कृषी, पणन व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे महिनाभरापासून खूप चर्चेत आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी खोत यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदविला आहे. शेट्टी हे दर दोन तीन दिवसांनी खोत यांच्यावर टीका करतात. त्याला खोत प्रत्युत्तर देतात, असा नवा खेळ सुरू झाला आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे खोत यांना जाब विचारण्यात येणार आहे. त्यासाठी समितीही स्थापली आहे. सदाभाऊंना बाजू मांडण्यासाठी ४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. मात्र दोघांची मने दुभंगली असल्याने आता सदाभाऊंची संघटनेतून गच्छंती होईल, असे बोलले जाते. वास्तविक सरकारमधील एक कार्यक्षम राज्यमंत्री म्हणून सदाभाऊ पुढे आले आहेत. राज्यमंत्री म्हणून विशेष कोणतेही अधिकार नसताना त्यांनी संत सावता माळी शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शिवार बैठका घेऊन सरकारला शेतकऱ्याच्या बांधावर नेले. तूर खरेदीचा प्रश्न चिघळल्यानंतर त्यांनी खरेदी केंद्रांवर जाऊन बैठका घेतल्या. सध्या ते राज्यात पेरणीबाबत कार्यक्रम घेत आहेत. त्यांनी दत्तक घेतलेल्या मिलिटरी अपशिंगे गावात विविध विकास योजना राबवित आहेत. अपशिंगेचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांच्या या गावातील तरुण मोठ्या संख्येने सैन्यदलात आहेत. वास्तविक एखादा राज्यमंत्री एवढा कार्यक्षमपणे काम करत असताना त्याचे कौतुक होण्यापेक्षा ते मात्र टीकेचे धनी ठरत आहेत.शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपाची हाक दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुणतांबा येथे पाठविले व मुंबईत बैठक घेऊन संपावर तोडगा काढला. मात्र त्यातून संपात फूट पाडल्याचा खोत यांच्यावर आरोप झाला. त्यांना ‘व्हिलन’ ठरविण्यात आले. सोशल मीडियावर तर त्यांच्याविरुद्ध स्वपक्षीयांनीच मोठी मोहीम सुरू केली होती. शेतकरी संपाच्या वेळी सर्व कॅबिनेट मंत्री गप्प असताना खोत हे पुढे आले व त्यांनी शेतकऱ्यांशी सरकारने चर्चा करण्याची भूमिका मांडली. शेतकऱ्यांचा रोष त्यांनी अंगावर घेतला. नंतर सुकाणू समिती स्थापन झाली, कर्जमाफी जाहीर करण्यासाठी मंत्रिगट नेमण्यात आला. त्यात मात्र सदाभाऊंना कुठेही स्थान मिळाले नाही. कर्जमाफीच्या या प्रक्रियेत सदाभाऊ कुठे दिसलेच नाहीत. कदाचित शेतकरी नेत्यांचा रोष वाढू न देण्यासाठी ही खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली असावी. दुसरीकडे सदाभाऊंवर त्यांचा पक्ष भलताच नाराज झालेला आहे. आता पक्षातून त्यांची हकालपट्टी होणे जवळपास निश्चित झाले आहे. सदाभाऊ चहूबाजूंनी अडचणीत आले असताना मुख्यमंत्री तरी त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
भाष्य - सदाभाऊंचा झाला चेंडू
By admin | Published: July 03, 2017 12:08 AM