हवाई प्रवास करणा-यांनी यापुढे फार सांभाळून वागायला हवे. विशेषत: ज्यांना विमान प्रवासात उपद्रव करण्याची खोड आहे त्यांनी. कारण यापुढे त्यांनी असा कुठलाही खोडसाळपणा केल्यास त्यांच्यावर विमानबंदी लादली जाऊ शकते. केंद्रीय नागरी उड्डयण मंत्रालयाने देशात प्रथमच यासंदर्भातील दिशानिर्देश जारी केले असून विमान प्रवासी आणि कर्मचा-यांच्या सुखरुप आणि आनंददायी प्रवासासाठी ते निश्चितच लाभदायी ठरतील अशी अपेक्षा आहे. एक काळ असा होता जेव्हा आकाशात उंच उडणारे विमान बघण्यातच अनेकांचे समाधान होत असे. परंतु आता मात्र परिस्थिती पार बदलली आहे. विमान प्रवासाचे कुणाला नावीन्य राहिलेले नाही. एखाद्या एसटी बसस्थानकावर प्रवाशांची जशी गर्दी असते तशीच ती विमानतळांवरही दिसू लागली आहे. हे चित्र दिसायला चांगले असले तरी यासोबतच विमान प्रवासातील अनागोंदीही प्रचंड वाढली आहे, हे सुद्धा तेवढच खरे. एवढी की विमानातही आता हाणामाºया, शिवीगाळ असले प्रकार घडायला लागले असून त्यावर नियंत्रणाची गरज भासू लागली आहे. उड्डयण मंत्रालयाने विमान प्रवासासाठी ही नियमावली तयार करण्यास विशेषत: दोन घटना कारणीभूत ठरल्या आहेत. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची एअर इंडियाच्या अधिकाºयांसोबतची वादावादी आणि त्यानंतरची मारहाण तसेच तेलगू देसमचे खासदार जे.सी. दिवाकर रेड्डी यांनी विशाखापट्टणम विमानतळावर केलेले तांडव आणि मग या दोघांविरुद्धही उगारण्यात आलेले विमानबंदीचे आयुध. खासदारांवरील बंदीचा हा मुद्दा संसदेतही गाजला आणि याकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले. पुढील काळात विमानप्रवासातील गोंधळ थांबविण्याच्या दृष्टीने ही नियमावली फायद्याची ठरणार आहे. या नो फ्लाय यादीत तीन प्रकारची वर्गवारी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे अतिविशिष्ट व्यक्तींनाही ती लागू असणार आहे. त्यामुळे या बंदीपासून मुक्त राहण्यासाठी सर्व विमानप्रवाशांनी काळजी घ्यायची आहे. अन्यथा त्यांचे हवाई प्रवासाचे स्वप्न हवेतच विरेल.
भाष्य - हवाई उपद्रवींनो सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:14 AM