गंगेचा अपमान हा देशद्रोह आहे’ असे तेजस्वी उद््गार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले आहेत. त्यांच्या या उद््गारांमागे एक परंपरा आहे. ‘मोदींवर टीका करतील ते देशद्रोही आहेत’, ‘देशावर टीका करतील ते देशद्रोही आहेत’, ‘भाजपावर टीका करतील ते देशद्रोही आहेत’, ‘संघावर करतील ते देशद्रोही आहेत’, ‘आमच्या धर्मातील दोष सांगाल तर तो देशद्रोह होईल’ आणि ‘गायींवर टीका करतील तेही देशद्रोही आहेत’ या आणि अनेक घोषणांनी ती परंपरा तयार केली आहे. तिच्या पार्श्वभूमीवर गंगेचा अपमान हा देशद्रोह ठरविणाऱ्या आदित्यनाथांनी ‘राम तेरी गंगा मैली’ म्हणणाऱ्या राज कपूरचे आज काय केले असते याची कल्पना करता येईल. शिवाय ‘गाय हा एक उपयुक्त पशू आहे’ असे म्हणणाऱ्या सावरकरांना त्यांनी कोणता दंड दिला असता याचाही विचार करता येईल. मी, आम्ही आणि आमचे एवढे म्हणजेच देश, त्याहून वेगळा विचार करतील ते देशविरोधी वा विघातक आणि आमच्यावर टीका करतील ते देशद्रोहीच, ही भाषा आदित्यनाथ आणि त्यांच्या आताच्या परंपरेपूर्वी हिटलरने जर्मनीत आणि मुसोलिनीने इटलीत रुजविली. त्यांनी ती नुसती उच्चारलीच नाही तर अमलातही आणली. आदित्यनाथांचा पक्ष केंद्रात सत्तेवर आहे. त्यामुळे ते अशा घोषणा अंमलात आणण्याचा विचार करीतच नसतील असे नाही. उमा भारती नावाच्या एक मंत्री केंद्रात आहेत. त्यांच्याकडे सोपविलेले खातेच गंगाशुद्धीकरणाचे आहे. ती अशुद्ध झाली म्हणूनच तर ती शुद्ध करावी लागणार ना? त्यामुळे आदित्यनाथांसमोरच्या आरोपींत उमा भारतींचे नावही राज कपूर नंतर येऊ शकणारे आहे. आताची देशाची गरज ही की, काय केल्याने वा काय म्हटल्याने देशद्रोह होतो याची एक सविस्तर यादीच भाजपाने संघाच्या मदतीने बनविली पाहिजे व ती देशाला सांगितली पाहिजे. दक्षिण भारतातील अनेक राज्ये आणि अतिपूर्वेचा भारत हे गोवंशाचे मांस भक्षण करणारे प्रदेश आहेत. त्यातल्या दलित-बहुजनांच्या व आदिवासींच्या जाती-जमातीच नव्हे तर सवर्णांचे वर्गही तो मांसाहार करणारे आहेत. त्यामुळे गोवंशहत्या बंद कराल तर ‘द्रविडनाडूची मागणी पुढे येईल’ असा इशारा नुकताच मिळाला आहे. ही मागणी आजची नाही. देश स्वतंत्र होण्याच्या काळातही द्रविडस्तानची मागणी दक्षिण भारतात होती. पं. नेहरूंच्या सरकारने ज्या तऱ्हेने ती शमविली तिचा अभ्यास सध्याच्या सरकारने कधीतरी करणे गरजेचे आहे. अशा मागण्या बंदुकांनी निकालात काढता येत नाहीत. द्रविडस्तानच नव्हे, तेव्हा मास्टर तारासिंगांचे खलिस्तानही जोरात होते. शिवाय बंगाल या नव्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी मुस्लीम लीग आणि शरदबाबू बोस यांनी संयुक्तरीत्या पुढे केली होती. नागालँड आणि मणिपूर स्वातंत्र्य मागत होते. ते प्रश्न कधी प्रेमाने तर कधी धाकाने निकालात काढण्याचे तंत्र आता इतिहासजमा झाले आहे. आताचे राजकारणच दुहीच्या मार्गाने जाणारे असल्याने वेगळी मागणी, वेगळा विचार वा टीका हा देशद्रोह ठरविण्याचा प्रकार सध्या होताना दिसत आहे. वास्तविक देशद्रोह कशामुळे होतो हे सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या एका निकालपत्रात स्पष्ट केले आहे. देशविरोधी कृती म्हणजे देशद्रोह असे त्या न्यायालयाने म्हटले आहे. यात देशावरील टीकेचा समावेश नाही, हेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र एक नेता, एक पक्ष व एक राष्ट्र असा विचार करणारी एकारलेली माणसे नेत्यावरची टीकादेखील देशद्रोहाच्या सदरात आता टाकतात. ती तशी टाकताना त्याला व त्याच्या पक्षाला जे अनुकूल असेल तेच तेवढे योग्य आणि त्यांच्या कोणत्याही बाबीवरची टीका म्हणजे देशद्रोह ठरविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मग त्यात धर्म येतो, विचार येतो, सत्ताधारी पक्षाची धोरणे येतात, त्याचा कार्यक्रमही येतो. हा प्रकार लोकशाहीत बसणारा नसतो, त्याला फॅसिझम असे म्हणतात. आता गंगेला कोणी अशुद्ध वा मैली म्हणायचे नाही. तिच्या शुद्धीकरणाची भाषा बोलायची नाही. कारण तीतदेखील ती अशुद्ध असल्याची टीका असते. गायीविषयी बोलायचे नाही. धर्मसुधारणेची भाषा बोलायची नाही, अंधश्रद्धेवर टीका करायची नाही, मनुस्मृतीला नावे ठेवायची नाहीत, दलित-स्त्रिया व अन्य धर्मीयांना दिल्या जात असलेल्या दुय्यम दर्जाविषयी बोलायचे नाही. फार कशाला, सरकारने रोजगार वाढला म्हटले की आपणही तो वाढल्याचे सांगायचे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्या असे त्याने म्हटले की आपणही तेच म्हणायचे आणि देशातील स्त्रियांचा सन्मान त्यांच्यातील काहींना गॅसच्या शेगड्या मिळाल्यामुळे उंचावला असे त्याने म्हटले की आपणही तीच कविता प्रार्थनेसारखी म्हणायची. त्याचवेळी त्याला विचारबंदी न म्हणता, विचारस्वातंत्र्य म्हणायचे. बोलायचे ते आमच्यासारखे, लिहायचे जे आम्ही सांगू ते आणि श्रद्धा राखायची तर तीही आमच्याचसारखी आणि चांगले व पुण्याचे काय, तेही आम्ही ठरवणार आणि तुम्ही अनुकरणार. अन्यथा देशद्रोहाचा ठपका ठेवलेलाच. देश व समाज यांना एकारलेपण आणण्याचाच केवळ हा प्रकार नाही. तो समाजाचे बावळटीकरण करण्याचा व त्याची वृत्ती गुलाम करण्याचा प्रयत्न आहे. सारे जग व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिशेने जात असताना आपल्या येथे देशद्रोह या शब्दाची व्याप्ती वाढवीत नेण्याचे सुरू झालेले राजकारण विपरीत व दुहीकरणाचे ठरणारे आहे. मात्र असे म्हणणे हाही देशद्रोहच होईल. म्हणून ते वेगळे आहे असे म्हणणे भाग आहे. आता गांधी नाही, आंबेडकरांचा विचार नाही, (त्यांचे पुतळे चालतील), सावरकरांची विज्ञाननिष्ठा नाही. जगातले अन्य विचारप्रवाह नाहीत, फार कशाला वेदोक्ताहून इतर परंपरा नाहीत आणि भगव्याखेरीज दुसरा रंग नाही. तीच देशभक्ती आणि तेच देशप्रेम. बाकीचे सारे देशद्रोहात मोडणारे.
आणखी एक देशद्रोह !
By admin | Published: June 02, 2017 12:20 AM