- अतुल कुलकर्णी(संपादक, मुंबई)
प्रिय नेते हो, नमस्कार.यंदा होणारी लोकसभेची निवडणूक खास आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. पाच वर्षांनंतर काय होईल, हे कोणास ठाऊक? आता संधी आली आहे. त्यामुळे इतर कोणाला पाठिंबा देण्याच्या भानगडीत पडू नका. स्वतःच उभे राहा, जिंकून येण्याची शिकस्त करा. नाही जिंकता आले तर, आपल्या उभे राहण्याने, ज्या कोणाचा फायदा होईल त्यांच्याकडून स्वतःचा फायदा करून घ्या..! इस हात ले, उस हात दे... यावर विश्वास ठेवा. 'श्रद्धा आणि सबुरी'चे दिवस गेले, आता फास्ट फूडचा जमाना आहे. तत्काळ रिझल्ट मिळाला की मतदारसंघात आपली कॉलर टाइट होते हे विसरू नका.
निवडणूक लोकसभेची असली तरी त्याचा परिणाम सहा विधानसभा मतदारसंघांवर होणार आहे, हे लक्षात असू द्या..! एकदा का लोकसभेला आपल्या नावडतीचा उमेदवार निवडून आला तर, तो आपल्या विधानसभा मतदारसंघात आपलाच कार्यक्रम करेल. आपल्याला निवडून येऊ देईल का? अशी तुम्हाला वाटणारी भीती रास्त आहे. त्यामुळे निवडून येणारा नेता स्वतःचे चेले-चपाटे मतदारसंघात मजबूत करण्याआधीच तुम्ही मजबूत व्हा... है काहीच शक्य नसेल तर, सरळ सरळ मागच्या पाच वर्षांतला सगळा हिशेब चुकता करून बॅलन्स शीट टॅली करण्याची हीच ती वेळ... हाच तो क्षण... हे विसरू नका.
वरिष्ठ नेते तुम्हाला बोलावतील. प्रेमाने सांगतील. वेळप्रसंगी दमात घेतील. भूलथापाही देतील... कशालाही बळी पडू नका. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पाच वर्षे त्रास दिला त्यांचा योग्य तो हिशेब करण्याची हीच वेळ आहे. आमचे विजय शिवतारे बघा, कसे आक्रमकपणे बोलले. त्यानंतर त्यांना त्यांच्या नेत्यांनी बोलावून घेतले. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आजूबाजूला... असे फोटोही छापून आले. मात्र, शिवतारे यांनी व्यापक विकासाचे हित लक्षात घेऊन त्यांचा आक्रमक बाणा काहीसा गुंडाळून ठेवला. शेवटी कोणाचा का असेना विकास महत्त्वाचा हे विसरू नका. मलादेखील असेच बोलावून घ्यावे आणि तुमच्यासोबत फोटो काढावेत असे वाटत असेल, तुमचा स्वतःचा विकास... माफ करा तुमच्या मतदारसंघाचा विकास हवा असेल तर, आपापल्या भूमिका आक्रमकपणे मांडा. माझ्याशिवाय तुम्ही निवडूनच कसे येता, हे मी बघतो... असे सांगून तर बघा..! लगेच तुमची दखल घेतली जाईल. तुम्हाला बंगल्यावर बोलावले जाईल. तुम्ही आजवर केलेल्या मदतीची आठवण करून दिली जाईल. तुमच्यासोबत फोटो काढले जातील. तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील. तुम्ही किती ताठ कण्याने उभे राहता त्यावरच पुढचे गणित अवलंबून आहे.
तुम्ही थोडा ताठपणा दाखवला तर, कदाचित तुम्हाला तुमच्या आजवरच्या प्रगतीची फाइल दाखवली जाईल. ती फाइल पाहून हरखून जाऊ नका. जे आपण केले तेच त्या फाइलमध्ये आहे, असे आपापल्या फाइल बघून आलेले काही नेते खासगीत सांगत होते. एक नेते तर म्हणाले, मला कधी मागे वळून बघायची सवय नाही. त्यामुळे मी एवढी प्रगती केली हे मला फाइल बघूनच कळाले..! मी केलेल्या आजवरच्या कामांचा लेखाजोखा त्या फाइलमध्ये होता. कुठेतरी आपल्या कामाची सविस्तर नोंद आहे, याचे समाधान वाटल्याचे फाइल बघून आलेले नेते कौतुकाने सांगत होते. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे वेगळेच होते... असो. तुम्ही फार विचार करू नका. जेव्हा तुम्हाला तुमची फाइल दाखवली जाईल, तेव्हा काय करायचे ते ठरवा. सध्या आपल्या विरोधात जो कोणी उमेदवार असेल, राहील त्याला कसे उंच सोडून द्यायचे याचा विचार करा... तो उंच निघून गेला की आपल्याला मतदारसंघात मोकळे रान मिळेल, हे कायम लक्षात ठेवा.
सध्याचे दिवस गटातटाचे आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट झाले. शिवसेनेने दोन वेगळे संसार मांडले. काँग्रेस आणि भाजप यांचे संसार शाबूत असले तरी दोन्ही घरांत भावकी वाढली आहे. एकाच घरात प्रत्येकाने स्वतःची वेगळी खोली करून ठेवली आहे. त्यामुळे कोणत्या खोलीत नेमके काय चालू आहे, हे कळायला मार्ग नाही. सोशल मीडियावर एक बातमी फार जोरात फिरत होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थंड पाण्याचे माठ विक्रीला आले आहेत. एक वेळ तुमचे आमदार फुटतील; पण, आमचे माठ फुटणार नाहीत... अशी जाहिरात तो करत होता. त्याच्या कल्पकतेला दाद द्यावी लागेल.
अशा लोकांना खरे तर आता त्यांच्या गावाच्या नावाने रत्न पुरस्कार द्यायला हवेत. पांगरी रत्न, बुद्रूक रत्न असे पुरस्कार कितीही देता येतील. नाहीतरी हल्ली रत्न शोधून जाहीर करण्याचे काम जोरात सुरू आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि जोरात कामाला लागा. तुम्हाला शुभेच्छा!
तुमचाच, बाबूराव