भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा जिथे भिडतात तिथे भारतीय व चिनी सैन्य अमोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेली स्थिती अधिकाधिक चिघळत असल्याचे चित्र उभे झाले आहे. चीन सरकारच्या मालकीच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वर्तमानपत्राची मजल तर चक्क भारताला धमकावण्यापर्यंत गेली आहे. भारताने चुपचाप आपले सैन्य मागे घ्यावे; अन्यथा युद्धासाठी सज्ज व्हावे, असा इशारा ‘ग्लोबल टाइम्स’ने दिला आहे. भारतीय सैन्य मागे हटण्यास तयार नसल्याने आणि वरून भारतीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आताचा भारत १९६२ मधील भारत नव्हे, या शब्दात चीनला खिजविल्याने चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. चीनच्या एकपक्षीय राजवटीने जनतेवर दडपशाही करून नेत्रदीपक आर्थिक प्रगती साधली आहे. प्रचंड भौगोलिक विस्तार, सर्वाधिक लोकसंख्या आणि जोडीला लाभलेली आर्थिक ताकद या बळावर आपण जे म्हणू ते इतरांना मान्य करायला लावण्याची खोड चिनी राज्यकर्त्यांना जडली आहे. क्रांती यशस्वी होताबरोबर तिबेट गिळंकृत केलेल्या चिनी राज्यकर्त्यांची नजर आता नेपाळ, भूतान आदी छोट्या शेजारी देशांवर खिळली आहे. पाकिस्तानने तर जणू चीनचे मांडलिकत्वच पत्करले आहे. भारतानेही आपल्यासमोर तसेच झुकावे ही चिनी राज्यकर्त्यांची मनीषा आहे. चीनची लष्करी ताकद भारताच्या तुलनेत बरीच जास्त असली तरी हिमालयात भारतीय सैन्य चिनी सैन्याला भारी पडू शकते. यापूर्वी १९६७ आणि १९८७ मध्ये ते सिद्धही झाले आहे. लष्करासह निमलष्करी दलांची संख्या विचारात घेतल्यास भारतीय सैन्य चिनी सैन्याच्या तोडीस तोड ठरू शकते. शिवाय हिंद महासागरात भारतीय नौदल पारंपारिकरीत्या वरचढ आहे. अंदमान-निकोबार बेट समूहांवर भारतीय नौदलाचा तळ असल्यामुळे, युद्धाच्या स्थितीत मलाक्काच्या सामुद्रधुनीतून होणारे चिनी जहाजांचे आवागमन थांबवून भारत चीनचा इंधन पुरवठा व व्यापार रोखू शकतो. हा धोका ओळखल्यामुळेच तर चीन पाकिस्तान आर्थिक मार्ग (सीपीईसी) प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची चीनला घाई झाली आहे. यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की अमेरिकेपेक्षा मोठी आर्थिक महासत्ता होण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या चीनला भारतासारखी प्रचंड मोठी बाजारपेठ गमावणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे चीनला भारतासोबत युद्ध परवडू शकत नाही. असे युद्ध झालेच तर त्यामध्ये चीन विजेता ठरणार नाही. लाभ होईल तो अमेरिकेचा! त्यामुळे चीनतर्फे दिल्या जात असलेल्या युद्धाच्या धमक्या पोकळच आहेत, यात शंका नाही.
भाष्य - केवळ पोकळ!
By admin | Published: July 08, 2017 12:11 AM