काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी अखेर भाजपाचा, आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. ते अपेक्षितच होते. गेले काही महिने आशिष यांनी भाजपामध्ये बंडाचे निशाण फडकावले होते. पक्षनेतृत्वावर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले होते. त्यामुळे ते पक्षात फार दिवस टिकणार नाहीत हे स्पष्टच होते.
काटोलमध्ये आशिष यांच्या रुपाने पहिल्यांदाच कमळ फुलले, ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे आशिष हे चिरंजीव. नरखेड तालुक्यातील वडविहिरा हे देशमुखांचे गाव. या गावात रणजित देशमुख आणि त्यांचे चुलत बंधू माजी मंत्री अनिल देशमुख यांची घरे आजूबाजूला आहेत. काटोलमध्ये तसेच आहे आणि नागपुरातदेखील त्यांचे बंगले आजूबाजूलाच आणि मुंबईतही.
एकेकाळी रणजित आणि अनिल देशमुख यांचे सख्य होते. अनिल देशमुखांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यात रणजितबाबूंचा अर्थातच वाटा होता. नंतर अनिलबाबू आधी अपक्ष आणि नंतर राष्ट्रवादीचे आमदार झाले. रणजितबाबूंनी राजकारणासाठी बाजूच्या सावनेर मतदारसंघाची निवड केली. २००९ मध्ये आशिष हे भाजपाकडून सावनेरमध्ये लढले आणि हरले. पक्षाने २०१४ मध्ये त्यांना काका अनिल देशमुखांविरुद्ध भाजपाने लढविले आणि दोन घरांमध्ये वितुष्ट आले. चार टर्मच्या अनिलबाबूंचा पर्याय शोधणाऱ्या काटोलकरांनी मग तरुण आशिष यांना पसंती दिली अन् काटोलसारख्या पारंपारिक काँग्रेस विचारांच्या मतदारसंघात कमळ फुलले.
आशिष यांची सासुरवाडी नरखेडची. काटोल मतदारसंघातील नरखेड हे तालुक्याचे गाव. रणजितबाबूंचे कट्टर समर्थक माजी आमदार रमेश गुप्ता हे आशिष यांचे सासरे. बंडखोरीचे गुण आशिष यांनी घेतले ते वडील रणजितबाबूंकडून. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर पक्षनेतृत्वाला आव्हान देणाऱ्या रणजितबाबूंना त्याची राजकीय किंमतही मोजावी लागली पण त्यांनी चिंता केली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणुकीत नागपुरात उभे असताना विदर्भ राज्याच्या मुद्यावर काँग्रेसने आधी भूमिका स्पष्ट करावी, असे सांगत रणजितबाबूंनी दोन दिवस प्रचारच बंद केला होता. काँग्रेसने त्यांना मोघम उत्तर दिले पण प्रचाराचा सूर हरपला आणि रणजितबाबू हरले अन् फडणवीस जिंकले होते. आशिष यांच्या ठायी वडिलांसारखीच देशमुखी ठासून भरलेली आहे. वागता-बोलताना त्यांच्यात ती जाणवते. आमदारकीला लाथ मारण्याची हिंमत सहसा कोणी करीत नाही पण त्यांनी ती दाखविली आहे. आता आशिष कुठून लढतील, त्यांचे राजकीय भवितव्य काय असे अनेक प्रश्न आहेतच.
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर काटोलमध्ये काका अनिलबाबूंचा दावा असेल पण सिटींग-गेटिंग म्हणून आशिष अडून बसतील. कोणी म्हणते की आशिष नागपुरातून विधानसभा लढू शकतात. काँग्रेस त्यांना गडकरींविरुद्ध लोकसभेलाही उतरवू शकते. आशिष यांच्यासाठी असे अनेक पर्याय दिसतात खरे पण काँग्रेसमध्ये सहजासहजी काही मिळत नसते. भाजपा सोडून ते काँग्रेसमध्ये जात आहेत. त्यांच्याकडे जात आहे, पर्सनॅलिटी आहे, जिगरही आहे. त्या भरवशावर ते कुठपर्यंत जातील हे दिसेलच. त्यांचा अभिमन्यू होऊ नये एवढेच.