गेल्या वर्षी १८ जून रोजी अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह या तिघींची भारतीय हवाई दलातील लढाऊ विमाने चालविणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक म्हणून निवड झाली तेव्हा आणखी एक पुरुषप्रधान क्षेत्र महिलांनी काबीज केल्याबद्दल त्यांचे देशभर कौतुक केले जाणे साहजिकच होते. तिन्ही सेनादलांमध्ये महिलांना प्रत्यक्ष आघाडीवरील जोखमीच्या कामासाठी निवडले जाण्याचाही हा पहिलाच प्रसंग होता. सरकारनेही याचा मोठा गाजावाजा केला व या तिघींना हवाई दलाच्या वैमानिक चमूत सामील करून घेण्याचा समारंभ तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत साजरा झाला होता. महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी देण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून हवाई दलातही महिलांना ‘फायटर पायलट’ होण्याची संधी देण्याचा निर्णय सरकारने आॅक्टोबर २०१५मध्ये घेतला. हा निर्णय पाच वर्षांसाठी प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आला होता. परंतु पहिल्याच वर्षी अवनी, भावना आणि मोहना या तिघींच्या निवडीनंतर महिलांचा या बाबतीतील उत्साह मावळत असल्याचे खेदजनक वास्तव समोर येत आहे. हवाई दलात वैमानिक होण्याच्या प्रशिक्षणासाठी निवड होणाऱ्या कॅडेट््सना पहिल्या सहा महिन्यांच्या प्राथमिक प्रशिक्षणानंतर हेलिकॉप्टर पायलट, मालवाहतूक विमानाचा पायलट व लढाऊ विमानाचा पायलट असे तीन पर्याय दिले जातात. सन २०१५पर्यंत महिलांना यापैकी लढाऊ विमानाचा पायलट होण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. संधी मिळताच या तिघींनी हा पर्याय निवडला, त्यांची निवड झाली व त्यांनी पुढील प्रगत प्रशिक्षणही पूर्ण केले. परंतु त्यानंतरच्या पुढील तीन तुकड्यांमध्ये एकाही महिला कॅडेटने फायटर पायलट होण्याचा पर्याय निवडलेला नाही. पुरुष कॅडेटना त्यांनी पर्याय दिला नाही तरी हवाई दलाची गरज म्हणून फायटर पायलट होण्याची सक्ती करण्याची सोय आहे. महिलांना अशी सक्ती नाही. त्यांच्यासाठी फायटर पायलट होणे हे ऐच्छिक आहे. किमान चार वर्षे मातृत्व टाळणे यासह कौटुंबिक अडचणी हे महिलांचा उत्साह मावळण्याचे कारण असू शकते. पुढील दोन वर्षे एकाही महिला कॅटेडने हा पर्याय दिला नाही, तर महिलांना मिळालेली ही संधी बंद केली जाऊ शकेल.
भाष्य - उत्साह मावळला
By admin | Published: March 28, 2017 12:21 AM