‘आता प्राण्यांनाही आधार कार्ड देणार!’ ही चर्चा ऐकताच जंगलात हलकल्लोळ माजला. शिवारात पळापळ सुरू झाली तर गोठ्यात कुजबुज ऐकू येऊ लागली. गेली चार वर्षे ‘मी लाभार्थीऽऽ माझं सरकारऽऽ,’ म्हणत मोठ्या कौतुकानं रवंथ करणाऱ्या गार्इंनाही ठसका बसला. रस्त्यावरची भटकी कुत्री मात्र खूश झाली. तेव्हा बंगल्यातल्या डॉगीनं एका झटक्यात त्यांना ताळ्यावर आणलं, ‘तुम्हाला आधार नव्हे तर आधार कार्ड मिळणारंय. जमिनीवर या,’ हे ऐकताच निराधार कुत्र्यांचं ओरडणं विव्हळण्यात अवतरलं.या सरकारी निर्णयाच्या विरोधात वाघानं डरकाळी फोडली. ‘मुंबईची परंपरा’ बहुधा जंगलातही पाळली जात असावी. असो, डोंगरावर सर्व प्राण्यांची बैठक बोलाविली गेली. झाडून सारे जमले. सध्या ‘रामलीला’ मैदानावर अण्णांसोबत जेवढे कार्यकर्ते, त्याहीपेक्षा अधिक इथं गोळा झाले. सुरुवातीला हत्ती बोलायला उठला, तेव्हा सारेच शांतपणे त्याचं भाषण ऐकू लागले. कारण पुढील वर्षभरात म्हणे ‘हत्ती’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. ‘आपल्या गळ्यात कार्ड बांधून आपल्यालाही सरकारी नियमात अडकविण्याचा हा डाव आहे. तो आपण हाणून पाडणारच,’ असं हत्तीनं ठणकावून सांगताच काही प्राण्यांनी जोरात हुंकार भरला.आता हा आवाज भक्तांचा होता की विरोधकांचा, हे काही बिच्चाºया मेंढराच्या लक्षात आले नाही. ‘हे कार्ड बांधल्यानंतर आपल्याला जास्तीत-जास्त दिवस जीवदान मिळणार का रे भाऊऽऽ?’ असं त्यानं भाबडेपणानं शेजारच्या बोकडाला विचारलं. मात्र, ‘कडकनाथ’च्या क्रेझपायी बचावलेली गावरान कोंबडी मोठ्या थाटात माहिती देऊ लागली, ‘केवळ या कार्डाच्या नंबरवरूनच आता आपली ओळख राहणार,’ तेव्हा ब्रॉयलर कोंबडी फुरंगटून म्हणाली, ‘म्हणजे आमच्या दुकानातलं गिºहाईक मागणार.. ७७७ ७७७ नंबरचा फ्रेश माल अर्धा किलो द्या.’यावेळी पाणगेंड्याचा चेहरा मात्र भलताच पाहण्याजोगा झाला; कारण ‘आपला चेहरा प्रत्यक्षात एवढा खराब.. मग आधार कार्डाच्या फोटोत अजून किती भीषण दिसेल?’ या कल्पनेनं तो पुरता बावचळून गेला. ही सारी चर्चा ऐकून सारेच प्राणी पुरते भेदरले. ‘सातारी बिबट्याचं आधार कार्ड कोकणच्या जंगलात हरवलं किंवा कर्नाटकचे तस्कर आजरा-चंदगडमध्ये येताच त्यांच्याही नंबरवर जीएस्टी लागू,’ अशा भविष्यातल्या चित्र-विचित्र घटना सर्वांच्या डोळ्यासमोरून तरळून गेल्या. तेव्हा घामेघूम होऊन मोठ्या आशेनं सारे सिंहाकडं बघू लागले, कारण ‘गीर’च्या जंगलात वावरल्यामुळं सिंहाला गुजराती भाषा ज्ञात होती... म्हणून त्याच्या शब्दाला म्हणे वरपर्यंत वजन होतं. मात्र, ‘गेल्या चार वर्षांत जिथं भल्या-भल्यांची शेळी झाली, तिथं आपली आयाळ झडायला किती वेळ लागणार?’ या विचारानं सावध झालेला सिंह बैठकीतून गुपचूपपणे निघून गेला. तेव्हा रोज कुठल्या नां कुठल्या तरी संधीची वाट पाहणाºया काही प्राण्यांनी ‘हायऽऽ हायऽऽ’ म्हणत सरकारचा निषेध करण्यास सुरुवात केली. याचवेळी जंगलातून चालत निघालेल्या एका वाटसरूच्या रेडिओमधून ‘मन की बात’चा आवाज आला, ‘भार्इंयों और बहनोंऽऽ’...अन् काय सांगावं राव? एका क्षणार्धात बैठकीचं अवघं मैदान रिकामं झालं.
अॅनिमल आधार कार्ड
By सचिन जवळकोटे | Published: March 29, 2018 4:12 AM