- शर्मिला फडके, कला समीक्षक
अँडी वारहोलच्या सेज ब्लू रंगातल्या मॅरिलिन मन्रोला दोनशे दशलक्ष डॉलर्सची किंमत मिळाली. लिलावात विकलं गेलेलं हे सर्वात महागडं अमेरिकन पेंटींग ठरलं. पाच वर्षांपूर्वी वारहोलच्याच ऑरेंज मन्रोला एका खाजगी खरेदीमधे तब्बल दोनशेचाळीस दशलक्ष किंमत मिळाली होती. इतकी किंमत, तीही सिल्क स्क्रीन तंत्राने छापलेल्या हॉलिवुडच्या तारकेच्या अतिप्रसिद्ध असलेल्या छायाचित्राच्या पेंटेड इमेजला? काय खास आहे मेरिलिन मन्रोच्या या रंगवलेल्या छायाचित्रात असा प्रश्न नक्कीच समोर उभा राहिलेला असू शकतो.
तर वारहोलच्या या मन्रोचं कला-इतिहासात नेमकं काय स्थान आणि महत्त्व आहे, वारहॉलने मुळात मेरिलिन मन्रोच्या छायाचित्राला अशा सिल्क स्क्रिन तंत्रातून अनेक प्रतिमांमधे पुनरावृत्त करण्याचा खटाटोप का केला होता? अँडी वारहोल (1928-1987) हे पन्नासच्या दशकात उदयाला आलेल्या आणि पुढे जवळपास दोन दशकं अमेरिकेमधे आणि इतरत्रही धुमाकूळ घातलेल्या पॉप आर्ट कल्चरमधलं मोठं, पायोनियर नाव. त्याने आपल्या आवडत्या हॉलिवूड तारकेच्या, मेरिलिन मन्रोच्या एका लोकप्रिय छायाचित्राची पाच वेगवेगळ्या रंगांमधे सेम पेंटेड इमेज असलेली एक पुनरावृत्ती मालिका बनवली. दुहेरी लाकडी पॅनेल्सवर, ज्याला डिप्टीक म्हणतात, त्यावर त्याने ही पेंटींग्ज तयार केली होती. एरवी साधारणपणे चर्चमधल्या वेदीवर अशा लाकडी दुहेरी किंवा तिहेरी पॅनेल्सवर मदर मेरी, जीझसची धार्मिक आणि पवित्र चित्रे रंगवलेली असतात. तर एका लोकप्रिय हॉलिवूड तारकेचा चेहरा डिप्टीकवर रंगवण्यामागे मुळातच वारहोलचा हेतू होता, लोकप्रिय, सुप्रसिद्ध सेलेब्रिटीजवर सामान्य रसिक परमेश्वराइतक्याच भक्तीभावाने प्रेम करत असतात हे दाखवणे. अँडी वारहोल स्वत: हॉलिवूडच्या लोकप्रिय तारे-तारकांचा अगदी लहान वयापासून अमाप चाहता. अशा सेलेब्रेटीजचं जनमानसातलं स्थान, त्यांचा मोठा प्रभाव याची त्याला चांगलीच जाणीव होती. ही लोकप्रियता, समकालिन समाजावर असलेला त्यांचा प्रभाव त्याला अशा डिप्टिकवरच्या इमेजमधून अजरामर करून ठेवायचा होता असंही म्हणता येईल. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन समाजात उपभोगवादी, ग्राहककेन्द्रित वृत्ती शिगेला पोहोचली होती. या वृत्तीच्या प्रतिकांचं प्रातिनिधिक चित्रण वारहोलने आपल्या पॉप आर्टमधून केलं. उदा. कॅम्पबेल सूपचे कॅन, कोकाकोलाच्या बाटल्या इत्यादी. वारहोल आपली ही चित्र त्याने स्वत:च विकसित केलेल्या स्क्रिन प्रिन्टींगच्या खास तंत्राद्वारे काढत असे. पॉप्युलर कल्चरचं प्रतिनिधित्व करणारी कला ही पॉप आर्ट. पॉप आर्ट चळवळीत जाहिरात कलेचा प्रभाव पडलेले अनेक स्वतंत्र वृत्तीचे चित्रकार होते. त्यापैकी प्रमुख होता वारहोल. वारहोलच्या या मन्रो डिप्टीकमधे पॉप आर्ट संपूर्णपणे प्रतिबिंबित झाली. मुळात मन्रो ही अमेरिकन पॉप कल्चरची आयकॉन.
वारहोलने सेलेब्रिटींचं चित्रपट तारकांचं आपल्या पॉप आर्ट द्वारे हे जे चित्रण केलं ते त्यावेळचा ग्राहककेंद्रित अमेरिकन समाज, मास कल्चर, भौतिकवाद, फ़ॅशन, प्रसिद्धी, गाजावाजा आणि अचानक मृत्यू या सगळ्याचं एकमेकांशी असलेल्या नात्याचा शोध घेऊ पहाणारं होतं. ज्या समाजात व्यक्तीला केवळ एक वस्तू समजलं जातं त्या समाजाच्या वृत्तीवर ओढलेला हा एक ताशेरा म्हणता येईल.
वारहोल हा खरं तर अमेरिकेत आलेला एक स्लोवाकियन निर्वासित. त्याचं बालपण सर्वसामान्य नव्हतं. एका दुर्धर रोगामुळे त्याला शाळा अनेकदा बुडवावी लागली. शिक्षणातल्या अनियमिततेमुळे मित्रही फार झाले नाहीत. एकाकीपणा घालवायला तो सतत टीव्ही पहात राही. त्यातून सतत दिसणाऱ्या लोकप्रिय, प्रसिद्ध अशा सेलेब्रिटीजच्या चेहऱ्यांकडे तो साहजिकच आकर्षित होत गेला. ते चेहरे त्याला जास्त जवळचे, ओळखीचे होते. त्याच्या व्यक्तिमत्वावरचा हा प्रभाव पुढे तो कलेच्या क्षेत्रात गेल्यावरही कायम राहिला. त्याच्या कलेच्या आवडीनिवडी त्यानुसार घडल्या. पॉप आर्ट चळवळ त्याने सुरू केली, त्याच्या कामामुळे लोकप्रिय झाली. त्याच्या या पॉप आर्ट शैलीचं अनुकरण आजतागायत होत आहे. पन्नास ते साठच्या दशकात वारहोल स्वत: न्यूयॉर्कच्या व्यावसायिक कलाक्षेत्रातलं मोठं, यशस्वी नाव बनला होता.
वारहॉल आपल्या आवडत्या सेलेब्रिटी किंवा वस्तूच्या छायाचित्राचा आकार मोठा करुन ते सिल्क स्क्रिनवर घेऊन मग ते मोठ्या कॅनव्हासवर ठेवायचा, आणि मग मागच्या बाजूने त्यावर हव्या त्या रंगात आणि प्रमाणात शाई लावायचा. हे तंत्र त्याने खास विकसित केलं होतं. या तंत्राचा वापर करून त्याने जनमानसांत लोकप्रिय असलेल्या अनेक प्रतिमांची पुनरावृत्ती करून त्या छापल्या. ६० नंतर मात्र त्याने त्यातल्या प्रत्येक प्रतिमेमध्ये काही ना काही वेगळेपणा आणायला सुरुवात केली.
या आधी फॉव्ह चळवळीतले चित्रकार रंगांना कोणतीही प्रतिकात्मकता न जोडता ते मुक्तपणे, हवे तसे वापरत, त्यातून निर्माण झालेल्या संवेदनांचा आनंद घेत. वारहोलने त्याचंच अनुकरण त्याच्या या पॉप आर्टमधे केलं. मात्र ते रंग त्याने यांत्रिक कौशल्याने ताब्यात ठेवले. रंग आणि मूड यांचा संबंध पूर्णपणे काढून टाकला.
वारहोलला आता प्रसिद्धी आणि पैसा मिळत होता, पण चित्रकला जगतात व्यावसायिक कलेचा हा एक प्रकार म्हणून तुच्छतेनं पाहिलं जात होतं. व्यावसायिक कलाविश्वात उत्तम, यशस्वी नाव कमावल्यावर आता त्याला अभिजात चित्रकार म्हणून मिळणारा मान हवासा वाटायला लागला होता. वारहोलचे स्वत:चेही अनेक मानसिक गोंधळ होते. जाहिरातींच्या संकल्पना त्याला सोडवत नव्हत्या, त्यांनाच मोठ्या आकारात ग्राफिक कॅनव्हासवर परावर्तित करून तो काहीतरी वेगळं साध्य करू पाहत होता, चित्रकार म्हणून काम करायचं की कमर्शियल ग्राफिक आर्टिस्ट यातला गोंधळ समोर उमटत होता. आपली वैयक्तिक आवड आणि सार्वजनिक प्रतिमा यांच्यातही तो दुभंगलेला होता. प्रतिमांची पुनरावृत्ती किंवा रिपिटेड इमेजरी मधला त्याचा रस मात्र कायम होता. काहीवेळा तो छायाचित्रे एकमेकांना शिवून त्यांच्या चौकटींचं जाळ तयार करी.
या होत्या नंतरच्या काळात आयकॉनिक ठरलेल्या अँडी वारहॉल प्रिन्ट्स. त्यात कॅम्पबेल सूपचे डबे आहेत, डॉलरच्या नोटा, कोकाकोलाच्या बाटल्या आहेत आणि अनेक सेलेब्रिटीजचे चेहरे होते. अमेरिकन समाजसंस्कृतीतल्या अनेक गोष्टींवर, सुप्रसिद्ध प्रतिमांचं सरसकट सामान्यीकरण, मूल्य गोंधळ, कठोर व्यावसायिकता इत्यादींवर केलेलं ते भाष्य मानलं गेलं. कॅम्पबेल सूप्सचे कॅन आपण पुनरावृत्त करून का प्रिन्ट केले यावर तो म्हणाला होता, "मी आणि माझ्यासारखे अनेक अमेरिकन हे सूप रोज पितात, वर्षानुवर्षे, मी स्वत:च ते गेली वीस वर्षे रोज पित आहे, रोज रोज, तेच तेच, तसेच करण्यात कम्फर्ट मिळवण्याची ही सवय मला मांडाविशी वाटली." सिल्क स्क्रिन पेंटींगच्या आपल्या या तंत्राविषयी तो म्हणायचा, “मला यंत्र जसं काम करतं तसं करायचं आहे” मशिनची अचूकता, प्रतिमांच्या हुबेहुब नकला करणं हे त्याला अपेक्षित होतं. उजळ, झळझळीत रंगीत प्रतिमा हे त्याचं वैशिष्ट्य. आपल्या स्टुडिओला तो फॅक्टरी म्हणायचा. कलेचं व्यावसायिकीकरण करायला अनेक हातांची गरज असते असं म्हणत त्याने अनेक सहायकही मदतीला ठेवले होते.
पॉप आर्ट हे पॉप्युलर कल्चरचं प्रतिनिधित्व करत होतं. मात्र अजूनही फ़ाईन आर्टिस्ट म्हणून त्याला चित्रकला जगत मान्यता देत नव्हतेच. याच वेळी, १९६२ मधे त्याच्या अत्यंत आवडत्या तारकेचा, मेरिलिन मन्रोचा अकस्मात गूढ मृत्यू झाला. वारहोलने तिच्या सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात लोकप्रिय अशा नायगारा सिनेमातील छायाचित्राला घेऊन पुन्हा हाच प्रयोग केला. यावेळी कॅम्पबेल सूप कॅन समोर नव्हते, तो ज्या इमेजमधे भावनिकदृष्ट्या गुंतला होता ती होती. वारहोलने मन्रोची त्याला अतिशय आवडणाऱ्या लोकप्रिय छायाचित्राची प्रतिमा मोठी करुन आपल्या स्टुडिओतल्या भिंतीवरच्या कॅनव्हासवर लावली. त्यावर हाताने रंगकाम करुन त्याला पेंटरली इफेक्ट दिला, पुन्हा ते स्टेन्सिल केलं. अनेक प्रयोग तो करत राहिला. काही वेळा तो वेगवेगळे रंग एकावर एक वापरायचा, दर वेळी वेगळ्या रंगाचा थर.
आणि मग याच प्रयत्नातून वारहोलला त्याच्या मनासारखी प्रसिद्धी, नाव, दर्जा मिळवून देणारं आयकॉनिक सिल्क स्क्रिन प्रिन्ट निर्माण झालं “मेरिलिन मन्रो”. आपल्या अत्यंत आवडत्या हॉलिवुड तारकेच्या एका लोकप्रिय छायाचित्राच्या वेगवेगळ्या प्रतिमा. कारखान्यातल्या असेम्ब्ली लाईनसारख्या पद्धतशीरपणे निर्माण झालेल्या वेगवेगळ्या रंगछटांमधल्या प्रतिमा.
एकच प्रतिमा, प्रतिमेच्या अजून काही प्रतिमा, प्रतिमांची पुनरावृत्ती, मग प्रत्येक प्रतिमेत किंचित वेगळेपण. यातून निर्माण झालेलं मेरिलिन मन्रोचं ते चौरंगी डिप्टीक अत्यंत मनोहारी, ग्लॅमरस, आकर्षक दिसत होतं, अखेर फ़ाईन आर्ट आणि कमर्शियल आर्टचा समतोल वारहोलला त्याच्या मते साधता आला होता.
वारहोलची ही मन्रो आज जवळपास सहा दशकांनंतरही तिची लोकप्रियता, तिचं ग्लॅमर अभंग राखून आहे, आजही ती त्याला अमाप पैसा मिळवून देण्यात यशस्वी ठरत आहे. आजही पुनरावृत्ती, व्यावसायिक प्रतिमांना समाजात किती महत्वाचं स्थान आहे हे सिद्ध करत आहे.