एकविसाव्या शतकात लग्नानंतर पत्नीने डोक्यावर पदर घ्यावा, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे मत नोंदवून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका पतीची घटस्फोटाची मागणी फेटाळली आहे. कपाळावरचे कुंकू पुसले किंवा मंगळसूत्र काढून ठेवले म्हणून पत्नीला क्रूर ठरविता येणार नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने या कौटुंबिक प्रकरणात नोंदविले आहे. पत्नीवर आपला मालकी हक्क मानून तिच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादणाऱ्या पुरुषीवृत्तीला न्यायालयाने चपराक दिली हे फार चांगले झाले. यापूर्वी अशाच एका प्रकरणात पत्नीला नोकरी करण्यापासून रोखू पाहणाऱ्या एका पतीदेवांना समज देताना महिलेला कोणत्याही ठिकाणी शिक्षणाच्या आधारे नोकरी करण्याचा अधिकार आहे आणि तो हिरावून घेता येणार नाही, असा निवाडा न्यायालयाने दिला होता. अलीकडच्या काळात घटस्फोेटांच्या बहुतांश प्रकरणांमध्ये महिलांवर लावण्यात येणारे असे नानाविध आरोप ऐकल्यावर आपण खरच एकविसाव्या शतकात वाटचाल करीत आहोत काय, असा प्रश्न पडतो. एकीकडे स्त्री प्रगतीची अनेक क्षेत्रे पादाक्रांत करीत असून, आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविण्यात ती यशस्वी ठरली आहे. परंतु या पुरुषप्रधान समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र बदलला नाही. कधी तिच्या कपड्यांवरून, कधी वागण्याबोलण्यावरून तर कधी घराबाहेर राहण्यावरून तिच्या चारित्र्याचे मोजमाप केले जाते. स्त्री एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिलाही स्वत:ची मते, आवडीनिवडी असू शकतात हे अजूनही अनेक पुरुषांना पचनी पडलेले दिसत नाही. नीतिमत्तेच्या या सर्व फूटपट्ट्या तिच्यासाठीच काय? तरुणींनी जिन्स घालायची की नाही, स्कर्ट घातला तर तो किती उंचीचा असावा याचा निर्णय घेण्याचा अधिकार यांना कसा? यामागील मुख्य कारण म्हणजे पुरुषांचा पोषाख बदलला; पण मानसिकता पुरातनवादीच राहिली. तिने एक चौकटीबद्ध आयुष्य जगावे अशीच अपेक्षा केली जाते. अगदी बलात्काराच्या प्रकरणांमध्येसुद्धा तिलाच दोषी ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. हे वास्तव बदलायचे असल्यास पुरुषी मानसिकता बदलावी लागेल.
भाष्य - पुरुषीवृत्तीला चपराक
By admin | Published: April 01, 2017 12:30 AM