वाढत्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाही, असे लहानपणापासूनच मुलांच्या मनावर बिंबवले जाते. पण अभ्यास म्हणजे ज्ञान मिळवणे नाही तर गुण मिळवणे असे समीकरण रूढ झाले आहे. याचेच पडसाद आता बोर्डाच्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांवरून दिसू लागले आहेत. बारावीच्या तिन्ही बोर्डाचे निकाल जाहीर झाले आहेत.गेल्या काही वर्षात गुणांना अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने अन्य बोर्डाप्रमाणे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडूनही गुण दानाचे प्रमाण वाढले आहे. ९० ते ९५ टक्के आणि ९५ टक्क्यांवर गुण मिळवण्याच्या प्रमाणात भरघोस वाढ झाली आहे. रविवारी सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या मुलीला फक्त २ गुण कमी पडल्याने तिचे १०० टक्के हुकले. तिला ९९.०६ टक्के गुण मिळाले आहेत. सोमवारी जाहीर झालेल्या आयसीएसीई बोर्डाचे बारावीचे निकाल जाहीर झाले. त्यात ९९.५० टक्के गुण मिळाले आहेत. काहीसे असेच चित्र हे राज्य मंडळाच्या निकालामध्ये पहायला मिळाले आहे. यावरून असे स्पष्ट होते की, गुणाच्या स्पर्धेत काही प्रमाणत मागे असलेल्या राज्य बोर्डाने आता उडी घेतली आहे. आणि दुसरे साधर्म्य म्हणजे तिन्ही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. एकीकडे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणत घट होत असली तरी टक्केवारी ही दरवर्षी वाढत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थी तणावाचा सामना करत आहेत. टक्केवारीतही काही पूर्णांकाचा फरक पडल्याने महाविद्यालयातील प्रवेश हुकतो. अन्य बोर्डाच्या तुलनेत राज्य बोर्डाच्या अभ्यासक्र म, परीक्षा पद्धतीमध्ये फरक आहे. अन्य बोर्ड आणि राज्य बोर्ड यांच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणांच्या स्पर्धेत राज्य बोर्डाचे विद्यार्थी मागे पडत होते. त्यामुळे एकाएकी गुण वाढविण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल केले गेले. पण विद्यार्थ्यांचा विचार केलेला दिसून येत नाही. सामान्य क्षमतेच्या विद्यार्थ्यांना गुण अधिक मिळूनही पुढची वाट सोपी राहिलेली नाही. त्यातच हुशार विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा अधिक रंगू लागली आहे. पण याचा नक्की किती आणि कसा फायदा विद्यार्थ्यांना होतो याचा विचार केलेला नाही. बदलाचा दिखावा होत असल्याने त्याला वेळीच आळा घातला पाहिजे. तसेच ज्ञान आणि गुण यामध्येही सुवर्णमध्य काढणे विद्यार्थ्यांच्या हिताचे होणार आहे. शिक्षण घेताना ज्ञान मिळणे याला महत्त्व प्राप्त झाले पाहिजे. गुणाच्या स्पर्धेत यशस्वी झाल्यास यशाचा मार्ग मोकळा होतो हा विचार बदलण्यासाठी शिक्षण क्षेत्रात बदल व्हायला हवेत.
भाष्य - टक्केवारीचा खेळ सारा
By admin | Published: May 31, 2017 12:15 AM