अरुण म्हात्रे मराठी साहित्य संमेलनाच्या बाबतीत वादाची परंपरा असणे खूप दुर्दैवाची बाब आहे. संमेलनातील राजकीय सहभाग वाढला की ते संमेलन आयोजक असो वा सामान्य कुणाच्याही हातात राहत नाही. त्यामुळे संमेलनातील ‘साहित्य’ हा भाग बाजूला राहतो आणि राजकारण सुरू होते. अशा प्रकारांमुळे संमेलन दूर राहते आणि अन्य विषयांना फाटे फुटत जातात, या वादांमुळे साहित्यिक संमेलनापासून दूर जातात आणि निव्वळ राजकारण सुरू होते. ही बाब साहित्य क्षेत्राप्रमाणे महाराष्ट्रासाठीही अत्यंत दुर्दैवी आहे. या वादाच्या निमित्ताने साहित्य संमेलनातील अशा कुप्रथा बंद व्हायला हव्यात. कोणत्याही भाषेतील साहित्यिकाला केवळ अतिथी म्हणून आमंत्रित करावे अशा कृतींमधूनच वाद आणि संमेलन हे समीकरण बदलण्यास सुरुवात होईल.
साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाद या समीकरणामुळे जागतिक स्तरावर महाराष्ट्राची प्रतिमा अधिकाधिक खालावते आहे. उद्घाटक म्हणून येणाऱ्या नयनतारा सहगल यांचे येणे रद्द झाल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी भाषणात लिहिलेली परिस्थिती महाराष्ट्रात असल्याचे परखड मत मांडले आहे, त्यामुळे पुन्हा महाराष्ट्राला कलंक लावला गेला आहे. हा सगळा प्रकार आयोजकांना टाळता आला असता, विदर्भासारख्या काहीशा मागासलेल्या, स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडणाºया भागाला इंग्रजी साहित्यिकाची काहीच गरज नाहीय. त्यामुळे इंग्रजी भाषेतील साहित्यिक बोलाविण्यापेक्षा एखाद्या देशी भाषेतील, बोली भाषेतील साहित्यिकाला आमंत्रित करायला हवे होते. जेणेकरून, अशा मातीतील साहित्यिकाने विदर्भातील शेतकºयांच्या, तेथील मातीतील समस्या-प्रश्नांना वाचा फोडली असती. परंतु, मराठीच्या गौरवासाठी अन्य भाषा भगिनीला बोलवायचे हे चुकीचे आहे. याउलट, विदर्भाच्या मातीतील एखाद्या शेतकºयाला बोलावून साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले असते, तर ती सर्वांत गौरवास्पद बाब ठरली असती. या कृतीतून निश्चितच शेतकºयांना आपल्या पाठीशी कुणीतरी खंबीरपणे उभे आहे, याची जाणीव झाली असती.
सहगल या डाव्या विचारसरणीच्या आहेत, ही माहिती यापूर्वीच आयोजकांना होती. त्यामुळे त्यांना आमंत्रित केल्यानंतर त्या आपली परखड मते मांडणारच, याचा विचार आयोजकांनी आधीच करायला हवा होता. परंतु, आता दोन दिवसांवर संमेलन येऊन ठेपले असताना सहगल यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झालेला हा वाद साहित्यिकांनी वाढवू नये, यामुळे पुन्हा एकदा मराठीच्या मागासलेपणाची वृत्ती उघड्यावर पडते आहे. संमेलनाध्यक्षांच्या बिनविरोध निवडीमुळे महामंडळाने नवा आदर्श घालून दिला होता. परंतु, आयोजकांच्या या कृतीमुळे याचा विसर पडला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला संमेलन आयोजकांचे वागणे शोभेसे नाही, त्यामुळे आयोजकांनी नयनतारा सहगल यांना लेखी माफीनामा पाठवून सन्मानाने बोलावले पाहिजे. मात्र आता प्रश्न आणखी चिघळला आहे, त्यामुळे परत त्यांना बोलावणे, त्यांच्या विचारांचा विरोध करणारा वर्ग मोठा आहे आणि या एका प्रकारामुळे संपूर्ण संमेलन उधळू शकते. केवळ या विषयामुळे संपूर्ण संमेलनाला गालबोट लागू नये याची काळजी घेऊन आयोजकांनी सहगल यांची माफी मागण्यासाठी पुढाकार घ्यावा.