‘स्वच्छता ही दोन प्रकारची असते. एक अंतर्गत स्वच्छता आणि दुसरी बाह्य स्वच्छता. जर आपले शरीर स्वच्छ असेल तरच आपण स्वच्छता ठेवण्यात यशस्वी होऊ’ - असा एक मौलिक विचार जामियत उलामा-ए-हिंदचे सेक्रेटरी जनरल मौलाना महमूद मदनी यांनी हरियाणातील खानापारामध्ये रविवारी व्यक्त केला. खरे तर उपरोक्त दोन्ही प्रकारातील स्वच्छतेचा विचार कित्येक वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांनी आपल्या वाणीतून आणि कृतीतून आणि संत कबीरांनी आपल्या दोह्यातून अधोरेखित केलेला आहे. यातून ज्यांना बोध झाला त्यांनी स्वच्छतेचा हा मंत्र आपल्या मनामनांत रूजविला आणि तोच वसा येणाऱ्यां पिढ्यांच्या हवालीही केला. स्वच्छतेसाठी अवघे आयुष्य पणाला लावणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वच्छता अभियान राबविण्याची वेळ राज्य शासनावर येणे आणि तोच स्वच्छतेचा विचार नव्याने मदनी यांना उद्धृत करावा लागणे याचा अर्थ समाजात स्वच्छता अद्याप शंभर टक्के रूजलेलीच नाही. मदनी हेही केवळ सांगून थांबलेले नाहीत तर शौचालय नसलेल्या घरात निकाह पढायला जाऊ नका असा आदेशच त्यांनी मौलवी आणि मुफ्तींना दिला. त्याचबरोबर हरियाणा, हिमाचल आणि पंजाबमध्ये मुस्लीमांच्या विवाहासाठी शौचालयाची अट घालण्यात येणार असल्याचेही वक्तव्य केले. शौचालयासाठी मदनी यांनी घेतलेली ही कठोर भूमिका म्हणजे एकार्थाने स्वच्छतेचा पुरस्कारच म्हणायला हवा. प्रत्येक विवाहेच्छूक वरासाठी वधू आणि त्या दोघांना विवाहबंधनात अडकविण्यासाठी मौलांना अथवा मुफ्तींची गरज भासते. त्यामुळे शौचालयांना आपोआपच प्राधान्यक्रम दिला जाईल, या प्रांजळ भावनेतूनच हा आदेश दिला गेला असावा. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला गोडीत सांगून समजतेच किंवा त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होतेच असे नव्हे. त्यासाठी कित्येकदा आदेशाची किंवा वटहुकूमाचीच भाषा तत्काळ समजते. हाही प्रकार तशातलाच असला तरी त्यातून जे काही निष्पन्न होईल ते या समाजासाठी आणि अखिल मानव जातीसाठी हिताचेच ठरणार आहे. त्यातून निरोगी आरोग्य आणि निरोगी मनाचा संदेश इतरांपर्यंत पोहचल्यावाचून राहणार नाही.
भाष्य - एक पाऊल स्वच्छतेकडे
By admin | Published: February 20, 2017 12:15 AM