जागतिक हवामानाविषयीच्या २०१७च्या अहवालानुसार, घटत्या ओझोनच्या थरामुळे मृत्यूदराच्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतातील हे प्रमाण १ लाख ७ हजार ८०० एवढे आहे. प्रदूषित हवेमुळे होणाऱ्या अकाली मृत्यूच्या प्रमाणात कमालीची वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो. असे अनेक अहवाल यापूर्वी प्रसिद्ध झाले असून, भविष्यातही प्रसिद्ध होतील. मात्र भूतकाळाप्रमाणेच आपण वर्तमानकाळातही ‘धोक्याची घंटा’ देणाऱ्या अहवालांकडे दुर्लक्ष केले तर याची किंमत संपूर्ण मानवजातीला मोजावी लागणार आहे. १९८० सालच्या सुमारास वातावरण बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले. भारतीय मान्सून तेव्हापासून अनियमित झाला. वेळापत्रक चुकू लागले. ऋतुचक्र विस्कळीत झाले. बाष्पीभवनाचा वेग वाढू लागला. आणि अवकाळी पावसासह गारपिटीच्या घटनांत भर पडली. १ हजार ५०० शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाने आपल्या चौथ्या आणि अंतिम अहवालात ‘जागतिक तपमानवाढ’ ही वस्तुस्थिती असल्याचे नमूद केले आहे. १७५० सालानंतर कार्बन डायआॅक्साइड आणि उष्णता शोषून घेणारी द्रव्ये व वायू मोठ्या प्रमाणावर वातावरणात सोडण्यात आले आहेत. मानवी कृतीमुळे दरवर्षी एक हजार कोटी टन कार्बन डायआॅक्साइड व तत्सम वायूची भर वातावरणात पडते आहे. १७५० सालाच्या तुलनेत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तपमानात सुमारे १.५ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. पृथ्वीवर यापूर्वी आलेल्या सर्वांत मोठ्या उष्णयुगात म्हणजे २५ कोटी वर्षांपूर्वी ९० टक्के जीवजाती नाहीशा झाल्या होत्या. मानवनिर्मिती उष्णयुगात या शतकात मानवासह सर्व जीवजाती नाहीशा होतील, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. युनोच्या जागतिक हवामान संघटनेचा अहवाल १८ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झाला आहे. या अहवालाप्रमाणे सन २०१६ हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. मात्र याची दखल कोणीही घेत नाही.‘न्यू यॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतील वर्तमानपत्राने १९ जानेवारी रोजी याची पहिल्या पानावर मुख्य बातमी दिली. बातमीवर ठळक अक्षरात म्हटले आहे की, ‘न्यू यॉर्क टाइम्स पृथ्वीवरील सर्वात मोठी बातमी तिच्या योग्य महत्त्वानुसार देत आहे. सन २०१६ हे आजपर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होते. आणि याच्या आपल्या जीवनावरील परिणामांची कल्पनाही करता येणार नाही.’ बातमीच्या शीर्षकात मानवजात व जीवसृष्टीला नष्ट होण्याचा धोका तयार झाला असल्याचे व सातत्याने उच्चतम तपमान नोंदले गेल्याने शास्त्रज्ञांना धक्का बसल्याचे नमूद केले आहे. सध्या हिमालयाच्या पाकिस्तान व अफगाणिस्तानाकडील बाजूस अतिबर्फवृष्टी सुरू आहे. अफगाणिस्तानात दोन गावे बर्फाखाली पूर्ण गाडली गेली आहेत व हजारो हेक्टर शेती नष्ट झाली. सुमारे १५० माणसे या बर्फाच्या सुनामीखाली मरण पावली. त्यामुळे या सर्वांचा विचार करत वेळीच जागे होण्याची वेळ आली आहे.