेळा जोरदार बोलतात. पण, नेहमीच खरं बोलून मन मोकळं करतात. बारामतीत बोलताना पार मूठदेखील मोकळी करून सांगत राहतात. राजकारणात जेवढा वेळ देतो, कष्ट घेतो, धावपळ करतो, ती धावपळ स्वत:चा व्यवसाय टाकून केली असती तर गर्भश्रीमंत होऊन ऐशारामात जगलो असतो, असे एकदा म्हणाले होते. अनेकांना त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा फटकळ वाटतो. अधिकच स्पष्ट बोलून समोरच्याचे मन दुखावतात, अशी तक्रार त्यांचे समर्थकच करीत असतात. मात्र, कामाचा माणूस आहे, काम होणार नसेल तर नाही म्हणून सांगत भिजत घोंगडं ठेवणार नाही, असेदेखील समर्थक म्हणतात.

बारामतीत रविवारी बोलताना त्यांचा सूर वेगळाच होता. गेली पस्तीस वर्षे ते बारामतीचे विधानसभेत प्रतिनिधित्व करतात. त्यापैकी अनेक वर्षे ते मंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. परिणामी बारामतीची कोणतीही कामे अडत नाहीत. त्यांचा कामाचा आवाका आणि झपाटाही गतिमान आहे. असे असले तरी झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून मते देणार नसाल तर निवडणूक न लढविलेलीच बरी असे  ते बोलून गेले. पस्तीस वर्षे कामे होत राहिली, कोणतीही तक्रार नसेल तर माझ्या अपेक्षेप्रमाणे मतदान का होत नाही, ही त्यांची खंत सारखी मनाला टोचते, असे दिसते.

मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध स्वत:च्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच निवडणूक रिंगणात उतरविले. बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा एक लाखापेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला. अजित पवार स्वत: विधानसभेत लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येतात, अशा सहा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळाले नाही, याची त्यांना खंत आहे. आपली बहीण सुप्रिया सुळे हिच्याविरोधात निवडणूक लढायला नको होती, असेही त्यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखविले होते. गडचिरोलीमध्ये पक्षाच्या मेळाव्याला गेले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना सल्ला देताना घरात फूट पडू देऊ नका, त्याची किंमत मी मोजली आहे. घरात फूट पडणे लोकांना आवडत नाही, असेही बोलून गेले. आत्राम यांची कन्याच त्यांच्याविरोधात बंडाच्या तयारीत आहे. शिवाय ती शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

अजित पवार यांना ‘दादा’ म्हणून त्यांचे समर्थक बोलावतात. उत्साही कार्यकर्ते ‘अजितदादा, एकच वादा!’ अशी नेहमी घोषणा देतात. एकदा वादा दिला (आश्वासन) तर दादा काम करणारच, असा त्यांना विश्वास आहे. इतका विश्वास असणाऱ्या अजितदादांना आता पुन्हा पराभवाला सामोरे जायला नको, असे का  वाटत असावे? १९९१ ते २०२४ इतका दीर्घकाळ आपण आमदार म्हणून काम केले. एकदा नव्या आमदाराचा अनुभव घेऊन पाहा. इतकेही स्पष्ट ते बोलून गेले. अजितदादा यांना एका गोष्टीचा विसर पडतो आहे की, त्यांचे आडनाव ‘पवार’ आहे. पवार नावाचे आडनाव असणाऱ्या माणसानेच १९६७ ते १९९१ पर्यंत बारामतीचे पंचवीस वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. भावी आमदारांचा अनुभव घेण्याचा सल्ला ज्यांना देता त्यात पूर्वाश्रमीच्या आमदारांचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. थोरल्या पवारांशीदेखील बारामतीकर तुलना करीत असतीलच ना? शिवाय सलग पस्तीस वर्षांपेक्षा अधिक काळ विधानमंडळात काढलेले अनेक नेते महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यांच्याच वयाचे आर. आर. पाटील होते. जयंत पाटील सलग सात वेळा निवडून आले आहेत. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आहेत. अजित पवार हा अपवाद निश्चित नाही. ज्यांना कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांनीदेखील प्रभावीपणे काम केले आहे.

अजित पवार यांच्या आधी त्यांनी पक्षाची जबाबदारी घेऊन महाराष्ट्र पिंजून काढला आहे. उपमुख्यमंत्रिपद भूषविले आहे. जयंत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांनीही नऊवेळा अर्थसंकल्प मांडले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक हाल होणार हे आताच दिसू लागले आहे, किंबहुना ते स्वत:च बोलून दाखवत आहेत. त्यांना याची कदाचित जाणीव नसावी की, त्यांच्याबरोबर गेलेले आमदार त्यांच्या मतदारसंघात नारळ वाढवायला कधीही अजित पवार यांना (पुणे जिल्हा वगळून) बोलावत नव्हते. त्यांचा थेट संपर्क थोरल्या पवारांशी होता. त्यामुळे दादांचा वादा किती मर्यादित होता,  हे आता स्पष्ट होत चालले आहे.

Web Title: An editorial on the political situation of Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.