बाकी काहीही चालेल, काँग्रेस-डावे एकत्र नकोत!
By Shrimant Mane | Published: March 3, 2023 08:18 AM2023-03-03T08:18:54+5:302023-03-03T08:19:14+5:30
ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड व त्रिपुरा या तीन राज्यांच्या विधानसभा निकालांचा संदेश स्पष्ट आहे. या टापूवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे.
- श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर
कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या चार मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम, सेमीफायनल मानल्या गेलेल्या ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड व त्रिपुरा या तीन राज्यांच्या विधानसभा निकालांचा संदेश स्पष्ट आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी मशागत केलेल्या या टापूवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे. प्रत्येकी ६० आमदारांच्या, तीन राज्ये मिळून पाच लोकसभा जागांच्या या टापूत काँग्रेसच्या वाट्याला पुन्हा अपेक्षाभंगच आला.
नागालँडमध्ये नॅशनॅलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप पुन्हा सत्तेवर आला आहे. काँग्रेसला खाते उघडता आले नाही; पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सात, तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाने दोन जागा जिंकल्या, ही आपल्यासाठी चर्चेची बातमी. मेघालय विधानसभा त्रिशंकू दिसत असली, तरी दिवंगत पी. ए. संगमा यांनी स्थापन केलेल्या नॅशनल पीपल्स पार्टीने २५ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. आम आदमी पक्षाच्या आधी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविलेला हा राजकीय पक्ष. तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यामुळे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना संपविण्यासाठी भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरला होता. पण, ते काही जमले नाही. गेल्यावेळी दोन जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा तीनच जागा जिंकता आल्या. कदाचित भाजप संगमांना जवळ करील.
देशाचे लक्ष त्रिपुराकडे लागले होते. पहिले कारण, डाव्या आघाडीची दीर्घकाळाची सत्ता गेल्यावेळी भाजपने हिसकावून घेतली होती. यंदा काँग्रेसने डाव्यांशी आघाडी केली. दुसरे कारण, ‘मुख्यमंत्री बदला व पुन्हा सत्ता मिळवा’, हा फॉर्म्युला भाजपने त्रिपुरात राबविला. बिप्लव देब यांच्या जागी माणिक साहा यांना मुख्यमंत्री बनवून भाजपने जनतेला कौल मागितला. तिसरे कारण, काँग्रेसचे खासदार, प्रदेशाध्यक्ष राहिलेले, आगरतळ्याच्या राजघराण्याचे वारस प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा यांनी ग्रेटर टिपरालँड या आदिवासी राज्याची मागणी करीत ‘टिपरा मोथा’ हा नवा प्रादेशिक पक्ष काढला. त्रिपुराचे किंग आहोतच, आता किंगमेकर बनू, असे स्वप्न पाहिले. तेरा जागा मिळाल्या. परंतु, भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. राजपुत्रांचे स्वप्न त्यामुळे साकार होणार नाही. डावे व काँग्रेसच्या आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही. कारण, प्रद्योत देबबर्मा यांच्या प्रादेशिक पक्षामुळे विरोधी मतांचे विभाजन झाले. त्याचा फायदा भाजपला मिळाला. आता भाजप देबबर्मा यांना सोबत घेण्याची तयारी करीत आहे.
त्रिपुराचा निकाल हा डाव्यांशी आघाडी करून निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा प्रयोग मतदारांनी धुडकावण्याचा हा पूर्व किंवा ईशान्य भारतातील दुसरा प्रसंग. पश्चिम बंगालमध्ये तो आधी फसला होता. इतिहासात पहिल्यांदाच डावे व काँग्रेस या दोघांच्या हाती भोपळा आला होता. योगायोग असा की, आजच अधीर रंजन चौधरी यांच्या मुर्शिदाबाद या गडातील सागरदिघी विधानसभेची पोटनिवडणूक जिंकून काँग्रेसने पुन्हा विधानसभेत प्रतिनिधित्व मिळविले आहे. थोडक्यात, काँग्रेसला मतदारांचा पुन्हा सांगावा आहे की, बाकी काहीही करा, ज्यांच्याविरुद्ध दशकानुदशके लढला, त्या डाव्यांशी युती मान्य नाही.
जाता जाता एक गुड न्यूज..
मातृसत्ताक कुटुंब पद्धतीसाठी चर्चेत असलेल्या ईशान्य भारतातील नागालँड विधानसभेत एनडीपीपी पक्षाकडून विजयी झालेल्या हेकानी जाखलू या पहिल्या महिला आमदार असतील. त्यासाठी तब्बल तेरा निवडणुका व्हाव्या लागल्या.
srimant.mane@lokmat.com