- मिलिंद कुलकर्णीविधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील अटीतटीच्या निवडणुकीत किशोर दराडे विजयी झाले. अपूर्व हिरे यांच्यापाठोपाठ दराडे यांच्यारुपाने नाशिक जिल्ह्याने या मतदारसंघावर सलग दुसऱ्यांदा वर्चस्व कायम ठेवले. शिक्षक मतदारसंघ असल्याने या मतदारसंघातून शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी निवडून जावा, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण संस्थाचालक व त्यांचे नातेवाईकदेखील या मतदारसंघातून निवडून आले आहेत. ही परंपरा यंदाही कायम राहिली. ही निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजली. सरस्वतीचे मंदिर असे शिक्षणक्षेत्राचे स्वरुप कधीच बदलले आहे. समाजातील सर्व क्षेत्राचे व्यापक व्यावसायिकरण झाले असल्याने त्यात शिक्षण क्षेत्र अपवाद ठरु शकत नाही. शिक्षणक्षेत्राचे खाजगीकरण झाल्यापासून राजकीय मंडळींचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला. शिक्षणसम्राट तयार झाले. राजकारणासाठी शिक्षणक्षेत्र आणि शिक्षणक्षेत्रासाठी राजकारण असे समीकरण तयार झाले. काही शिक्षक हे ज्ञानदानापेक्षा संस्थाचालकांशी अधिक बांधील झाले. हा बदल न स्विकारणाºया शिक्षकांना बदल्या, निलंबन, कारवाई अशा त्रासाला सामोरे जावे लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे टीडीएफसारख्या अग्रणी शिक्षक संघटेनेचे नाव घेत तब्बल पाच उमेदवार या निवडणुकीत उतरले, यावरुन शिक्षक संघटनेतील टोकाचे राजकारण लक्षात येते. रा.स्व.संघाशी संबंधित शिक्षक संघटनेचा उमेदवारदेखील रिंगणात होता. भाजपा, शिवसेना, राष्टÑवादी या राजकीय पक्षांनी उघडपणे या निवडणुकीत सहभाग घेतला. मंत्र्यांनी शिक्षक मेळावे आणि संस्थाचालकांच्या बैठका घेतल्या. लक्ष्मीदर्शन व पैठणी वाटपाचे आरोप झाले आणि पैठणीच्या काही ठिकाणी होळी झाल्याच्या बातम्या झळकल्या. मतदानाच्या दिवशी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी, पैसेवाटप करणाºया शिक्षकाला पकडणे असे प्रकार पाहून ही गुरुजनांची निवडणूक आहे काय, याविषयी शंका निर्माण होते. खान्देशातील संदीप बेडसे, अनिकेत पाटील, शालिग्राम भिरुड तर नगरचे भाऊसाहेब कचरे हे उमेदवार तुल्यबळ होते. परंतु मतविभाजनाचा फटका त्यांना बसला. अल्पावधीत किशोर दराडे यांनी सुनियोजित यंत्रणा पाच जिल्ह्यांमध्ये राबवून यश मिळविले आहे. आता संस्थाचालक विजयी झाला; शिक्षकांचे प्रतिनिधीत्व कोण करणार असे अरण्यरुदन शिक्षकवर्गातून सुरु झाले आहे. पण ही वेळ कुणी आणली, याचा विचार शिक्षकांनी करायला हवा. बाऊन्सर घेऊन शिक्षक संघटनेच्या बैठकीला इच्छुक उमेदवार जातात आणि उमेदवारी मिळवितात, याचा अर्थ घरभेदी आपल्यातच आहेत. बाहेरच्यांना दोष देण्यात काय हशील? मुंबईत कपील पाटील हे लढाऊ शिक्षक आमदार विजयाची हॅटट्रीक करीत असताना नाशिकमध्ये हे होत नाही, याचा साकल्याने विचार करण्याची वेळ तमाम शिक्षक संघटनांवर आली आहे.
अरण्यरुदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:44 PM