हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, नवी दिल्लीकाँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारच्या बैठकीपूर्वी नेतृत्व बदलाची मागणी करणारे पत्र पाठविणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांच्या गटाला दिल्लीच्या राजकीय वर्तुळात ‘जी-२३ क्लब’ असे टोपणनाव पडले आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व उपनेते आनंद शर्मा यांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघेही नाराज असल्याने त्यांनी अशा उचापती करणे स्वाभाविक होते; परंतु सोनिया गांधींनी मल्लिकार्जुन खरगे यांना अचानक राज्यसभेत आणल्याने दोघांचीही आसने डळमळीत झाली.
आझाद यांनी विरोधी पक्षनेतेपदाची मुदत येत्या फेब्रुवारीत संपल्यावर त्यांची जागा खरगे घेतील, हेही लगेच स्पष्ट झाले. आझाद यांना काश्मीरमध्ये परत जाऊन काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्यास सांगितले आहे. २०१६ मध्ये चौथ्यांदा राज्यसभा मिळाली, तेव्हा २०२१ मध्ये आझाद यांच्या जागी आपण विरोधी पक्षनेते होऊ, असे बाशिंग बांधून शर्मा बसले होते. खरगे यांच्या येण्याने त्यांचाही स्वप्नभंग झाला. सूत्रे असे सांगतात की, नाराजी आणि बंडखोरीच्या हालचाली शर्मा यांच्या लोधी इस्टेटमधील बंगल्यातूनच झाल्या. शशी थरूर यांना पक्षात कोणी फारसे गांभीर्याने घेत नाही व त्यांचे तेवढे वजनही नाही. त्यामुळे शर्मा यांनीच पुढाकार घेऊन अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत प्रदीर्घ बैठका घेतल्या. आझाद, कपिल सिब्बल, मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकजण शर्मा यांच्या घरी रात्रीच्या भोजनाच्या निमित्ताने अनेक आठवडे एकत्र भेटत होते. मनिष तिवारी, कपिल सिब्बल व शर्मा यांनी ‘त्या’ पत्राचा मसुदा तयार केला. पंधरा वेळा त्यात दुरुस्त्या केल्या गेल्यावर ६ ऑगस्टला ‘ते’ पत्र सोनिया गांधींना पाठविले.
हुुडांचा शरद पवार होण्याच्या मार्गावरनाराज बंडखोरांच्या ‘जी-२३ क्लब’मध्ये हरयानाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा यांच्या सहभागाने पक्षातील अनेकजण चक्रावून गेले. हुडा उत्तर भारतातील नवे शरद पवार होऊ पाहात आहेत की काय, अशी शंकाही अनेकांना आली. पवारांना जे जमले नाही ते हुडा कदाचित करून दाखवू शकतील. कारण बंडाचा झेंडा उभारणाऱ्या ‘जी-२३ क्लब’मध्ये ज्याच्यात काही दम आहे, असे हुडाच आहेत.
गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोईली, राजेंद्र भट्टर, पृथ्वीराज चव्हाण किंवा आनंद शर्मा यांच्यापैकी एकाही माजी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या प्रभावक्षेत्राच्या बाहेर जाहीर सभा घेऊन ती गाजविण्याची कुवत नाही. थरूर, सिब्बल व मनिष तिवारी हे टीव्हीवरील चर्चांपुरतेच प्रभावी आहेत; पण त्यांना मोठा जनाधार नाही. बाकीचे नेते खुजे आहेत व ते फारसे प्रसिद्धही नाहीत; पण तरी हुडा यांनी या कंपूत का बरं सामील व्हावे? सलग दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलेले हुडा मृदुभाषी, चलाख आणि कल्पक नेते म्हणून ओळखले जातात. अनेक कारणांवरून राजीव गांधींशी त्यांचे बिनसले, तरी रणदीप सुरजेवाला, कुमारी शैलजा व इतरांचा तीव्र विरोध असूनही हुडा यांनी आपले चिरंजीव दीपेंद्रसिंग यांना यंदाच्या निवडणुकीत राज्यसभेचे तिकीट मिळविले. काँग्रेसला वाचवायचे असेल, तर तुम्हीच पुढे येऊन राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावायला हवी, असे या ‘क्लब’मधील अन्य नेत्यांनी हुडा यांना पटवून दिले. वेळ आल्यास २०२४ ची लोकसभा निवडणूक तुमच्या नेतृत्वाखाली लढू, असे सर्वांनी त्यांना आश्वासन दिले. अशा काँग्रेसजनांच्या नव्या पिढीलाही हुडा हुरूप आणू शकतील, असे या नेत्यांना वाटते. ज्याच्याकडे साधने आहेत, ऊर्जा आहे व ज्यांच्यामागे जनाधार आहे, असा कोणीतरी ‘जी-२३’ला हवाच होता. हुडा त्या गळाला लागले व त्यांनी पत्रावर स्वाक्षरी केली.
सिंडिकेट ते ‘जी-२३’या ‘जी-२३ क्लब’मुळे १९७०च्या दशकातील इंदिरा गांधींच्या काळाची आठवण होते. १९६६ मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचे आकस्मिक निधन झाले तेव्हा के. कामराज यांच्या नेतृत्वाखालील प्रबळ ‘सिंडिकेट’ने इंदिरा गांधी पंतप्रधान होतील, याची व्यवस्था केली; पण या मंडळींना ‘गुंगी गुडिया’ वाटलेल्या इंदिरा गांधी यांनी त्यांच्या हातचे बाहुले न बनता त्यांना शह देण्यासाठी ‘इंडिकेट’ नावाचा नवा, स्वतंत्र गट पक्षात उभा केला. ‘मॅडम’ना काय हवे ते हा गट त्यांच्यासाठी करत असे. ‘सिंडिकेट’चे जोखड झुगारून टाकण्यास आतूर झालेल्या इंदिराजींनी पक्षात फूट पाडून विरोधकांना चितपट केले. पक्षाची सूत्रे १९९८ मध्ये हाती आली तेव्हा सोनिया गांधी भलेही नवख्या होत्या; पण १९९९ मध्ये त्यांनी शरद पवार यांच्यासह त्यांच्या विरोधकांवर बाजी उलटविली. आता २० वर्षांनंतर सोनिया गांधी यांना आपल्याराजकीय वारशाचा धोका निर्माण झाल्याचे जाणवत आहे. त्यातून नेमके काय घडते हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे असणार आहे.